गेली दोनशे वर्ष केरळ मधल्या या कुटुंबांनी मराठी बाणा अभिमानाने जपलाय

सुंदर मंदिरे, नयनरम्य समुद्रकिनारे-बॅकवॉटर, गर्द जंगलात हत्तीवरून निसर्गसफारी. देवभूमी केरळ म्हटल्यावर आपल्याला हे हमखास आठवतं. भारतातील सर्वात सुशिक्षित व आधुनिक समजलं जाणारं राज्य. इथे निसर्गसौंदर्याबरोबरच ऐतिहासिक संस्कृती व परंपरेचा देखील मोठा वारसा लाभला आहे.

या सोबतच केरळच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथला बहुसांस्कृतिक, बहूधार्मिकवाद. गेल्या अनेक शतकांपासून या राज्यात हिंदू-मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माचे पालन करणारे लोक सुखासमाधानाने राहतात मात्र अजूनही इथे कधी दंगली झाल्याचं आपल्या ऐकिवात येत नाही.   

अशा या बहुसांस्कृतिक केरळ मध्ये मराठी बाणा सुद्धा आहे हे तुम्हाला सांगितलं तर ?

आजकाल नाही तर गेली दोनशे वर्ष केरळ मध्ये मराठी लोक राहत आहेत आणि आपली भाषा, आपली संस्कृती त्यांनी तिथे आजवर जपूनदेखील ठेवली आहे. हि मराठी कुटुंबे तिथे कधी आली ? त्यांचा इतिहास काय ? सध्या ते काय करतात? चला तर या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

मराठी लोकांना केरळ मध्ये पहिल्यांदा आणलं ते गोव्याच्या पोर्तुगीजांनी.

साधारण अठराव्या शतकाच्या मध्यावर व्यापाराच्या निमित्ताने पोर्तुगीज जहाजातून मराठी कुटुंबे केरळला आली. इथले खास मसाले व इतर पदार्थांचा व्यापार संपूर्ण देशभरात चालायचा. मुख्यतः यावर गुजराती व कच्छी लोकांचे वर्चस्व होते. मात्र तरीही मागून आलेल्या मराठी व्यापाऱ्यांनी इथे जम बसवला.

१७५५ ते १७९९ या काळात फतेमारी नावाच्या बोटीतून फडके, शेवडे,बोरवणकर असे कोकणी व्यापारी कोचीनला आले. कामधंद्याच्या निमित्ताने त्यांनी इथे आपला संसार देखील थाटला. पुढे पोर्तुगीज,डच आणि नंतर आलेल्या इंग्रज राजवटीतही या व्यापारात खंड पडला नाही.

या सर्वात महत्वाचे व्यापारी ठरले बाबू गोविंद पंडित.

कोकणातून १८६५ साली केरळमध्ये आलेले गोविंद पंडित प्रचंड श्रीमंत होते. त्यांनी व्यापिन या बेटावर मोठी जागा खरेदी केली. आज तिथे एलएनजी टर्मिनल उभे आहे. या बाबू गोविंद पंडित यांनीच कोचीमधल्या मटटनचेरी येथे गोपाळकृष्ण मंदिर उभारलं  आजही इथल्या मराठी कुटुंबाचे प्रमुख केंद्र बनले आहे.

पुढील काळात जवळपास २० पंडित कुटुंबे या मंदिराच्या आसपास सेटल झाली.या पंडितांमुळे इथल्या रस्त्याचे नाव पंडितांन रोड असे देण्यात आले.

गोविंद पंडित ज्या बोटीने आले होते त्याच बोटीत रामचंद्र महादेव गावस्कर आणि गोपाळ महादेव गावस्कर हे दोन भाऊ देखील होते. त्यांनी नारळे आणि मसाले निर्यात करण्याचा व्यापार सुरु केला. गावस्कर बंधूनी या व्यापारात एवढी प्रगती केली की त्यांची कंपनी Aspinwall आणि Pierce Leslie या ब्रिटिश कंपन्यांशी स्पर्धा करणारी एकमेव भारतीय कंपनी ठरली.

या गावस्कर बंधूंपैकी एकजण कोच्ची नगरपालिकेचा महापौर देखील बनला.

एकोणिसाव्या शतकात केरळमधील मराठी समाजाचा व्यापार भरभराटीस आला. यात एका व्यक्तीने तर केरळमधील सर्वात मोठे गोदाम उभारले होते. घोड्याच्या बग्गीतून येजा करण्या इतपत श्रीमंत असलेला तो कोच्ची मधला पहिलाच इसम ठरला.

कोकणातून आणखी कुटुंबे केरळला आली. त्यांच्या गावाकडे जमिनी होत्या. मात्र केरळचे कोकणासारखेच असलेलं हवामान, शिवाय व्यापाराला पोषक वातावरण म्हणून त्यांनी तिथेच कायमचे राहण्याचा निर्णय घेतला. फक्त कोच्चीच नाही तर कालिकत व इतर गावातही मराठी कुटुंबे जाऊन वसली. फक्त व्यापारीच नाही तर चहा कॉफीच्या मळ्यात व इतर उद्योगात नोकरीसाठीही अनेकजण केरळला आले.

मराठी समाजातील अनेक डॉक्टरमंडळींनी देखील कोच्चीमध्ये आपलं नाव कमवलं.

बाळकृष्ण अनंत गोरे यांनी तर १८८१ साली केरळ कोकीळ नावाचे एक मराठी मासिक देखील तिथं सुरु केले.

दर महिन्याला देवजी भिमजी या देवनागरी छापखान्यात या मासिकाची छपाई होत असे, हा छापखाना गणपत सिंग नावाच्या व्यक्तीने सुरु केला होता. अगदी थोड्याच दिवसात केरळ कोकीळ प्रचंड हिट झाले. केरळमधला मराठी समाज दर महिन्याला या मासिकाची वाट पाहत असे. मनोरंजक माहिती, बातम्या सोबतच निधन वार्ता यांची माहिती मिळणारे मासिक म्हणून केरळ कोकीळची कीर्ती पसरली होती.

हा मराठी समाज राजकीय दृष्ट्या देखील सजग होता. टिळकांनी पुण्यात गणेशोत्सव सुरु केल्यानंतर पुढच्याच वर्षी कोच्चीमध्ये देखील सार्वजनिक गणेशोत्सवास सुरवात करण्यात आली.

या दूरदेशीच्या भागात येऊन आपली संस्कृती आणि भाषा जपण्याचा मराठी कुटुंबाचा प्रयत्न चालू होता. त्यातूनच त्यांच्या मुलांसाठी एका मराठी शाळेची स्थापना करण्यात आली.

केरळच्या मराठी समाजात सदाशिव वामन गोरे यांना शास्त्रीय संगीताची मोठी आवड आणि जाण होती. त्यांच्याच प्रयत्नांमुळे कोच्चीमध्ये कुमार गंधर्व, परवीन सुलताना, मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या गाण्याचे कार्यक्रम भरवण्यात आले.

पण स्वातंत्र्याच्या नंतर मात्र केरळमधील अनेक कुटुंबांनी पुन्हा आपल्या गावाकडे प्रस्थान केले.

तरीही काही मराठी कुटुंबे केरळमध्येच राहिली. त्यांनी १९६५ साली व्ही.जी.सराफ यांच्या नेतृत्वाखाली येथे मराठा मंडळाची स्थापना केली. तिथला गणेशोत्सव ११ दिवस धुमधडाक्यात साजरा करणे, मराठी नाटकं, सिनेमे यांचे खास शोज आयोजित करणे या माध्यमातून त्यांनी मराठी भाषा प्रवाही ठेवण्याचं काम केलं. गणेशोत्वसाबरोबरच नवरात्रीत भोंडला,हादगा, कोजागिरी पौर्णिमेवेळी दूध वाटप असे अनेक कार्यक्रम एकत्रच साजरे केले जातात.

इतकंच नाही तर जेव्हा तिरुवनंपुरम येथे झालेल्या भारताच्या पहिल्या सॅटेलाईट लॉन्चिंगचा विक्रम पार पडला तेव्हा केरळमधील सर्व मराठी समाज एकत्र येऊन त्यांनी यात सहभागी झालेल्या मराठी संशोधकांचा मोठा सत्कार समारंभ घडवून आणला होता.

१९९९ साली स्थापन झालेलं व्ही.जी.सराफ हॉस्पिटल हे कोच्ची मधील सर्वात मोठ्या हॉस्पिट्लपैकी एक आहे.

आज मात्र इथे जवळपास १७ कुटुंबे उरली आहेत. काहीजणांनी तिथल्या मुली मुलांशी लग्ने करून कायमचा केरळी होण्याचा निर्णय घेतला आहे. जन्माने मल्याळी आणि मनाने मराठी असलेली यांची पुढची पिढी आज इडली रस्सम बरोबरच पोहे उपमा शिरा देखील आवडीने खाते.

उद्या प्रेममच्या प्रेमात पडून केरळला बघायला गेला तर मल्ल्याळममध्ये बोलणारा जॉर्ज करमरकर, मलर दाते, सेलीन गोडबोले अशी मंडळी भेटली तर शॉक होऊ नका. देवभूमी केरळ मध्ये काहीही घडू शकतंय.

संदर्भ: From the land of Marathas – the hindu

हे ही वाच भिडू.

6 Comments
  1. Gsjanan N. Gokhale says

    Any more news about the Maharashtrian families Kerala.

  2. Gsjanan N. Gokhale says

    Any more writeups about the Marathis of Kerala.

  3. Ganan N. Gokhale says

    Any more articles about the Maharashtrian Communities of Kerala.

  4. Dilip Gurjar says

    Long back I had written an article about Calicut Maharastrians in facebook.
    Dilip Gurjar

  5. Dilip Gurjar says

    Long back I had written an article on Calicut Maharashtrians in facebook.

  6. Pradeep Raut says

    बाळकृष्ण अनंत गोरे यांनी १८८१साली केरळ कोकीळ हे मासिक चालू केले, असं आपण नमूद केलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे याच नावाचं मासिक कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी १८८६ साली कोचिन येथे सुरू केलं. ते चार वर्षे तेथून चालवले. नंतर ते १९ वर्षे मुंबईहून चालवले.१९०९ साली ते‌ बंद झाले.जवळपास चाळीस पुस्तके आठल्ये यांनी लिहिली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.