कधीकाळी चपलाच्या दुकानात काम करणारा आज १३०० कोटींचा मालक आहे….

शाहरुखच्या रईस पिक्चरमधला फुल ऑन ऍटिट्यूडमध्ये दिलेला डायलॉग.

‘कोई धंदा छोटा नही होता और धंदेसे बडा कोई धर्म नही होता.’

त्यानंतर तो या वाक्यावर ज्या स्पीडमध्ये मोठं होतो ते सगळं आश्चर्यकारक असतं. हा रील लाईफ जरी असला तरी रिअल लाईफमध्ये देखील काही व्यक्तींच्या आयुष्यात हा डायलॉग फिक्स बसतो.

त्यापैकी एक नाव अगदी चटकन आठवत ते म्हणजे खादिम इंडियाचे सत्य प्रसाद रॉय बर्मन.

त्यांनी देखील कोणताही काम छोट न मानता अगदी चपलांच्या दुकानातून कामाला सुरुवात केली होती. आज ते तब्बल १३०० कोटी रुपयांचे मालक आहेत. इथपर्यंतचा त्यांचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. याच संघर्षातून हा माणूस असामान्य उंचीवर पोहचला आहे.

त्याचं झालेलं असं कि, बर्मन कुटुंबीय मुळचे कलकताचे. घरी सगळं बरं होतं. पण एक काय झालं, तिशीत असलेल्या रॉय यांची घरातल्यांशी तुफान भांडण झाली. इतकी कि या तरुण पोरानं डोक्यात राग घालून घर सोडलं आणि तडक रेल्वेनं तिकीट न काढता अंगावरच्या कपड्यानिशी मुंबई गाठली.

दुसऱ्या दिवशी मुंबईत पोहचल्यावर एक दिवस कसा तरी ढकलला. पण जसजशी रात्र होतं होती तशी घरची आठवण यायला सुरुवात झाली. मात्र राग डोक्यात होता, इतक्यात घरी कसं जायचं इगो आडवा येत होता. त्याचं रागात सत्य प्रसाद यांनी पोट भरण्यासाठी एका चपलांच्या दुकानात काम मिळवलं.

पोरगं हुशार होतं म्हणून दुकानदारानं देखील काम शिकवलं. सत्य प्रसाद देखील मुंबईत हळू हळू रमतं होते. त्यानंतर चांगले ३ ते ४ वर्ष त्यांनी मुंबईत काढली, पण दुसऱ्या बाजूला घरची आठवण शांत बसून देत नव्हती. अखेरीस १९६४-६५ ला घरी जायचं ठरवलं.

त्याप्रमाणे १९६५ मध्ये सत्य प्रसाद रॉय बर्मन कोलकात्याला आपल्या घरी परतले.

घरी देखील मोठ्या मनानं त्यांना माफ केलं. मात्र एव्हाना आता त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायची जाणीव झाली होती. त्यामुळे १९६५ मध्ये त्यांनी चितपुरमध्ये एक छोटंसं दुकान खरेदी करून चपलांचा व्यवसाय सुरू केला. हे अगदीच छोट्या स्वरुपातील आणि फुटपाथच्या बाजूला असलेल्या दुकानासारखचं दुकान होतं.

हे दुकान सुरू केल्यानंतर पहिल्या वर्षभरातच चांगला जम बसला. दुकान चांगल्या जागेत शिफ्ट झालं. पण दुसऱ्याच्या ब्रँडची विक्री करता त्यांना एक कल्पना सुचली. ही कल्पना होती स्वतःचा एक छोटासा ब्रँड तयार करण्याची. जर स्वतः दरात चांगल्या दर्जाचे चप्पल तयार करून विकले तर लोकांना ते नक्की अवडतील असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला.

याचे दोन फायदे होते. एक तर यातून स्वतःचा ब्रँड तयार होणार होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवसाय वाढणार होता.

त्यांनी लगेच चपलांचे खादिम नावाचे दुकान सुरू केले. वर्षांनुवर्षांच्या अथक परिश्रमानंतर फक्त पश्चिम बंगालमध्येच नाही तर भारताच्या पूर्व भागात खादिम हा चपलांचा फार मोठा ब्रॅण्ड झाला. १९८० पर्यंत त्यांच्या कंपनीने चांगलीच प्रगती केली. स्वतःच्या पैशावर आणि कष्टावर ते दुकान बदल राहिले.

त्याच दरम्यानच्या काळात सत्य प्रसाद रॉय बर्मन यांचा मोठा मुलगा सिद्धार्थ रॉय बर्मनने कंपनीत पदार्पण केलं. सिद्धार्थ यांच्या काळात काही गोष्टींमध्ये जाणीवपुर्वक बदल केले गेले. यात १९९२ मध्ये त्यांचा ‘उल्का’ ब्रँडसाठी पहिल्यांदा जाहिरात कंपनी नियुक्त केली गेली.

१९९३ मध्ये कलकत्यामध्ये तीन नवीन दुकानं सुरू केली. त्यांनीही चांगला रिस्पॉन्स मिळवला. यानंतर कंपनीने पुर्व भारत सोडून उत्तर आणि दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये प्रवेश केला. लोकांचा विश्वास जिंकत खादीम वाढत होतं.

आज घडीला खादिम या कंपनीचे २३ राज्यात आणि एका केंद्रशासित प्रदेशात मिळून एकूण ८५३ रिटेल दुकानं आहेत.

खादिम कंपनीचे जास्तीत जास्त ग्राहक हे सामान्य आणि मध्यमवर्गातील आहेत. त्यामुळेच त्यांच्या चपलांची किंमत कमी असते. मात्र ब्रँडच्या दर्जामध्ये कुठेही तडजोड होत नसल्याचं सिद्धार्थ बर्मन सांगतात.

मात्र या नंतर देखील भारतीय मार्केटमध्ये खादिम इंडियाची मिळकत ४० हजार कोटी रुपये आहे. ७ डिसेंबर २०१३ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी सत्यप्रसाद रॉय बर्मन यांचे निधन झाले. पण त्यांनी सुरू केलेली कंपनी आता देशात एक ब्रँड झाली आहे.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.