केसरबाई केरकर मुख्यमंत्र्यांना म्हणाल्या, एका दिवसासाठी मला तुमची खुर्ची द्या.

आज कालच्या पिढीमध्ये केसरबाई केरकर हे नाव ऐकलेले अगदी मोजकेच लोक असतील. आवाज ऐकणे तर खूप लांबच. जर विकिपीडियाला विचारलं तर सांगेल हिंदुस्थानी संगीतशैलीतील जयपूर-अत्रौली घराण्याच्या ख्यातनाम मान्यवर गायिका.

अगदी सध्या भाषेत सांगायचं झालं तर आज आपण लता मंगेशकर, भीमसेन जोशी यांचं जस नाव घेतो त्यांच्या तोडीची किंबहुना त्यांच्याहून काकणभर सरसच असलेली गायिका. त्याकाळी त्यांना भारतातली सर्वश्रेष्ठ मानलं जायचं.

त्यांचा जन्म १३ जुलै १८९२ साली गोव्यातील फोंडा येथे संगीतपरंपरा असलेल्या कुटुंबात झाला.  लहानपणी गावात होणाऱ्या गवळणकाला उत्सवात त्या श्रीकृष्णाची भूमिका करत. त्यांची भूमिका पाहण्यासाठी व गायन ऐकण्यासाठी परगावांहूनही लोक येत असत.

वयाच्या आठव्या वर्षी कोल्हापूर येथील वास्तव्यात त्यांनी किराणा घराण्याचे उ. अब्दुल करीमखाँ यांच्याकडे गायन शिकायला आरंभ केला. भास्करबुवा बखले, रामकृष्णबुवा वझे यांच्याकडून शिक्षण घेतलं. त्या गाणं शिकत होत्या मात्र हौशी म्हणूनच.

एकदा एका गाण्याच्या समारंभात त्यांचा अपमान झाला आणि त्यांनी जिद्दीने शास्त्रीय संगीत शिकायचं ठरवलं. अल्लादियाखाँसाहेबांच्या कडून त्यांनी गंडा बांधून त्यांच्या रीतसर शागीर्द बनल्या.

काही वर्षातच त्यांच्या गायनाची कीर्ती चहूं दिशांना पसरली.

देशभरातील सर्व रसिक स्वरमंचांवर, संगीत समारोहांत एक सिद्धकंठ गायिका म्हणून त्यांना बोलवलं जाऊ लागले. त्या काळातील सर्वाधिक बिदागी घेणाऱ्या कलाकारांत त्यांची गणना होत होती. अनेक संस्थानिकांनी त्यांना दरबारांत पेशकशीसाठी निमंत्रित करून गौरविले.

१९३८ साली कोलकाता येथील अखिल भारतीय संगीत परिषदेत त्यांचा सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून गौरव झाला. संपूर्ण भारतभर त्यांच्या गायनाचे चाहते होते, ज्यांत कविश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर यांचाही समावेश होतो. त्यांच्या सूचनेनुसार १९४८ साली कोलकता येथील ‘संगीत प्रवीण संगीतानुरागी सज्जन सन्मान समिती’तर्फे केसरबाईंना ‘सूरश्री’ हा किताब बहाल करण्यात आला.

केसरबाई अत्यंत मानी होत्या. हा स्वभाव अनेकांना सकृद्दर्शनी आत्मप्रौढीचा वाटे. मात्र कोणत्याही बाबतीत सवंगपणा, हीणकसपणा त्यांना मान्य नव्हता. व्यावसायिक ध्वनिमुद्रणे, रेडिओवरून गायन त्यांना पसंत नव्हते. अगदी माईकशी देखील त्यांना वावडे होते.

यामुळेच त्यांच्या आवाजाच्या रेकॉर्ड्स आज खूप दुर्मिळ आहेत.

केसरबाईंच्या स्वभावाचा अनेकदा रसिकांना देखील फटका बसायचा. त्यांच्याबद्दल किस्सा सांगितला जातो की त्या एखाद्या कार्यक्रमाला गेल्या की सोबत एक यादी घेऊन यायच्या. त्यात काही नावे लिहिलेली असायची. केसरबाई म्हणायच्या

ती माणसे जर असतील तर मी गाणार नाही.

आणि खरोखर त्या माणसांना हाकलून लावलं जायचं. एकदा एक मोठे मंत्री त्यांच्या कार्यक्रमाला आले होते. ते श्रोत्यांच्या पहिल्या ओळीत बसले होते. गाणं सुरु होतं आणि मंत्रीमहोदयांचे पीए आणि काही अधिकारी दर थोड्या वेळाने त्यांच्या जवळ येऊन कसल्याशा कागदावर सही घेत होते.

केसरबाईंनी एक दोनदा पाहिलं आणि तिसऱ्यांदा त्यांनी थेट मंत्रीमहोदयांना खडसावलं,

“जर आपण महत्वाच्या कामात असाल तर बेशक उठून जाऊ शकता. “

त्यांच्या आवाजात एवढी जरब होती की त्यानंतर कार्यक्रमात कोणीही जागचं देखील हललं नाही.

असाच एक किस्सा यशवंतराव चव्हाणांच्या बाबतीतही घडला होता. केसरबाईंच्या शिष्योत्तमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोंडुताई कुलकर्णी यांनी या आठवणी एकेठिकाणी सांगितल्या आहेत.

त्या काळी यशवंतराव मुख्यमंत्री होते. नुकताच नेहरूंनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश त्यांच्याकडे सोपवला होता. महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव स्थानापन्न होणार होते. फक्त त्यांच्या आयुष्यातला नाही तर संपूर्ण राज्यासाठीचा हा सर्वात मोठा दिवस.

यशवंतराव जेव्हा पदभार स्वीकरण्यासाठी मुंबईच्या सचिवालयात गेले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम केसरबाईंना आमंत्रण दिलं.

ते केसरबाईंच्या गायनाचे प्रचंड मोठे चाहते होते. केसरबाईंना देखील यशवंतरावांच्या बद्दल आदर होता. आमंत्रण मिळताच त्या मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये आल्या. यशवंतराव प्रचंड खुश होते. ते आनंदाच्या भरात केसरबाईंना म्हणाले,

“केसरबाई आपल्या महाराष्ट्राचं इतक्या वर्षाचं स्वप्न पूर्ण होत आहे. आपण त्याचे साक्षीदार आहे. आज तुम्ही या मुख्यमंत्र्यांकडे काहीही मागा. मी नाही म्हणणार नाही. “

केसरबाई म्हणाल्या, “खरंच म्हणताय का? ”

यशवंतरावांनी त्यांना आश्वासन दिल कि त्या जे काही मागतील ती मागणी तुरंत पूर्ण करण्यात येईल. यावर केसरबाई ठसक्यात म्हणाल्या,

“असं असेल तर मला एक दिवसासाठी मुख्यमंत्री करा. “

त्यांची हि विचित्र मागणी ऐकून यशवंतरावांना आश्चर्याचा धक्का बसला. यातून सावरत ते म्हणाले,

“तुम्ही काय करणार मुख्यमंत्री बनून? मला काम सांगा मी ते पूर्ण करतो. ”

केसरबाई हसल्या आणि मान हलवत त्यांनी सांगितलं,

“राहू द्या. फक्त पुढच्या वेळपासून जे झेपत नाही ती आश्वासने देऊ नका.”

यशवंतराव थक्क झाले. मात्र काहीही झालं तरी त्यांच्या मनात केसरबाईंच्या बद्दल कधी कटुता आली नाही. कलाकार हे मनस्वी असतात, त्यांची विचार करण्याची जातकुळीच वेगळी असते हे यशवंतरावांना ठाऊक होतं. म्हणूनच महाराष्ट्र सरकारतर्फे केसरबाईंना राज्य गायिकेची उपाधी देण्यात आली.

केसरबाईंना पदमभूषण सन्मान देखील मिळाला होता. या समारंभासाठी त्या दिल्लीला गेल्या होत्या. राष्ट्रपती भवनात त्यांची भेट तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींशी झाली. इंदिराजी त्यांना पाहून भारावून गेल्या होत्या. त्यांनी केसरबाईंना त्यांच्या कंठाला स्पर्श करू देण्याची विनंती केली. जेणेकरून केसरबाईंच्या प्रतिभेचा काही अंश आपल्यात उतरेल.

यावर केसरबाई उतरल्या,

“तुम्हाला याची काय गरज? तसंही तुम्ही आरडाओरडाच करता “

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.