जिवंत होता त्यापेक्षाही मेल्यावर हा मौलाना इम्रान खानसाठी सगळ्यात मोठं डेंजर बनलाय.

मौलाना खादिम हुसेन रिझवी हा माणूस परवा वारला. आता पाकिस्तानात मुल्लाराज एवढं जबरदस्त आहे की त्यातलं कुणी गेलं तरी देश बंद पडतो. पण मौलाना खादिम हुसेन रिझवी यांची बातच और होती. त्याच्या अंत्यदर्शनासाठी लाखो लोकांनी गर्दी केली होती. बारक्या पोरांपासून ते त्याच्या वयाचे म्हातारे-कोतारे फातिहा म्हणायला आले. काही चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या. त्यामुळं आता त्याचे समर्थक लवकरच पाकिस्तानात अराजक आणतील अशी शक्यता आहे.

हा माणूस त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांचा कट्टर प्रतिस्पर्धी मानला जायचा. तिकडचा पप्पू नेता माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांचा लाडका पोऱ्या बिलावल भुट्टो जरदारी राजकारण सिरीयस घेत नाही. नवाज शरीफ सध्या देशातून बाहेरच आहेत. डाव्यांवर बंदी घातल्यानंतर विरोधात आवाज उठवायला कुणी नाही.

अशा परिस्थितीत इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षाला तोडीस तोड एकच माणूस पाकिस्तानात होता – तो म्हणजे मौलाना खादिम हुसेन रिझवी!

त्यांचा पक्ष तहरीक-ए-लब्बेक पाकिस्तान हा मागच्या निवडणुकीत देशातला सगळ्यात मोठा तीन नंबरचा पक्ष म्हणून निवडून आला होता.

आता पक्षाच्या आणि याच्या आडनावावरून हा माणूस तुम्हाला शिया वाटेल. पण हा कट्टर सुन्नी-हनाफी पंथाच्या बरेलवी शाखेचा समर्थक होता.

फक्त ‘ईश्वरनिंदा विरोध’ या एकाच मुद्द्यावर त्यानं पाकिस्तान हादरवून सोडला आणि तो मोठा नेता बनला. टीएलपी म्हणून फेमस असणाऱ्या त्याच्या पक्षाने या एका मुद्द्यावर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद अख्खे तीन आठवडे पूर्णपणे बंद करून ठेवली होती. तेही निवडणूका लढवायच्या आधी.

म्हणूनच या मौलानाची गेम स्वतः इम्रान खाननं वाजवलीय असा आरोप विरोधकांनी केलाय. त्यामुळं या मौलानाच्या हुकुमाचे पाबंद रागात आहेत.

तुम्हाला वाटेल रागात म्हणजे लैतर लै आंदोलन करतील. पण तिकडं सुद्धा धर्माचं पेव एवढं मोठंय की या मौलानांच्या सांगण्यावरून देश बंद व्हायचा. कित्येक पोरांनी आपल्या मास्तरांचा कोथळा बाहेर काढला होता.

२०१९ ची गोष्ट. भावलपूरच्या सरकारी शाळेत खतीब हुसेन हा २० वर्षांचा पोऱ्या शिकत होता. त्यांना शिकवायला असणारा मास्तर खलिद हमीद हा विज्ञान शिकवता शिकवता देवाविषयी कायतरी बोलला. पोरानं हे त्याच्या ओळखीच्या वकिलाला ‘जफ़र गिलानी’ यांना सांगितलं.

जफ़र गिलानी हा टीएलपी पक्षाचा मोठा नेता होता. त्यानं या पोराला सगळ्या गोष्टी भरवून दिल्या. सरकार व्हाट्सऍप चेक करतं म्हणून टिंडरवर अकाउंट काढून सूचना दिल्या.

दोन दिवसांनी त्या पोराने आपल्या मास्तरला भर वर्गात चाकू खुपसला. वर्गातली इतर पोरं भेदरली. पण पोरगं जेलमध्ये जाताना खुश होतं.

सरीर अहमद नावाच्या मुख्याध्यापकाचं घ्या. चारसड्डा शहरातल्या इस्लामिया कॉलेजची घटना.  तिथला एक पोरगा वर्ग बुडवून टीएलपीच्या सभांना जात असे. मौलाना खादिम हुसेन रिझवी त्या देवमाणूस वाटायचा.

प्रार्थनेच्या मध्ये काहीतरी मुख्याध्यापक कायतरी बोलला म्हणून शाळेतल्या त्या १७ वर्षांच्या पोराला राग आला. त्यानं थेट ऑफिसात जाऊन सगळ्यांसमोर मुख्याध्यापकाला गोळ्या घातल्या.

माध्यमांनी दोन्हीसाठी मौलाना रिझवी याला जबादार धरलं. पण तो एवढा फेमस झाला होता की पोलीस त्याच्या जवळही जाऊ शकले नाहीत.

त्याचं सगळं राजकारण धर्माच्या भोवती आहे. पंजाब राज्य सरकारने मागे आणण्याचा प्रयत्न केलेला ईश्वरनिंदा विरोध’ कायदा. भारतात २९५अ कलमाने हा कायदा वेगळ्या स्वरूपात लागू आहेच. हा कायदा अजून कठोर करून जगभर लावावा अशी त्याची मागणी होती. जसं दर देशात नेते याला बळी पडतात तसंच इम्रान खाननेही सुरुवातीला मतांसाठी याचे लाड केले.

पण नंतर मौलाना रिझवी याने फ्रान्स सरकारशी सगळे संबध तोडा, पाकिस्तानात वादग्रस्त फिल्म प्रदर्शित करू नका अशा मागण्या सुरु केल्या. आधीच डबघाईला आलेल्या पाकिस्तानला हा भार पेलवणारा नव्हता. त्यामुळं इम्रानभाई गोचित सापडले.

खादिम रिझवी हा कधीकाळी पाकिस्तानच्या धर्मखात्यात एक साधा कारकून होता. बरेलवी संप्रदायाच्या बाबींचा तज्ज्ञ म्हणून तो ओळखला जाई. २०१५ पासून त्यानं पक्ष स्थापन केला आणि त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली.

तिथल्या एका गव्हर्नरने आसिया बीबी या ख्रिश्चन बाईची बाजू घेतली होती. त्याला ठार करणाऱ्या माणसाला कोर्टाने शिक्षा केली. ही शिक्षा रद्द व्हावी म्हणून मौलानांनी आंदोलन केलं आणि ते प्रसिद्धीच्या झोतात आले. धर्म आणि राजकारण एकत्र आल्यावर जी गोची होते ती तिथून सुरु झाली. २०१७ मध्ये नवाज शरीफ यांच्या विरोधात आंदोलन करून या पक्षाने भरभरून मते मिळवली.

आता ही आग आटोक्यात येणारी नाही. गरिबांना धर्माच्या नावाने फसवायची जुनी गेम रिझवी साहेब शाबूत खेळले आहेत. पाकिस्तानचा सामान्य माणूस बाकीचे मुद्दे विसरून याकडे लक्ष देतोय. ट्विटर आणि फेसबुकवर त्याचं नाव सतत ट्रेंडिंगला आहे.

‘लब्बेक लब्बेक लब्बेक या रसूलअल्लाह’ नावाचे नारे देत लाखो पब्लिक आत्ता पाकिस्तानच्या प्रत्येक शहरात जमली आहे. जमात नमाजींच्या तीन तास आधीपासून मशिदी भरून वाहत आहेत. काल तर बादशाही मशीद एवढी भरगच्च झाली होती की शेजारचं मैदानही भरून गेलं.

जिथं एकेकाळी नेहरूंनी पहिल्यांदा भारताचा झेंडा फडकावला होता आणि नंतर मिनार-ए-पाकिस्तान बनवून निर्भीड लोकशाहीचं स्वप्नं पाहिलं गेलं होतं तिथं आज ३ किलोमीटर व्यासाच्या लांब रांगा लागल्या आहेत.

ही गर्दी आता इम्रान खानच्याही आटोक्यात येणार नाही असे तज्ज्ञ म्हणत आहेत. जैशच्या काही लोकांनी या चळवळीला पाठिंबा दिला आहे. अहमदिया पंथ आणि इतर अल्पसंख्याकाविरुद्ध बहुसंख्य जनतेला भडकावण्यात आलं आहे. या धर्मांध लोकांच्या आणि मौलानांच्या मागे पाकिस्तान आणि जगच कुठवर फरफटत जाणार हेच आता बघायचं आहे.

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.