फॅक्ट्रीमधली नोकरी गेली, गड्याने एकही शब्द न बोलता टिकटॉक इन्स्टाच्या जगात राडा केला..

इन्स्टा टिकटॉक कोणी कितीही शिव्या घालू दे देखते सभी है. मग त्या सैय्याने देखा ऐसे म्हणून चॅलेंज देणाऱ्या पोरी, कसंय ना शेट वाले निब्बे, नाईंटीज कुमार सानू आणि उदित नारायणच्या गाण्यावर बादलीभर रडणाऱ्या निब्बी बरच काय काय.

पण या प्लॅटफॉर्मचा चांगला वापर करणारे पण खूप जण आहे, कोण आपला डान्सच तर कोण योग, फिटनेसचे व्हिडीओ टाकून जनतेला इन्स्पायर करत. कोणी शेअर मार्केटचं तर कोणी इंग्लिश ग्रामरचे टिप्स देत. आजकाल सेक्स एज्युकेशन बद्दल पण रिल्स येतायात असं आम्ही ऐकून आहे. एकूणच काय तर या सोशल मीडिया वरच्या इन्फ्ल्यूएंसर्सनी सेलिब्रिटी लोकांना देखील मागे टाकलंय.

यातच सध्या एक नंबरला आहे खाबी लेम

नावावरून तुम्हाला आठवणार नाही. पण इन्स्टा टिकटॉक उघडलं कि त्याचा चेहरा हमखास दिसतो. एकट्या टिकटॉकवर त्याचे जवळपास ९ कोटी लोक त्याला फॉलो करतात. तो काही खूप जगावेगळे व्हिडीओ बनवतो असं नाही. बीबीके वाईन सारखी डायलॉगबाजी,  किम कार्डाशियन सारखी फिगर, नेहा कक्कर सारखा आवाज, मायकल जॅक्सन सारखा डान्स यातलं काहीच नाही. तरी तो नेट फोडून टाकतोय. 

तो काय करतो तर केळ सोलतो, कारचं दार उघडतो, कपने चहा पितो, चमच्याने सूप पितो, संत्र सोलतो बरच काय काय. पण लाईफ हॅकच्या नावाखाली जॅपनीज,कोरियन, अमेरिकन लोकांनी जो गोंधळ घातलाय त्याच्यावर उतारा म्हणून खाबी लेमने आपले व्हिडीओ आणले. विशेष म्हणजे एकही शब्द न बोलता फक्त मान हलवून, हात दाखवून तो जे एक्स्प्रेशन देतो ते १०० % सोनं आहे. 

 

खाबी लेम मूळचा आफ्रिकेतल्या सेनेगलचा. त्याच खरं नाव खबानी लेम. तो एक वर्षाचा असतानाच त्याची फॅमिली इटलीला शिफ्ट झाली. वाढला तिथेच. लहानपणी त्याला फुटबॉल खेळायची आवड होती. त्यातच करियर देखील करायचं होतं. बास्केटबॉल देखील चांगलं खेळायचा. ज्युनियरच्या टीममध्ये मोठी मजल देखील मारली होती. पण शिक्षण आणि खेळ एकदमच सुटलं.

पोटापाण्यासाठी नॉर्थ इटलीमधल्या चिवासा इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये एका फॅक्ट्रीमध्ये सीएनसी ऑपरेटर म्हणून लागला. थोडे फायनांशियल प्रॉब्लेम चालू होते. घरच्यांची मदत घयायची नाही म्हणून ठरवलेलं. अगदी लहान वयातच स्वतःच्या पायावर उभा राहिला.

राहण्या खाण्याचा खर्च भागून चैनीसाठी उरतील एवढे पैसे मिळत होते. सगळं तस चांगलं चालू होतं पण अचानक एक मोठं संकट आलं. ते संकट फक्त खाबीवर आलं नव्हतं तर संपूर्ण जगावर आलं होतं.

ते संकट होतं कोरोनाचं. पहिल्या लाटेत अख्ख्या युरोपला या कोरोना व्हायरसने गाठलं. भराभर रुग्ण सापडू लागले. पटापट सगळे देश लॉक डाऊन होत गेले. नागरिक आपल्या घरात अडकले. धंदे कारखाने शाळा कॉलेजे बंद झाली. कित्येकांच्या नोकऱ्या कायमच्या गेल्या.

यात आपल्या खाबीची फॅक्ट्री मधली नोकरी देखील गेली. खरं तर डोकं धरून बसायची वेळ पण खाबीला मोबाईलवर टाईमपास करता करता एक नवीन जग सापडलं. त्यात तो रममाण झाला. हे जग होतं टिकटॉकच. भावड्याला वाटलं आता याच टाइप मध्ये तर आपण पण काही तरी क्रिएटिव्हिटी करू.

नेकी और पुछ पुछ.

आपण दिसायला काळे आहोत, अंगाने बारीकराव आहोत, चेहऱ्यावर खूप एक्स्प्रेशन नाही, डान्स, गायन, योगा वगैरे कसलंच टॅलेंट नाही हे त्याला माहित होतं पण यातल्या कशाचा न्यूनगंड न बाळगता उलट त्यालाच त्याने आपले हत्यार बनवले.

आधी तर तो इटालियन मध्ये व्हिडीओ बनवायचा. जास्त कोणी बघायचं नाही, मित्र चिडवायची देखील पण खाबी होतं चिवट. त्याने नाद सोडला नाही.

खरंच खाबीने स्वतःच डोकं लावून व्हिडीओ बनवायला सुरवात केली. वडील त्याला दुसरी नोकरी शोध म्हणून मागे लागले होते. पण तो काही ऐकायला तयार नव्हता. सुरवातीला चुका होत होत्या, शिकायला मिळत होत. त्याला ते आवडत होतं. फक्त टीकाच नाही तर काही जण सजेशन देतंय होते.

आपल्या चुका बदलत त्याने व्हिडीओ बनवायला सुरवात केली. पुढे पुढे डायलॉग देखील बंद केले. त्यानंतर मात्र बिचाऱ्याला सूर सापडला. लाईफ हॅकला हॅक करून सोपे व्हिडीओ बनवू लागला. अरे असं बी असतंय कि असं म्हणत लोक खुश होऊन बघू लागली. फक्त इटलीचा नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहचला. 

तसं भारतात मोदीजींच्या कृपेने टिकटॉक बॅन आहे पण इंस्टाच्या माध्यमातून तो आपल्या पर्यंत पोचलाच. खेड्यापाड्यातली म्हातारी पण त्याचे व्हिडीओ बघून हसत असतात. तुमच्या कडे काहीही करायचं टॅलेंट नसू दे पण जगाची विसंगती टिपायची नजर जरी असली तरी बास आहे हे खाबीने दाखवून दिल.

दोन दिवसापूर्वीच तीव जगात एक नंबरला जाऊन पोहचलाय. विल स्मिथसारखे अनेक मोठेमोठे सेलिब्रिटी त्याला भेटण्यासाठी उत्सुक असतात. कित्येक जणांनी सिनेमा देखील ऑफर केलाय. पैसे किती कमावतोय याला मोजमाप नाही.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो अजून फक्त २१ वर्षांचा आहे. जन्म साल २०००. या वयात एवढं यश मिळवणे म्हणजे चेष्टा नाही. 

यापेक्षा भारी गोष्ट म्हणजे त्याला टिकटॉकमुळे एक गोड अशी गर्लफ्रेंड सुद्धा मिळालीय. ती त्याच्या पॉप्युलॅरीटी मुळे झालीय असं नाही तर अजून तो टिकटॉकवर फेमस होण्या आधीच त्यांची ओळख झाली होती. सुरवातीला मोबाईलवर एकमेकांशी गप्पा मारत मारत ते मॅकडीवर भेटले आणि तिथेच प्रेमात देखील पडला. आता दोघांनी साखरपुडा सुद्धा केलाय.

भविष्यात हे यश हा पैसा हे अटनेशन कायम राहील असं नाही आणि हे खाबीला देखील माहित आहे. पण गड्याने गेल्या काही दिवसात हवा केलीय हे मात्र नक्की.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.