सदावर्तेंप्रमाणे केतकी चितळेलाही महाराष्ट्र दर्शन करावे लागणार का..?
सोशल मीडियावर पोस्ट करतांना, कमेंट आणि लाईक करतांना जरा जपूनच राहा हे आम्ही याआधीही सांगितलं..आणि हे सांगण्याचं निमित्त म्हणजे, केतकी चितळे.
केतकी चितळे तिच्या एका फेसबुक पोस्टमुळे अडचणीत सापडली. तिच्यावर गुन्हा दाखल झाला अन सध्या ती अटकेत आहे. बरं तिच्यावर एक गुन्हा नाही तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात आत्तापर्यंत १२-१३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याचमुळे काही लोकांना आता गुणरत्न सदावर्तेंची आठवण होतेय. कारण सदावर्तेंवर देखील महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात गुन्हे दाखल होते.. त्यामुळे एका केसनंतर दुसरी केस, एका जेलनंतर दुसरं जेल असं महाराष्ट्र दर्शन सदावर्तेंना घडलं होतं.
आता केतकी चितळेवर देखील १२-१३ गुन्हे दाखल आहेत त्यामुळे तिलाही सदावर्तेंप्रमाणे महाराष्ट्र दर्शन करावे लागणार का ?
त्याबद्दल कायदा काय सांगतो, हे जाणून घेऊया….
या प्रकरणाचा घटनाक्रम थोडक्यात बघूया…
१३ मे च्या रात्री केतकी चितळेने राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात एक फेसबुक पोस्ट केली. त्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत..सोशल मीडियावर वाद सुरु झाला. तिच्यावर कारवाईची मागणी होऊ लागली.
दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीच्या स्वप्नील नेटके यांच्या तक्रारीनंतर कळवा पोलीस ठाण्यामध्ये. कलम ५००,५०५ (२),५०१ आणि १५३ A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. एकीकडे कळवा पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद झाला असतानाच दुसरीकडे समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिटकडून सुरु होता..
रात्री उशिरा तिचा ताबा ठाणे पोलिसांनी घेतला. नंतर तिला कळंबोली पोलीस ठाण्यात नेण्यात आले…आणि तिला अटक करण्यात आली. याचदरम्यान कळंबोली पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी केतकीच्या अंगावर अंडी आणि शाईफेक केली होती.
- १५ मे रोजी सकाळी केतकीला ठाणे कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळेस गोरेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील केतकीचा ताबा घेण्यासाठी ठाणे कोर्टात हजर झाले होते.
मात्र ती सद्या ठाणे पोलिसांच्या ताब्यात आहे. तिने केलेल्या पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. ठाणे गुन्हे शाखेने ५ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली. त्यानुसार, १८ मे पर्यंत केतकीला पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे..
विशेष म्हणजे कोर्टात केतकीने वकील घेतला नाही, तिनं स्वतः असा कोर्टात युक्तिवाद केला की,
“ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? मी ती पोस्ट डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे, असंही तिनं कोर्टासमोर म्हटलंय.
१५ मे रोजी दिवसभर राज्याच्या विविध भागात राष्ट्रवादीकडून केतकीविरोधात आंदोलनं करण्यात आलीत. या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया आल्या..राष्ट्रवादी पक्षातील नेतेच नाही तर देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंपासून ते सुजात आंबेडकर पर्यंत सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी केतकीवर टीका केली आहे.
आता बघूया केतकीवर आतापर्यंत कुठे कुठे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
१४ मे ते १६ मे च्या दरम्यान सर्वात पहिला गुन्हा ठाण्यातल्या कळवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला. त्यानंतर मुंबईतील गोरेगाव, पवई, अमरावती, नाशिक, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद,सातारा, तर पुण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. असे एकूण १२ गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत.
सदावर्तेंप्रमाणे केतकी चितळेलाही एका केसनंतर दुसरी केस, एका जेलनंतर दुसरं जेल असं महाराष्ट्र दर्शन करावे लागणार का ?
याबद्दलचा कायदा समजून घेण्यासाठी बोल भिडूने कायदेतज्ञ् असीम सरोदे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,
“प्रत्येक दखलपात्र गुन्ह्यांच्या संदर्भातला FIR हा प्रत्येक पोलीस स्टेशनचा वेगवेगळा आणि स्वतंत्र असा असतो. जिथे-जिथे केतकीवर FIR दाखल आहे तिथले पोलीस तिला चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकतात. ती व्यक्ती दोषी आहे कि नाही हे लोकल कोर्ट किंव्हा हाय कोर्ट ठरवत असतं. एकदा का FIR दाखल झाली तर पोलिसांना देखील FIR मागे घेण्याचा अधिकार नसतो.
“गुणरत्न सदावर्ते आणि केतकी चितळे यांच्या केसची तुलना करायची झाल्यास, सदावर्तेंवर वेगवेगळे गुन्हे वेगवेगळ्या जागी दाखल झाले होते. त्यातल्या काही गुन्ह्यांना जुना संदर्भ होता. त्यामुळे हे प्रकरण वेगळं होतं. केतकी चितळेच्या प्रकरणात एकाच गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे”.
“एकाच गुन्ह्यासाठी जर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हा दाखल झाल्यास तर त्याबद्दलचा निर्णय हाय कोर्ट घेत असते तसेच, वेगवेगळ्या जिल्ह्यात दाखल झालेले गुन्हे एकाच जागी लढवायचे की, सगळे FIR रद्द करून एकाच कोर्टात केस चालवायची हे देखील ठरविण्याचे अधिकार हाय कोर्टाला असतात. त्यामुळे या सगळ्या FIR च्या संदर्भांत केतकी चितळे हाय कोर्टात दाद मागू शकते” अशी माहिती सरोदे यांनी दिली.
तर आत्तापर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्यांवरून आणि त्याबाबत कायदेतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीवरून तरी असंच दिसतंय गुणरत्न सदावर्तेंप्रमाणे केतकी चितळेलाही महाराष्ट्र दर्शन करावं लागू शकतं…
केतकी चितळेची १८ मे रोजी पोलीस कोठडी संपणार आहे. त्यानंतर तिला पुन्हा दुसऱ्या पोलीस स्टेशनचे अधिकारी चौकशीसाठी ताब्यात घेणार का ? हे प्रश्न समोर येतायेत…केतकीची अटक मालिका तयार होऊन तिला महाराष्ट्रातील वेगवेगळे कारागृह पाहण्याची संधी मिळणार असं बोललं जातंय..
केतकी चितळे लवकरच यातून सुटणार कि तिच्या अडचणी आणखी वाढणार, हे पाहणं महत्वाचं आहे.
हे ही वाच भिडू :
- “डिजिटल रेप” च्या केसमध्ये 81 वर्षाच्या म्हाताऱ्याला अटक, पण काय असतो डिजिटल रेप..?
- यापुर्वी “नवबौद्ध ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात” असा आरोप केतकीने केला होता..
- UAE हा देश आणि सात किंगडम, नव्या राष्ट्रपतींच्या पार्श्वभूमीवर त्यांची सिस्टीम समजून घ्या..