राजस्थानला जगभरात पोहचवलं ते अल्लाह जीलाई यांच्या केसरिया बालम गाण्याने…

जगात कितीही नवनवे music जॉनर येऊ द्या, पॉप,डिस्को,रॉक,रेगे वैगरे पण लोकगीते आणि लोकसंगीत यांचा विषयच नाद खुळा असतो. लोकगीताच वैशिष्ट्य हेच असतं की ते तुम्हाला मातीतील अस्सल रांगड्या शब्दांची आणि संगीताची झलक दाखवतं. महाराष्ट्रात स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे, शाहीर विठ्ठल उमप, आनंद- मिलिंद शिंदे, छगन चौगुले आणि बऱ्याच गायकांनी लोकगीतांचा घाट घातला आणि मराठी भाषेची आणि मराठी संस्कृतीची जादू दाखवून दिली. आता तूर्तास विषय महाराष्ट्राचा नाहीए तर विषय आहे राजस्थानचा. एका गाण्यामुळे, एका लोकगीतामुळे जगभर राजस्थान फेमस झालं होतं, याचं सगळं क्रेडिट एका आजीबाईला जातं त्याबद्दलचा हा किस्सा.

कदाचित तुम्ही राजस्थानला कधी भेट दिली नसेल. पण राजस्थान या ना त्या मार्गाने तुमच्याकडे आलेच असेल हे निश्चित. कधी दाल-बाटी चुरमा सारख्या मोहक पदार्थाच्या रूपात तर कधी ‘केसरिया बालम’ सारख्या लोकप्रिय गाण्याच्या सुरात. आता हे केसरिया बालम गाणे या राज्याची ओळखच नाही तर आन, बान, शान सर्वकाही बनले आहे. पण सध्या देशाच्या आणि जगाच्या अनेक लोकांच्या ओठांवर असलेलं हे गाणं गाण्यांचं श्रेय कुणाला जातं माहीत आहे का? नाही, तर मग आज आपण याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊ.

‘केसरिया बालम’चा खरा अर्थ काय?

केसरिया बालम’ हे राजस्थान राज्याचे लोकगीत आहे. हे राज्यातील सर्वात लोकप्रिय लोकसंगीत आहे, जसं महाराष्ट्राची ओळख गर्जा महाराष्ट्र आहे आणि त्यातून महाराष्ट्राचं वर्णन केलेलं आहे त्याच प्रमाणे केसरिया बालम हे राजस्थानी folk मध्ये गायलेलं गाणं आहे. हे गाणं मान गायन शैलीत गायलेलं आहे. ‘ केसरिया ‘ चा प्रतीकात्मक अर्थ उत्तम आरोग्य आणि सौंदर्य असा आहे. ‘बालम’ हा शब्द पती किंवा प्रियकरासाठी वापरला जातो. या गाण्यात राजस्थानी स्त्रिया त्यांच्या पतीला किंवा प्रियकराला त्यांच्या मायदेशी येऊन पाहण्याचे आमंत्रण पाठवत आहेत.

या गाण्याला आवाज कोणी दिला?

न जाणो किती शतके राजस्थानच्या मातीत राहणाऱ्या ‘केसरिया बालम’ला अल्लाह जिलई बाईंनी आपला आवाज दिला. राजस्थान आणि जगभरात केसरिया बालम आजही लोकांच्या तोंडपाठ आहे. म्हणजे राज्य आणि प्रांताच्या सीमा ओलांडून हे गाणं अनेक ठिकाणी आवडीने गायलं जातं. आता या गाण्याला फेमस करणाऱ्या गायिका अल्लाह जीलाई बाई यांच्याबद्दल जाणून घेऊया. 1 फेब्रुवारी 1902 रोजी बिकानेर येथे जन्मलेल्या अल्लाह जिलाई बाई या राजस्थानच्या प्रसिद्ध लोकगायिका होत्या. त्यांनी उस्ताद हुसेन बक्ष खान यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले.

अशा अल्लाह जिलईबाईंचे कौशल्य फुलले

याशिवाय अल्लाह जिलाईबाई यांना प्रशिक्षित गायिका बनवण्याचे श्रेय बिकानेरचे महाराज गंगा सिंग यांना दिले तर अतिशयोक्ती होणार नाही. ती फक्त 10 वर्षांची असतानाच महाराजांनी तिची प्रतिभा ओळखली. त्यानंतर त्यांना संगीताच्या उत्तम जाणकारांकडून प्रशिक्षण देण्यात आले. योगायोगाने, अल्लाह जिलाईबाईंनी महाराजा गंगा सिंह यांच्या दरबारात पहिल्यांदा ‘केसरिया बालम’ गायले. तेव्हा राजस्थानची नापीक जमीन जिलाईबाईंच्या स्वरांच्या नद्यांमध्ये बुडाल्यासारखे वाटले.

कालांतराने अल्लाह जिलईबाई संगीतात पारंगत झाल्या. त्यांच्या गुरूंकडून त्यांनी मान, ठुमरी, ख्याल आणि दादरा या सर्व प्रकारांमध्ये गाणे शिकले. हा बहुधा त्याच गंगा-जमुनी तहजीबचा चमत्कार असावा ज्याने इस्लाम धर्माच्या बाईजींचा आवाज मिळाल्यावर ‘हिंदू भगवा’ अधिकच त्वेषाने फुलून धार धरू लागला होता.

भारत सरकारने पद्मश्री देऊन गौरव केला

महाराजा गंगासिंग यांच्या निधनानंतर अल्लाह जिलाईबाईंनी त्यांच्या कलेला अधिक महत्वाचं स्थान दिलं. परिणामी, त्यांनी ऑल इंडिया रेडिओवरून आपले गायन सादर करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे त्यांचा आवाज देशात आणि जगात लोकप्रिय झाला. लोक त्याची गाणी मोठ्या आवडीने ऐकू लागले. 1982 मध्ये, भारत सरकारने त्यांना संगीतातील अतुलनीय योगदानासाठी पद्मश्री देऊन सन्मानित केले. आज ‘केसरिया बालम’ या गाण्याचे अनेक व्हर्जन आले आहेत. पण अल्लाह जिलईबाईंनी गायलेल्या या गाण्याची स्पर्धा कोणीच नाही.

यावरून लोकसंगीत आणि लोकगीतांची जादू कळते, रिमिक्सच्या जगात वावरणाऱ्या तरुणाईला एका फटक्यात मातीचं आणि संस्कृतीचं महत्व पटवून देण्यासाठी फक्त एक लोकगीत पुरेसं असतं. अल्लाह जीलाई बाई यांच्या आवाजातील केसरिया बालम आजही राजस्थानच्या घराघरात वाजतं.

हे ही वाच भिडू :

English summary: Earliest available recording of this song written by unknown and sung by singer Allah Jilai Bai. The song was also used in the Hindi film, Lekin… (1991) set in Rajasthan, as Kesariya Balma, in which it was sung by Lata Mangeshkar, set to music by Hridaynath Mangeshkar. It was used in the Hindi film Dor. It was also used in the title of TV series, Kesariya Balam Aavo Hamare Des.

 

Web Title: Kesariya Balam Rajasthan folk song history

Leave A Reply

Your email address will not be published.