सण साजरे करायच्या नादात केरळनं स्वतःला कोरोना रुग्णांच्या यादीत टॉपला नेऊन ठेवलंय…

देशभरता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, मागच्या काही दिवसात या तिसऱ्या लाटेची सुरुवात केरळमधून होतीय कि काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. कारण केरळमधली परिस्थिती सगळ्याच राज्यांपेक्षा वेगळी आहे. एकीकडे सगळीकडे रुग्णांची संख्या कमी होत असताना केरळमध्ये मात्र पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चाललीये.

राज्यात सलग चौथ्या दिवशी ३० हजारांहून अधिक प्रकरणांची नोंद झालीये. या संख्येने गेल्या ५८ दिवसांचा देशातला रेकॉर्ड ब्रेक केलाय.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच दिवसांत देशातील एकूण प्रकरणांपैकी ६६ टक्के प्रकरणं फक्त केरळमधलीचं आहेत.

गेल्या काही दिवसांपासून केरळच्या रुग्णांवर नजर टाकली तर २५ ऑगस्टला ३१ हजार ४४५ प्रकरणं, २६ ऑगस्टला ३० हजार ७७, २७ ऑगस्टला ३१ हजार ८०१ तर २८ ऑगस्टला ३१ हजार २६५ नवीन संक्रमितांची नोंद झाली. यासोबतच मृत रुग्णांच्या आकडेवारीकडे पाहिलं तर २५ ऑगस्टला २१५ रुग्णांचा मृत्यू झाला, २६ ऑगस्ट १६२, २७ ऑगस्ट १७९, तर २८ ऑगस्टला १५३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे.

आता या आकडेवारीवरूनच समजतंय की, केरळमधील परिस्थिती देशातील इतर राज्यांच्या तुलनेत खूपच गंभीर होत चाललीये. जिथे संक्रमित आणि मृत रुग्णांची संख्या दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे.

आता केरळच्या तुलनेत महाराष्ट्र सारखं राज्य जिथं लोकसंख्या सर्वाधिक आहे आणि दोन्ही लाटेत राज्याला सर्वाधिक फटका बसला होता, तिथेही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालाय. इथे संक्रमितांची सांख्य ४ ते ५ हजारांच्या दरम्यान आहे.  तर मृतांच्या संख्येतही घसरण होताना दिसतेय.

एवढचं नाही तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान यासारख्या मोठ्या राज्यांमधील गेल्या काही  दिवसांचा रेकॉर्ड पहिला तर कोविडमुळे मृतांची संख्या मध्य प्रदेश आणि राजस्थानात शून्य, गुजरात आणि दिल्लीत एक आणि उत्तर प्रदेशात दोन अशी आहे. तर संक्रमितांच आकडा दिल्ली सोडला तर शंभरी कोणीच गाठलेली नाही.

अशा परिस्थितीत केरळ ही भारत सरकारसाठी समस्या बनली आहे. गुरुवारी भारताच्या गृह सचिवांनी राज्याच्या मुख्य सचिवांशी बोलून रात्रीच्या कर्फ्यूचा पर्याय स्वीकारण्याचा सल्ला दिला आणि राज्यातील सततच्या वाईट परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.

मात्र केरळच्या या रुग्णवाढीसाठी प्रमुख कारण सांगितले जात आहे ते म्हणजे सण साजरे करण्याच्या हलगर्जीपणा.

कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी इतर राज्यांनी सार्वजनिक ठिकाणी जमा होण्याचे, कोणताही सण-उत्सव साजरे करण्यावर बंदी घातली होती. मात्र, केरळ सरकारने मनाचा मोठेपणा दाखवत ओणम आणि बकरी ईद साजरी करण्यास खूली सूट दिली. या उत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान त्यानंतर रूग्णांच्या संख्येचा आलेखही वाढतच चाललाय.  

महाराष्ट्रात गणेश चतुर्थी आणि दही हंडी सारख्या सणांना साजरी करण्याची मागणी होत असताना देखील, सरकारनं तिसऱ्या लाटेची खबरदारी घेत सन साजरी करण्याच्या आधीच कडक निर्बंध लादलेत. 

सुरुवातीच्या काळात केरळ मॉडेलला देशभरात नावजले गेले. मात्र सध्या सण आणि उत्सव साजरे करण्याच्या नादात केरळने स्वतःला कोरोना रुग्ण संख्येच्या यादीत टॉपला नेऊन ठेवलं आहे.  

सीएसआयआरच्या इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स आणि इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीच्या सर्वेक्षणानुसार,

९५ टक्के नमुन्यांमध्ये डेल्टा व्हायरस आढळला आहे, जो इतर प्रकारांपेक्षा खूपच संसर्गजन्य मानला जातो. डेल्टा व्हेरिएंट असलेल्या रूग्णांना रुग्णालयात दाखल होण्याचा धोका वाढतो आणि ते मृत्यूचे कारण असू शकते. म्हणूनच, २५ ऑगस्ट रोजी भारतात झालेल्या एकूण ६०५ पैकी २१५  आणि २८ ऑगस्ट रोजी भारतात ५०९ मृत्यूंपैकी १७९ मृत्यू एकट्या केरळमधले आहेत.  

देशभरातून केरळ राज्य आयसोलेट करण्याची मागणी होतेय

केरळमधली ही परिस्थिती पाहता इतर राज्यांना आपल्या भागात रूग्ण संख्या वाढण्याची भिती आहे. जी आता कुठं कमी झालीये. कारण पुन्हा जर रुग्ण संख्या वाढली तर अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका बसू शकतो. याच नुकसानाची धास्ती प्रत्येक राज्याने घेतलीये. म्हणूनच अनेक राज्यांकडून मागणी होते की, केरळच्या सीमा तिथली रुग्णसंख्या कमी होईपर्यंत सील करण्यात याव्यात.

तर अनेकांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना ट्विट करून राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याची विनंती केलीये.

आयसीएमआरने केलेल्या सेरो सर्वेक्षणात हे देखील स्पष्ट झालेय की,

केरळमध्ये केवळ ४२.७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आहे, त्यामुळे राज्याची सुमारे ५८ टक्के लोकसंख्या असुरक्षित आहे. आता केरळ सरकारला निर्बंधांत सूट देऊन राजकीय लाभ काय मिळाला हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे, पण यामुळे होणारे नुकसान तितकेच भयानक आहेत.

हे ही वाचं भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.