पहिल्यांदा पाकिस्तानात गेलेला लाहोर जिंकून दाखवा मग तुमच्या मागणीचा विचार करू…!

ऐंशीच्या दशकातील गोष्ट आहे. पंजाबमध्ये खलिस्तानवादी अतिरेक्यांनी वातावरण पेटवले होते. अमृतसर मधल्या सुवर्णमंदिरात लपून तिथून या कारवाया चालवल्या जायच्या. अखेर त्यांना आवर घालण्यासाठी सुवर्णमंदिरावर लष्करी कारवाई करावी लागली. यात भिंद्रनवाले पासून अनेक खलिस्तानवादी अतिरेकी मारले गेले.

पण सुवर्णमंदिरात लष्कर घुसवल्यामुळे शीख समाज दुखावला गेला. यातूनच जागोजागी हिंसक प्रतिक्रिया उमटली. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केली. यासाठी अख्ख्या शीख समाजाला जबाबदार ठरवून त्यांच्या विरुद्ध दंगल पसरवण्यात आली.

देशभर आगडोंब उसळला. दिल्लीमध्ये तर प्रचंड प्रमाणात शीखांचे शिरकाण करण्यात आले. पंजाबमध्ये सर्वत्र जाळपोळ सुरु होती. आपल्या व्यवसायानिम्मित देशाच्या कानाकोपऱ्यात राहायला गेलेल्या शीख कुटुंबामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

याचे पडसाद मुंबईमध्ये सुद्धा पडले. दिल्ली खालोखाल मुंबईमध्ये शीख समाज स्थलांतरीत झाला आहे. तिथे सुद्धा दिल्लीप्रमाणे दंगल पसरेल या भीतीने अनेक शीख बांधव आपली घरे, मालमत्ता कवडीमोल भावात विकून परत पंजाबला जाण्याची तयारी करू लागले. कधीही काहीही होऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

एक ठिणगी सुद्धा अख्खं शहर पेटवण्यासाठी बास होती आणि असाच प्रयत्न ही झाला.

एकदा काय झालं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाकडे एक पंजाबमधून बिल्ला नावाचा इसम आला. त्याने बाळासाहेबांच्याकडे कान भरले की पंजाब मध्ये शीख समाज व हिंदू समाज यांच्यात खूप मोठा तणाव निर्माण झाला असून तिथल्या हिंदुंवर प्रचंड अत्याचार होत आहेत. स्त्रियांवर बलात्कार होत आहेत.

बाळासाहेबांच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत पोहचली. पण त्यांना ठाऊक होते की रागाच्या भरात केलेली प्रतिक्रिया देणे बरोबर नाही. त्यांनी मुंबईमधल्या पंजाबी असोशिएश्नचे अध्यक्ष कुलवंतसिंह कोहली यांना भेटायला शिवसेना भवनावर बोलवलं. कुलवंतसिंह आपल्या असोशिएशनच्या इतर सदस्यांना घेऊन भेटायला गेले. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मनात असलेले सगळे गैरसमज केले.

पुढे शिखांच्या सुरक्षिततेसाठी षण्मुखानंद सभागृहात एक सभा पार पडली. याची प्रस्तावना प्रमोद महाजन यांनी केली. त्यांनी केलेल्या भावनिक आवाहनामुळे तिथे जमलेला प्रत्येकजण हेलावून गेला. बाळासाहेब ठाकरे या सभेला उपस्थित राहू शकले नाहीत पण त्यांच्यावतीने प्रमोद नवलकर यांनी  संदेश दिला,

“प्रत्येक शीख बांधवाला मी शिवसैनिकच समजतो. आणि शिवसैनिकाला जर काही इजा झाली तर शिवसेना कशी वागते हे सर्वाना माहितीच आहे.”

संपूर्ण भारतात शिखांच्या बदल दंगली सुरु होत्या तरी मुंबईत मात्र शीख समुदायावर कोणी डोळे वटारून देखील पाहिलं नाही.

पण हीच परिस्थिती कायम राहिली नाही. १९८४ सालच्या दंगलींमुळे धार्मिक सलोखा बिघडला होता. खलिस्तानला पूर्वी विरोध करणारे शीख तरुण दहशतवादाच्या मार्गाला लागले. इंदिरा गांधींच्या पाठोपाठ ऑपरेशन ब्ल्यूस्टार मध्ये सहभागी असलेल्या सर्व  अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले सुरु झाले.

पुण्यात जनरल अरुणकुमार यांचा जिंदा व सुखा नावाच्या दोन माथेफिरू शीख अतिरेक्यांनी खून केला. या घटनेनंतर मात्र बाळासाहेब ठाकरेंनी खलिस्तानवाद्यांच्या विरोधात आक्रमक धोरण स्वीकारले.

१९ मार्च १९८९ मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या पत्रकार परिषदेत प्रश्नावलीचे वाटप करण्यात आले होते. यामध्ये त्यांनी शीख समुदाय फुटीरतावाद्यांना फंडिंग करत राहिल्यास सामाजिक आणि आर्थिक स्वरुपात बहिष्कृत केले पाहिजे असं सांगितलं.

बाळासाहेबांनी घेतलेल्या रोखठोक भूमिकेमुळे अतिरेकी भडकले. शिवसेनाप्रमुखांचं नाव त्यांच्या हिटलिस्टवर आलं. ठाकरे कुटुंबीयांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीला दहशतवाद्यांनी बॉम्बने उडवून देण्याची योजना आखली होती. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी बाळासाहेबांना याबद्दलची पूर्वकल्पना दिली.

नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी ठाकरे कुटूंबियांना अज्ञात स्थळी हलवलं.

पुढे देखील त्यांना अनेकदा धमक्यांचे फोन आले मात्र बाळासाहेब ठाकरेंनी वेळोवेळी खलिस्तानवाद्यांचे कान उपटायचं थांबवलं नाही.

१९९२ सालच्या गणेशोत्सवात पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने शिवसेनाप्रमुखाना बोलावलं होतं. त्यावेळी भाषण करताना बाळासाहेब म्हणाले,

खलिस्तानची मागणी भारताकडे करणे हीच मुळात मूर्खपणाची गोष्ट आहे. इतकंच तुम्हाला तुमच्या मातृभूमीबद्दल प्रेम असेल तर सगळ्यात पहिल्यांदा पाकिस्तानच्या ताब्यात असलेलं लाहोर जिंका आणि त्यानंतर मग इतर गोष्टींची चर्चा करा. जर तुम्ही लाहोर जिंकून दाखवला तर आम्ही त्यांना खलिस्तान देखील देऊ.

खरं तर बाळासाहेबांनी खलिस्तानवाद्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकवलं होतं, सीमेपलीकडून मिळणाऱ्या रसदेच्या जीवावर हि दहशतवादी चळवळ सुरु आहे हे बाळासाहेबांनी दाखवून दिलं. पण तरीही त्यांच्या भाषणावरून संपूर्ण भारतात गदारोळ झाला. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाणांनी बाळासाहेबांच्या वक्तव्यावर जोरदार प्रतिहल्ला करून त्यांना पंजाब काश्मीर मध्ये कोणत्याही संरक्षणाविना फिरण्याचं आव्हान दिलं.

हे ही वाच भिडू.

  

Leave A Reply

Your email address will not be published.