७५० चा शेअर ११,००० हजारांवर घेवून जाणारा केतन पारेख लय हूशार माणूस होता.

माणसं कांड करतात. लोकांना गंडवतात. संपुर्ण सिस्टिम कोळून पितात. चालत्या बोलत्या माणसाला बाजारात विकून येण्याची धमक दाखवतात. पण एखाद्या कांडात ते गंडतात. लोकांना त्यांचा खरा चेहरा कळतो. पैशात फसवणाऱ्या लोकांना इज्जत नसते. केतन पारेखचं नाव निघालं तर माणसं लगेच बोटं मोडायला घेतात. त्यानं इकॉनॉमिला अश्व लावला हे सर्वसामान्य मत असतं.
पण अशा लोकांच्या हूशारीचे किस्से ऐकली, त्यांच्या फसवण्याच्या पद्धती वाचल्या की तीच बोटं तोंडात घालावी लागतात.
शेअर मार्केटमधील घोटाळे जेव्हा आपण वाचू लागतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की बऱ्याच लोकांनी नियम तोडून नाही तर नियमातल्या पळवाटा शोधून पैसा कमावला. हीच हुशारी केतन पारेखने दाखवल.
केतन पारेखमध्ये काय दम होता तर पुढे काही शेअर्सच्या किंमती सांगतो.
केतन पारेखनं पेन्टाफूल सॉफ्टवेअरच्या शेअर्सची किंमत १७५ पासून २,७०० पर्यन्त नेली होती. ग्लोबल टेलिसिस्टीमचा शेअर्स ८५ रुपयापासून ३१०० रुपये तर एचएफसीएलचा शेअर्स ४२ रुपयांपासून २३०० रुपयांपर्यन्त नेला होता. शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना शेअर्सच्या एक पैशाची तफावत देखील किती कोटींची उलाढाल करु शकते याची जाणीव आहे.
अशा वेळी एक माणूस फक्त आपल्या अक्कलहूशारीवर झी चा साडेसातशेचा शेअर्स अकरा हजारांवर घेवून जातो याला काय म्हणाल,
केतन पारेख नेमकं काय करायचां…?
त्यापुर्वी केतन पारेख नेमका कोण होता हे आपण समजून घेतलं पाहीजे. केतन पारेख हर्षद मेहताच्या तालमीला पहिलवान. पण या दोघांत फरक होता. हर्षद मेहता रिटेल इन्व्हेस्टरवर प्रभाव पाडायचा तर केतन पारेख इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरवर प्रभाव पाडायचा. आत्ता रिटेल आणि इन्स्टिट्यूशनल यात फरक काय तर,
तूम्ही, आम्ही किंवा कोणताही व्यक्ती व्यक्तिगतरित्या शेअर मार्केटमध्ये शेअर्स विकत घेतो तेव्हा त्याला रिटेल इन्व्हेस्टर म्हणतात. आणि इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे शासनाची UTI, म्युचुअल फंडवाल्या कंपन्या मोठ्या प्रमाणात संस्थेसाठी म्हणून शेअर्स खरेदी करतात त्याला इन्स्टिट्यूशनल शेअर्स इन्व्हेस्टर म्हणायचं.
आत्ता या दोन प्रकारात केतन पारेख दूसऱ्या प्रकारात मोडायचा.
तो काय करायचा तर दूसऱ्यांच्या मार्फत इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंगमध्ये शेअर्स घ्यायचा. युटीआय अर्थात युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया सारख्या संस्थामार्फत तो शेअर्स विकत घ्यायचा. आत्ता मुख्य फरक लक्षात घ्या, केतन पारेख स्वत:च्या खिश्यातल्या पैशातून शेअर्स घेत नव्हता तर तो मोठ्या संस्थांसाठी त्यांच्या पैशातून शेअर्स घ्यायचा. थोडक्यात सोप्प सांगायच झालं तर अशा संस्थांना कुठे पैसे लावायचे यासाठी मदत करायचा.
इथपर्यन्त काहीच अडचण नव्हती. पण केतन पारेखनं हे सगळं कांड करताना पम्प आणि डम्प सिस्टिमचा वापर केला.
म्हणजे नेमकं तो काय करायचा तर समजा, त्याने UTI साठी 1000 हजार कोटींचे शेअर्स विकत घेतले तर तो तिथेच थांबायचा नाही. तर तो काय करायचा. स्वत:च्या कंपनीमार्फत पण शेअर्स घेवून ठेवायचा. शेअर्सची मागणी वाढली आहे अस दाखवायचा. शेअर्स मोठ्या रकमेपर्यन्त वाढला की स्वत:कडचे शेअर्स विकायचा. शेअर्स प्रमोट करणं बंद करायचा आणि शेअर्स गडगडायचे. यात UTI, संस्था यांच नुकसान व्हायचं पण केतन पाऱेख चांगल घबाड मारून जायचा.
शेअर्सच्या किंमती कशा वाढवायचा.
तो ज्या कंपन्याच्या किंमती वाढवत होता त्या कंपन्यांनी K-10 म्हणून ओळखलं जातं. पहिल्यांदा त्यानं अशा कंपन्या निवडल्या होत्या ज्यांना खरोखरचं मार्केटमध्ये किंमत आहे. 1997 ते 2001 चा काळ हा मार्केटमध्ये डॉट कॉम बूम म्हणून ओळखला जातो. म्हणजे या काळात टेलिकॉम क्षेत्रातल्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढत होते. याचा फायदा त्याने घेतला व अशाच कंपन्या निवडल्या.
त्यामध्ये ठरावीक पैशांची गुंतवणूक केल्यानंतर त्याने शेअर्स प्रमोट करण्यास सुरवात केली. थोडक्यात आत्ता तो दूसऱ्यांना सांगू लागला शेअर्स घ्या. शेअर हे काय बाजारातून जांभळ घेण्यासारखा प्रकार नाही. यासाठी विश्वास पाहीजे असतो. केतन पारेखने त्यासाठी शेअर्सचा व्हॉल्यूम वाढवायचा प्रकार सुरू केला. शेअर्सचा व्हॉल्यूम म्हणजे दिवसभरात शेअर्सची किती खरेदी विक्री होते त्यावर त्याचं वजन ठरतं.
केतन पारेखने त्यासाठी स्वत:च्या २० हून अधिक कंपन्या काढल्या होत्या. या कंपन्याच्या मधून तो सर्क्युलर ट्रेडिंग करायचा. म्हणजे त्याच्याच एका कंपनीने झी वाल्यांचे दोन हजार शेअर्स घेतले तर दूसरी कपंनी त्याच टायमिंगला त्याच दराने तीतकेच शेअर्स विकायची. यामुळे शेअर्सचा व्यवहार तर पुर्ण होत असायचा. त्यामुळे नुकसान न होता शेअर्सची खरेदी विक्री दाखवली जायची.
त्यामुळे गुंतवणूकदारांना शेअर्सची उलाढाल वाटायची व शेअर्सची मागणी वाढायची. कायम मागणी वाढवत घेवून जाणं जेणेकरून शेअर्सची किंमत वाढेल एवढ एकच काम पारेख साहेबांच्या डोक्यात असायचं.
अशा प्रकारे शेअर्सच्या किंमती फूगवत नेवून तो पैसे कमवायचा. तो हे सगळं काम इतक्या बारकाईनं करायचा की कुठल्या शेअर्सला मिडीया अटेन्शन मिळतं त्याचा विचार करुन देखील तो आपले डावं टाकायचा.
आत्ता वरकरणी या काय काळंबेरं वाटतं नसलं तरी पम्प आणि डम्प ही सिस्टीम गंडवागंडवीच आहे. त्याचा हा गुत्ता तसा सापडला पण नसता जर पुढचा खेळ झाला नसता.
आत्ता केतन पारेखनं स्वत:च्या वीस एक कंपन्या काढलेल्या ते तर कळलं पण तो पैसे कुठणं आणायचा.
केतन पारेखनं यासाठी पे ऑर्डरचा वापर करुन घेतला. त्यांचे दोन बॅंकाबरोबर लागेबांधे होते. ग्लोबल ट्रस्ट बॅंक आणि माधवपूरा मर्केंन्टाईन को-ऑपरेटिव्ह बॅंक. पैकी माधवपूरा बॅंकेचा तो प्रमोटर पण होता. पे ऑर्डरची सिस्टीम काय असायची तर तूम्ही समजा तूम्ही ५० कोटींचे शेअर्स बॅंकेकडे ठेवले तर बॅंक तुम्हाला दहा एक कोटीचे कर्ज द्यायची. त्यासाठी पे ऑर्डर काढली जायची. थोडक्यात दहा कोटीचा चेक सारखा कागद. माधेपूरा बॅंकेची ही पे ऑर्डर मुंबईच्या शेअर मार्केटमधल्या बॅंक ऑफ इंडियामध्ये द्यायची. मग ते तिथे तुम्हाला पे ऑर्डरची रक्कम द्यायचे. ही रक्कम 3-4 दिवसात बॅंका आपआपल्यात क्लिअरन्स करत असायच्या.
इथं RBI चा एक नियम होता, तो म्हणजे कोणालाही शेअर्सवर १५ कोटींहून अधिक कर्ज दिलं जातं नसे. पण पारखे साहेबांनी बॅंकेच्या अधिकाऱ्यांना घोळात घेवून ५०० कोटींच्या वरती कर्ज काढलं होतं.
अशातच एक दिवस त्याचा फूगा फुटायची वेळ आली.
२००१ मध्ये ़डॉट कॉम बूम फुटायला लागला.
पारेखने फुगवलेल्या शेअर्सची किंमत कमी होवू लागली. पण पाऱेख साहेबांनी तरिही लावून धऱलेलं. ते टिचून होते. अशातच पारेख साहेबांनी 137 कोटींची पे आर्डर माधोपूरा बॅंकेतून उचलली. नेहमीप्रमाणे ती बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत देवून तिथून ते पैसे आपल्या इतर कंपन्यात वळते केले. आपल्या २० कंपन्यातून ते पैसे फिरवून शेअर्समध्ये गुंतवले. अस केल्यामुळे पैशाचा सोर्स कळत नाही.
पण जेव्हा दोन बॅंकाच्या क्लिअरन्स वेळ आली तेव्हा माधोपूरा बॅंकेने हात वर केले. जमत नाही म्हणून सांगितलं. बॅंक ऑफ इंडिया इकडं पारेख साहेबांना पैसे देवून बसली होती. त्यांनी पारेख साहेबांना 137 कोटी द्यावेत म्हणून सूचना केली. पारेख साहेबांनी 20 कंपन्यातून पैस फिरवून ते शेअर्स मध्ये टाकून रिकामे देखील झालेले. पाऱेख साहेबांनी बॅंक ऑफ इंडियाला 7 कोटी दिले. बॅंकेने 130 कोटींना फसवल्याची तक्रार पारेख साहेबांवर टाकली आणि बाझार उठला.
केतन पारेख घोटाळा बाहेर आला. चर्चा सुरू झाल्या, शेअर्स पुन्हा कोसळू लागले. पाच दहा हजारांवर गेलेले शेअर्स पुन्हा पन्नास रुपयांवर आले. यात UTI 3,000 रुपयांना गंडली. म्हणून केतन पारेखनं 3,000 कोटींचा गैरव्यवहार केल्याचं सांगितलं जातं.
केतन पाऱेखला अटक करण्यात आली. दोन वर्षांची जेल झाली. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला बंदी घालण्यात आली वगैरे वगैरे गोष्टी झाल्या. पण त्याहून भारी म्हणजे मार्केटमध्ये अजून एकानं आपलं नाव बिलंदर म्हणून कोरून टाकलं.
हे ही वाच भिडू.
- राकेश झुनझुनवाला : त्यांनी दोन दिवसात ६१८ कोटी कमावले आहेत.
- हर्षद मेहता : मुंबईत चाळीस रुपये घेवून आलेल्या पोराने पाच हजार कोटींचा घोटाळा करुन दाखवला.
- डी मार्ट खरच दाऊदचं आहे काय..?