केरळातल्या दोन चर्चचा वाद मोदींना ख्रिश्चनांचं गठ्ठा मतदान मिळवून देण्यास उपयोगी ठरतोय..

आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केरळमध्ये होते. तुफान गर्दीत त्यांची ही प्रचारसभा झाली. त्यांनी तिथली सत्ताधारी डावी आघाडी आणि काँग्रेस  दोघांनाही चांगलंच फोडून काढलं. यावेळी आपल्या भाषणात बोलताना ते म्हणाले,

“जूडासने चांदीच्या काही नाण्यांसाठी लॉर्ड क्राइस्टचा विश्वासघात केला होत. तशाचप्रकारे एलडीएफने देखील सोन्याच्या काही तुकड्यांसाठी केरळला धोका दिला.”

आता तुम्ही म्हणाल मोदीजी केव्हा पासून आपल्या भाषणामध्ये बायबलमधली उदाहरणे देऊ लागले.  या आधी तर आपण कधी त्यांना निवडणुकीच्या प्रचारात बायबल, कुराण याची उदाहरणे देताना ऐकलं  नाही. हिंदुत्वाचा प्रखर अभिमान त्यांच्या भाषणात नेहमी जाणवत असतो. ते अचानक येशू ख्रिस्त आणि जुडास या बद्दल का बोलू लागले आहेत?

या मागे आहे केरळ मधली मतांची गणितं.

आता तुम्हाला प्रश्न पडेल की भाजप कधी पासून ख्रिश्चनांच्या गठ्ठा मतदानाकडे डोळा ठेवू लागली? यासाठी आपल्याला जावे लागेल केरळच्या दोन चर्चच्या वादाकडे.

केरळ मध्ये अल्लपी नावाचं एक ठिकाण आहे. मुन्नारच्या बॅक वॉटर नौकानयनासाठी फेमस असलेल्या या ठिकाणाचं खरं नाव अल्लपुझा. याला भारताचं व्हेनिस म्हणून देखील ओळखलं जातं. संपूर्ण राज्याप्रमाणे इथे ख्रिश्चनांचे प्रमाण देखील जास्त आहे.

या अल्लपुझा जिल्ह्यात एक चर्च आहे, नाव सेंट जॉर्ज ऑर्थोडॉक्स चर्च. असं म्हणतात की हे चर्च जवळपास हजार वर्षे जुनं आहे. इथे जवळपास तेराव्या शतकात बनवलेली पेंटिंग आहेत ज्याचे वर्षानुवर्षे जतन करण्यात आले आहे.

मागच्या दोन वर्षांपूर्वी इथून एक हायवे बनवला जाणार होता. या हायवे मुळे हजारो वर्ष जुन्या असणाऱ्या सेंट जॉर्ज चर्च वर संकट आले. इथले फादर आणि इतर ट्रस्टी मंडळी अनेक नेत्यांकडे गेली पण फायदा झाला नाही. अखेर या चर्चला वाचवण्यासाठी केरळ भाजपचे नेता बालाशंकर हे थेट पंतप्रधानांना भेटले.

पंतप्रधानांकडे हा विषय गेल्यावर वेगाने सगळी सूत्रे हलली. पुरातत्व विभागाने हायवेच्या कामात हस्तक्षेप केला. या चर्चचा समावेश देशातील ऐतिहासिक वास्तूमध्ये करण्यात आला आणि त्याला वाचवण्यात आलं.

हा चर्च होता मालंकारा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्च या पंथाचा. 

ख्रिश्चन धर्मातही हिंदुप्रमाणे अनेक पंथ आहेत. केरळ मध्ये कॅथॉलिक ख्रिश्चन लोकांचे प्रमाण मोठे असले तरी या मालंकारा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्च आणि जेकोबाइट या पंथाचा वाटा देखील मोठा आहे. खरं तर जॅकोबाइट हा आर्थोडॉक्स पंथाचाच एक भाग आहे. पण या दोन्ही मध्ये शंभर वर्षांपासून वाद आहेत.

झालं असं की १९१० साली अब्दुल्ला नावाचा एक धर्मगुरू सीरियन ऑर्थोडॉक्स चर्चचा प्रमुख बनला. त्याने पदावर आल्या आल्या केरळच्या मालंकारा ऑर्थोडॉक्स चर्चचे प्रमुख मेट्रोपॉलिटन यांना हटवलं.

तेव्हा चिडलेल्या या धर्मगुरूंनी अब्दुल्ला विरुद्ध बंड पुकारलं. अब्दुल्लाच्या आधी ऑर्थोडॉक्स चर्च प्रमुख असलेले अब्दुल मसिह याना संपर्क साधण्यात आला. तेव्हा ते केरळला आले आणि त्यांनी मालंकारा ऑर्थोडॉक्स चर्चला स्वतंत्र बनवलं आणि त्याचा अध्यात्मिक नेतृत्व कॅथलिकांना दिलं.

मात्र कट्टर आर्थोडॉक्स विचार असणारे जॅकोबाइट हे कॅथलिक लोकांचे नेतृत्व स्वीकारण्या तयार नव्हते. इथूनच भांडणाची ठिणगी पेटली. जॅकोबाइट हे आजही सीरियन धर्मगुरूंचाच आदेश मानतात. गुंतागुंत वाढत होती. दोन्ही पंथ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले.

मात्र याचा परिणाम असा झाला कि केरळ मध्ये आर्थोडॉक्स पंथाची जी काही हजारभर चर्चेस आहेत त्यावर अधिकार कोणाचा हा प्रश्न उभा राहिला. दोघांचंही म्हणणं पडलं कि आमचा पंथ खरा असून सर्व चर्च आमच्या ताब्यात मिळाले पाहिजेत. यावरून भांडणे वाढत गेली. शेवटी धार्मिक भावनांचा प्रश्न होता. वाद थेट सुप्रीम कोर्टात जाऊन पोहचला. दोन्ही बाजुंनी त्वेषाने तिथे आपापल्या बाजू लढवल्या, पुरावे सादर केले.

अनेक वर्षे चालेल्या या केसचा निकाल २०१७ साली लागला. सुप्रीम कोर्टाने त्या १००० चर्चेची मालकी मालंकारा ऑर्थोडॉक्स चर्चची आहे असा निकाल दिला. पण वाद इथे थांबले नाहीत. जॅकोबाइट पंथाचे लोक म्हणत होते कि कोर्टाच्या निकालाचा अन्वयार्थ काढण्यास सगळे चुकत आहेत.

शेवटी दोन्ही पंथाचे फादर बिशप यांचं शिष्टमंडळ जाऊन पोहचलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे. गेल्या डिसेंबर मध्ये या चर्चा झाल्या. मोदींनी आपली बाजू स्पष्ट केली नाही.

केरळची लोकसंख्या पाहिली तर तिथे ५४% हिंदू राहतात तर २४% मुस्लिम आहे १८% ख्रिश्चन. या ख्रिश्चन लोकसंख्येपैकी मोठा वाटा कॅथॉलिक मतदारांचा आहे जो गेली अनेक वर्षे डाव्या आघाडीला मतदान करतोय. तर उरलेल्या ऑर्थोडॉक्स आणि जॅकोबाईटमधले मतदार हे काँग्रेसला मतदान करत आलेत. 

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री हे स्वतः मालंकारा ऑर्थोडॉक्स चर्चच्या पंथाचे असल्यामुळे त्यांच्या पाठीशी हा समाज आजवर राहत आलाय. मुथ्थुट फायनानास सारख्या आर्थिक नाड्या ताब्यात असल्यामुळे हा समाज ताकदवान देखील मानण्यात आलाय. त्यामुळे भाजपने आपले पूर्ण लक्ष जॅकोबाईटकडे वळवले आहे.

जॅकोबाईट पंथाच्या बिशपनी आम्ही यंदा भाजपला मतदान करणार आहे असे जाहीर देखील केलं आहे.

त्यांची लोकसंख्या मोठी नसली तरी प्रत्येक मतदारसंघात जवळपास ८० हजार मते त्यांची आहेत असं बोललं जात. विशेषतः मध्य केरळमध्ये त्यांचा जोर मोठा आहे. एर्नाकुलम, इडुक्की, कोट्टायम या जिल्ह्यांमध्ये ख्रिश्चन मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे.

मात्र या सगळ्या धांदलीत ऑर्थोडॉक्स चर्चने आपली भूमिका जाहीर केली नाही.

त्यांना माहित आहे कि जॅकोबाईट १००० चर्च मिळवण्यासाठी भाजपकडे गेले आहे. पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय पंतप्रधान वळवू शकत नाहीत याची ऑर्थोडॉक्स चर्चला खात्री आहे. तरीही त्यांनी भाजपला एक आमदार निवडून देण्याचं आश्वासन दिलं आहे अशी चर्चा केरळमध्ये आहे. त्यांचे बिशप मात्र आम्ही कोणालाही कसलेही आश्वासन दिलं नाही असं सांगत आहेत.

एकूणच सर्वाधिक सुशिक्षित लोकांचं राज्य म्हणवल्या जाणाऱ्या केरळमध्ये देखील जातीपातीच राजकारण निवडणुकीच्या निमित्ताने उफाळून आलं आहे. जात न मानणाऱ्या डाव्या पक्षांपासून ते कट्टर हिंदू म्हणवल्या जाणाऱ्या भाजप पर्यंत सगळे हातात बायबल घेऊन उतरले आहेत. मात्र कोणी कोणाला गठ्ठा मतदान केलंय, खरंच देवभूमी केरळ जाती वरून मतदान करेल का याच उत्तर मतपेटीतूनच मिळेल हे नक्की.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.