इराणच्या महिलांप्रमाणे भारतात बुरखा जाळणारी केरळ युक्तिवादी संगम संघटना काय आहे?

स्वतःच्या अंगावरचा बुरखा आणि हिजाब काढून त्यांना जाळणाऱ्या महिला, स्वतःचे केस कापून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या महिला, रस्त्याने जाणाऱ्या मौलानांच्या पगड्या डोक्यावरून खाली फेकल्या जात आहेत. त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या जात आहेत. सध्या असं चित्र इराणच्या अनेक शहरांमध्ये दिसत आहे.

दोन महिन्यापूर्वी इराणमधल्या महसा अमीनी या २२ वर्षाच्या महिलेने बुरखा न घातल्यामुळे इराणच्या मोरॅलिटी पोलिसांनी तिला अटक केली होती. अटकेत असतांना पोलिसांकडून तिला तिला बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांच्या या मारहाणीत महसा अमीनीचा मृत्यू झाला होता त्यानंतर हे आंदोलन सुरु झालं होतं. 

गेल्याअडीच महिन्यांपासून इराणमध्ये चालू असलेल्या या हिजाबविरोधी आंदोलनात आतापर्यंत ३०४ जणांचा मृत्यू झालाय.

पण तरी सुद्धा इराणमधील हिजाबविरोधी आंदोलन मागे घेण्यात आलेलं नाही. इराणच्या महिलांनी सुरु केलेल्या या आंदोलनाला आतापर्यंत जगभरातील अनेक जणांनी पाठिंबा दिला आहे, पण भारतातील  एक संघटना सुद्धा या महिलांच्या समर्थानात रस्त्यावर उतरली आहे आणि या संघटनेकडून बुरखा जाळून मुस्लिम धर्मातील बुरखा पद्धतीचा विरोध केला जात आहे. 

केरळ युक्तिवाद संगम असं या बुरखा जळणाऱ्या भारतीय संघटनेचं नाव आहे.

इराणमध्ये चालू असलेल्या हिजाबविरोधी आंदोलनाला केरळ युक्तिवादी संगमने पाठिंबा दिला आहे. या संघटनेच्या वतीने ७ नोव्हेंबरला केरळमधील कोझिकोडे शहरात असलेल्या टाऊन हॉलच्या समोर बुरखे जाळण्यात आले आहेत.

७ नोव्हेंबरला केरळ युक्तिवादी संगम संघटनेतर्फे कोझिकोडे टाऊनहॉलमध्ये फॅनॉस सायन्स अँड फ्री थिंकिंग नावाच्या सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं. हा सेमिनार संपल्यानंतर त्यातीलच ६ मुस्लिम महिलांनी टाऊन हॉलच्या समोर सामूहिकरीत्या बुरखा जाळला आणि इराणच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. या महिलांनी हिजाब जाळण्याबरोबरच हिजाबच्या विरोधात नारे दिले आणि फलक सुद्धा प्रदर्शित केले. 

एकीकडे भारतातील मुस्लिम विद्यार्थिनींना शाळा कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावर बंदी घालू नये यासाठी  समर्थक सुप्रीम कोर्टात केस लढत आहेत. तर दुसरीकडे केरळमध्ये या ६ महिला बुरखा जाळून मुस्लिम धर्मातील परंपरेचा विरोध करत आहेत.

पण या ६ महिलांनी भारतातील बाकी मुस्लिम महिलांपेक्षा अगदी वेगळी भूमिका का घेतली आहे.

तर यामागचं कारण या महिला ज्या संघटनेच्या सदस्य आहेत त्या संघटनेनेमध्ये दडलं आहे. या महिला केरळ युक्तिवादी संगम संघटनेच्या सदस्य आहेत. ही संघटना केरळमधील नास्तिकतावादी संघटना असून संघटनेमार्फत सर्व धर्मातील वाईट परंपरांचा विरोध केला जातो. म्हणूनच या महिलांनी आज बुरखा जाळला आहे.

या संघटनेचा जन्म केरळच्या नास्तिकतावादी चळवळीतून झाला होता.

२० व्या शतकाच्या सुरुवातीला केरळमध्ये नास्तिकतावादी चळवळ सुरु झाली होती. त्याच्या प्रभावानेच केरळ राज्यात अनेक नास्तिकतावादी संघटनांची स्थापना करण्यात आली होती. या नास्तिकतावादी लोकांपैकी एक असलेल्या सहोधरण अय्यपन यांनी १९६९ मध्ये केरळ युक्तिवादी संगमची स्थापना केली. ही संघटना फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनची सहकारी संघटना आहे.

या संघटनेकडून दरवर्षी वैचारिक स्वातंत्र्यावर सेमिनार घेतले जातात. संघटनेत वेगवेगळ्या धर्मात जन्मलेल्या नास्तिक लोकांचा समावेश आहे. केरळच्या प्रत्येक जिल्ह्यात या संघटनेचे कार्यकर्ते आहेत. संघटनेच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी युक्तिरेखा नावाचं मासिक काढण्यात येतं. यातून विविध  धर्मांमधील वाईट परंपरांच्या विरोधात आवाज उठवणे आणि नास्तिकतेचा प्रसार केला जातो.

आज बुरखा जाळल्यामुळे चर्चेत असलेल्या या संघटनेने यापूर्वी सुद्धा एका मुस्लिम मुलीला हिजाब प्रकरणात समर्थन दिलं होतं.

२०१० मध्ये केरळच्या विद्यानगर शहरात राहणाऱ्या रायन नावाच्या मुस्लिम मुलीने हिजाब घालायला नकार दिला होता. ती मुलगी बंगलोर मध्ये इंजिनियरिंगचं शिक्षण घेत होती. तिला जीन्स पॅन्ट आणि चुडीदार घालायला आवडत होतं, पण तिच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी आणि नातेवाईकांनी तिच्या या कपड्यांवर आक्षेप घेतला होता.

त्यांनी रायनाच्या विरोधात दुष्प्रचार करायला सुरुवात केली होती. रायनाने दुसऱ्या धर्मातील मुलाबरोबर लग्न केलंय असा प्रचार त्यांनी सुरु केला होता. तेव्हा केरळ युक्तिवादी संगमने तिची बाजू घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली होती.

यानंतर पद्मनाभ स्वामी मंदिरातील सोन्याच्या मुद्यावरून सुद्धा ही संघटना चर्चेत आली होती.

२०११ मध्ये पद्मनाभ स्वामी मंदिरात २२ अब्ज डॉलरचा खजाना सापडला होता तेव्हा या संघटनेने खजिन्याचा वापर लोकांच्या कल्याणासाठी करण्यात यावा अशी मागणी केली होती. संघटनेने म्हटलं होतं की, हे मंदिर त्रावणकोरच्या राजघराण्यांकडून चालवलं जात होतं. पूर्वी राजघराणे मोठ्या प्रमाणावर लोकांकडून कर गोळा करायचे, त्याच करातून हा खजाना जमा झाला आहे.

लोकांच्या करातून जमा झालेला हा खजाना संग्रहालयात ठेवण्याऐवजी लोकांना परत करण्यात यावा. यातून लोकांच्या सेवेसाठी काम करण्यात यावं अशी मागणी या संघटनेने केली होती. अशा प्रकारे अनेकदा लोकांच्या अधिकाराच्या मुद्यावरून ही संघटना चर्चेत आली आहे.

ही संघटना जरी ५३ वर्ष जुनी असली तरी या संघटनेचे केरळमध्ये फक्त ४ ते ५ हजाराच्या आसपासच सदस्य आहेत. कारण या संघटनेत सदस्य होण्यासाठी व्यक्तीला पूर्णपणे नास्तिक व्हावं लागतं आणि आयुष्यभर नास्तिक म्हणूनच जगावं लागतं. या संघटनेत सदस्य होण्याचे नियम अतिशय कडक आहेत त्यामुळे या संघटनेची सदस्य संख्या कमी आहे. परंतु सदस्यसंख्या जरी कमी असली तरी ही संघटना लोकांच्या हक्कासाठी पूर्ण ताकदीने काम करत आहे. 

हे ही वाच भिडू  

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.