आज्जीच्या हातची आठवण सांगणारं लोणचं महाराष्ट्राची ओळख सांगणारा ब्रँड बनलंय

लोणचं म्हणजे मराठी माणसाचा विकपॉईंट. आपल्या लहानपणी घरी लोणचं घालायचं म्हणजे एक साग्रसंगीत कार्यक्रम असायचा. आई काकी मावश्या निगुतीने सगळं उसाभर करायच्या. लोणचं करण्यासाठी आज्जीची खास सिक्रेट रेसिपी असायची.

तिच्या सुपरव्हीजन खाली प्रचंड मेहनतीने बनवलेलं खास बरणीमध्ये भरलेलं आंबट गोड लोणचं वर्षभर आपली साथ द्यायचं.

आजच्या घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या जगात लोणचं घालुन खाणे ही चैन बनून राहिली आहे. पुण्यामुंबईला नोकरी साठी गेलेली मॉलसंस्कृतीत वाढलेली पिढी कितीही झालं तरी लोणच्याचा मोह सोडू शकत नाही.

अशावेळी मदतीला आलं केप्रचं लोणचं.

खरंतर केप्रचं लोणचं देखील एका आज्जीबाईंनी बनवलं होतं. गोष्ट आहे १९४८ सालची.

पुण्याच्या विनायक भट यांचा कलकत्त्याला सूत रंगवण्याचा व्यवसाय होता. धंदा म्हटल्यावर चढउतार हा आलाच. विनायक भट यांनादेखील एकदा मोठा फटका बसला. त्यांची पत्नी कमलाबाई आपल्या मुलांना घेऊन पुण्याला परत आली. विनायकराव मागे थांबले.

तीन मुली आणि एक मुलगा असा हा संसार ओढणे कमलाबाईंसाठी आव्हान होतं. त्यांच्या भावाचं जंगली महाराज रोडवर किराणा मालाचं दुकान होतं.

स्वातंत्र्यानंतरचा काळ. पुण्यात अनेक नवनवीन उद्योग उभे राहात होते.

बजाजचे वगैरे कारखाने सुरू होत होते. निवृत्त पेन्शनर लोकांचं पुणे हळूहळू नोकरदारांच्या गावात रूपांतरीत होत होतं. त्यांच्या गरजा नवीन होत्या.

भावाच्या दुकानात येणाऱ्या गिऱ्हाईकांची मागणी लक्षात घेऊन कमलाबाई भट यांनी लोणची, मसाले बनवून विकायचं ठरवलं.

अवघ्या ५ रुपये भांडवलात त्यांनी लोणची बनवण्याचा व्यवसाय सुरू केला.तेव्हा त्यांना ठाऊक नव्हते की हा व्यवसाय त्यांचं नाव पुढे सातासमुद्रापार नेणार आहे.

सुरूवातीला व्यवसाय अत्यंत घरगुती स्वरूपाचा होता.

त्यांची मुलं त्यांना आपली शाळा सांभाळून मदत करत. कच्चा माल आणण्यापासून ते पदार्थ निवडणे, भाजणे, कुटणे, तयार मालाच्या पुडय़ा बांधणे ही कामे अख्खे कुटुंब मिळून करे. मसाले भाजणे, कुटणे, दळणे हे सर्व हाताने केले जायचे. पानांच्या द्रोणांमध्ये किंवा पुडय़ा बांधून लोणची-मसाले विकले जात.

कमलाबाईंच्या हाताला खास चव होती. अगदी थोड्या दिवसातच त्यांच्या लोणची मसाल्याची चव संपूर्ण गावात पसरली.

पुढे विनायक भट हेही कलकत्ता इथला बिझनेस गुंडाळून पुण्याला परतले. त्यांनी हा धंदा वाढवण्यासाठी आपलं व्यावसायिक डोकं वापरलं. फक्त पुण्यातच नाही तर मुंबई सारख्या मोठ्या शहरात लोणचे मसाले याला मागणी असेल हे त्यांनी ओळखलं. यासाठी तिकडे फिरून मार्केटिंग केलं.

त्यांनी आपल्या लोणच्याला कुलदेवतेच नाव दिलं होतं

“केप्र म्हणजेच केशवलक्ष्मी प्रसाधन”

विनायकरावांनी मुंबईत हॉटेल, दुकाने इथे लोणचे मसाले खपवण्यासाठी प्रचंड पायपीट केली. प्रत्येक दुकानदाराचा, हॉटेलच्या आचाऱ्याशी बोलले. त्यांचा प्रतिसाद घेऊन अभ्यास केला.

त्याकाळी कमलाबाई भट सर्वसाधारण गृहिणी प्रमाणे आपल्या अंदाजानुसार जिन्नस वापरून लोणचं बनवायच्या. विनायकरावांनी त्यात सिस्टीम आणली.

प्रत्येक लोणचे व मसाल्यात घालण्याच्या जिनसांचे चमच्याने मोजमाप करून त्याचे विशिष्ट असे ‘फॉर्म्युले’ बनवले.

आज सत्तर वर्षांनी देखील केप्र मध्ये हेच फॉर्म्युले वापरले जातात.

विनायकराव आणि कमलाबाई यांच्या कष्टाला यश येऊ लागलं. केप्रचा पुण्यापाठोपाठ मुंबईत देखील जम बसला. तिथे त्यांनी एक स्वतःच दुकान सुरू केलं. फक्त मराठीच नाही तर अमराठी कुटुंबातही केप्र फेमस झाले.

त्यांना कधी स्वतःची जाहिरात करायला लागले नाही. चवीची माऊथ पब्लिसिटी हाच त्यांचा यूएसपी होता.

ही चवीची दर्जेदार परंपरा भट कुटुंबाच्या पुढच्या पिढीने देखील सांभाळली. हाताने बनवल्या जाणाऱ्या लोणचे मसाले बिझनेसमध्ये आधुनिक मशिनरी आणल्या. पण प्रिझर्व्हेटिव्ह वापरून क्वालिटीशी तडजोड केली नाही.

कालांतराने कोंढाव्याला व शिरवळ येथे कारखाना देखील सुरू केला.

आज केप्र हा एक ब्रँड बनला आहे. जागतिकीकरणाचा खरा फायदा केप्र सारख्या छोट्या कंपन्यांनी उचलला.

गेली वीस वर्षे अमेरिका इंग्लंड दुबई ऑस्ट्रेलिया इथल्या देशात हे लोणचे आणि मसाले एक्स्पोर्ट होते.

कमला आजीच्या हातच्या लोणच्याची चव गेली सत्तर वर्षे उभ्या महाराष्ट्राला आपल्या आजीची आठवणी प्रमाणे जिभेवर रेंगाळत ठेवत आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.