शंभर वर्षांपूर्वी या माणसाने मराठीतला पहिला विकिपिडिया बनवला होता

आजकालच्या डिजिटल युगात माहितीचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे विकिपीडिया. कोणाचंही कुळमूळ, इतिहास याचा सातबारा काढायचा असेल तर सगळ्यात पहिला आपण विकीला विचारतो.

महाराष्ट्रात सुद्धा १०० वर्षांपूर्वी एक विकिपीडिया तयार झाला होता ज्याचा वापर आजही होतो. या मराठी विकिपीडियाच नाव केतकर ज्ञानकोश.

याचे निर्माते होतेश्रीधर व्यंकटेश केतकर.

ते मूळचे कोकणातील दाभोळ जवळच्या अंजनवेल या गावचे. वडिलांच्या पोस्टाच्या नोकरीमुळे लहानपण फिरती मध्येच गेले.  त्यांचा जन्म २ फेब्रुवारी, इ.स. १८८४ रोजी ब्रिटिश भारतात रायपूर येथे झाला. त्यांचे शिक्षण अमरावती व विल्सन कॉलेज, मुंबई येथे झाले.

त्याकाळी अमेरिकेतील विद्यापीठात शिक्षण मोफत होत असे. अनेक खटपटी करून श्रीधरपंत केतकर ते उच्चशिक्षणासाठी अमेरिकेस गेले. तेथील कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी डिग्री घेतली. याच विद्यापीठात त्यांनी भारतीय जातीसंस्थेचा इतिहास हा प्रबंध लिहिला, तिथे त्यांना पीएच.डी. मिळवली.

इंग्लंड अमेरिकेत मोठ्या पगाराची नोकरी मिळत असताना डॉ.केतकर यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.

भारतात ते कलकत्ता विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पण तिथेही आपल्या स्वतंत्र बाण्याच्या वृत्तीमुळे जास्त काळ टिकले नाहीत. यानंतर पुण्याला येऊन  मराठी ज्ञानकोशाचे शिवधनुष्य उचलण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

ते साल होते १९१६.

इंग्लंड मधील एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या धर्तीवर मराठी इतिहासाचा एक लेखी आढावा असावा हे त्यांचे स्वप्न होते. त्याकाळी कोणत्याही भारतीय भाषेत अजून हे प्रयत्न झाले नव्हते.

एनसायक्लोपीडियाला समानार्थी ज्ञानकोश हा शब्दही श्रीधर केतकर यांचाच.

मराठीतल्या अनेक मान्यवर लेखक, इतिहासकार यांची केतकर यांनी भेट घेतली. पण सगळ्यांनी त्यांना नकार दिला. इतिहास संशोधक वि.का. राजवाडे यांनी तर त्यांना थेट सांगितले,

” हे कार्य इतके अवाढव्य आहे की त्याच्यासाठी एखाद्याची अख्खी हयात खर्च होईल.”

पण केतकरांनी प्रयत्न करायला काय हरकत आहे असे म्हणत ज्ञानकोशाच्या निर्मितीला एकट्यानेच सुरवात केली.

कोणताही मान्यवर विद्वान सोबत नसताना तरुण सहकारी गोळा करून पुढची १२-१५ वर्षे या प्रचंड कामाच्या संशोधन व लिखाणाला वाहिली.

असे म्हणतात की कमीतकमी काळात ज्ञानकोश लिहून व्हावा, म्हणून केतकर यांनी दोन्ही हातांनी लिहायची सवय ठेवली होती.

डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हे त्यांच्या ज्ञानकोशांचे प्रमुख संपादक होते. ज्या काळात केतकरांनी ज्ञानकोशाच्या २३ खंडांचे काम केले तो काळ १९१६ ते १९२८ हा आहे. ह्या काळात खुद्द लोकमान्य टिळकांनी सुद्धा त्यांना ‘हे काम फार मोठे आहे, एका माणसाचे हे काम नाही’ अशा प्रकारचा सल्ला दिला होता.

पण केतकरांचा निर्धार पक्का होता.

ज्ञानकोशनिर्मितीसाठी लागणारा अवाढव्य खर्च केतकर यांनी स्वतःच्या खिशातले सगळी गंगाजळी वापरून उचलला.

दरम्यानच्या काळात १९२० साली त्यांचा विवाह इंडिथ व्हिक्टोरिया कोहन या जर्मन ज्यू तरूणीशी पुण्यात झाला. विवाहानंतर तिला शीलवती हे नाव मिळाले. कम्पॅरिटिव्ह रिलिजन्स’ या विषयांत त्यांनी पदवी संपादन केली होती.

ज्ञानकोश निर्मितीचे कार्य युद्धगतीने सुरू होते.

त्यांचे सहकारी चिं. ग. कर्वे, य. रा. दाते, सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांना ज्ञानकोशाची छपाई करणाऱ्या छापखान्यातील जुळारी काम करणाऱ्या कामगारांनी विनंती केली, की आम्ही ज्ञानकोश तयार करतोय; पण आमचे शिक्षण अपूर्ण आहे.

त्यावरून या मान्यवरांनी दिवसा काम करणाऱ्या व्यक्तींसाठी रात्री शिक्षण देणारे पूना नाइट हायस्कूल आणि मातृसंस्था सरस्वती मंदिर संस्थेची १ ऑगस्ट १९२०ला स्थापना केली.

डॉ. श्रीधरपंत केतकर यांनी खेडोपाडी फिरून बैलगाड्यांमधून कागदपत्रे, संदर्भग्रंथ गोळा केले. महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या कार्यामुळे ज्ञानकोशकार केतकर या नावानेही ते ओळखले जाऊ लागले.

केतकरांनी अनेक अडथळे पार केले. निर्धाराला चिकटून सर्व संकटांवर मात करीत त्यांनी १२ वर्षांमध्ये हा २३ खंडाचा ऐतिहासिक प्रकल्प पूर्ण केला. एकट्याच्या जीवावर प्रकाशित केला.

रेल्वेच्या डब्यात ज्ञानकोशाचे गठ्ठे घेऊन त्यांनी फिरून त्याची विक्री केली.

ज्ञानकोशनिर्मितीच्या कार्यात कफल्लक झालेल्या केतकरांचा वयाच्या केवळ ५३ व्या वर्षी पुण्याच्या ससून इस्पितळात  १० एप्रिल १९३७ रोजी मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या पत्नीला १०० रूपये उसने मागण्याची वेळ आली अशी नोंद त्यांच्या चरित्रात आहे.

ब्रिटिश भारतात पारतंत्र्यामुळे त्यांच्या कार्याला कधी साहाय्य झाले नाही.

या एका माणसाने एकहाती लिहिलेल्या ज्ञानकोशाने अख्ख्या महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांवर किती उपकार केले याची जाणीव त्याकाळात कोणाला नव्हती.

एक असामान्य बुद्धिमत्तेचा संपादक, विचारवंत, समाजशास्त्रज्ञ, लेखक म्हणून उचित सन्मान त्यांच्या हयातीत वाट्याला आला नाही

पुढे अनेक वर्षांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई या सेवाभावी संस्थेने त्यांच्या ज्ञानकोशाचे डिजीटल स्वरूपात वेबसाईटवर आणले. http://ketkardnyankosh.com/ हे संकेतस्थळ आजही अभ्यासू विद्यार्थ्यांना उपयोगात पडत आहे. श्रीधर केतकर यांच्या स्मृती या ज्ञानकोषातून अजरामर झाल्या आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.