खलिस्तानवादी चळवळ अजूनही जिवंत आहे का ?

सध्या दिल्लीमध्ये पंजाब आणि हरियाणामधल्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. केंद्रसरकारने आणलेल्या कृषी विधेयकांवर आक्षेप नोंदवण्यासाठी सुरु झालेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यापासून याला हिंसक वळण लागले आहे. गेला आठवडाभर दिल्लीच्या सीमेवरील वातावरण तापले आहे, जगभरातून सरकारच्या दडपशाही वर टीका होत आहे.

पण सरकारचे समर्थक हे शेतकरी आंदोलन नसून खलिस्तानवाद्यांचे देशाविरुद्धचे षडयंत्र आहे असा आरोप करत आहेत.

हे खरे खोटे ठरवण्या आधी आपण पाहिलं पाहिजे खलिस्तानवादी आंदोलन काय होतं आणि ते अजूनही जिवंत आहे का ?

तर सगळ्यात आधी सांगतो, खलिस्तानची मागणी आज कालची नाही, तर याची सुरवात खूप आधीची आहे. जेव्हा इंग्रज होते तेव्हा पासून वेगळ्या शीख राज्याची मागणी होतच होती. पण जेव्हा द्विराष्ट्राचा सिद्धांत पुढे आला, मुस्लिम लीगने मुसलमानांचा वेगळा पाकिस्तान मागायला सुरवात केली तेव्हा पाकिस्तानच्याच धर्तीवर शिखांसाठी वेगळा खलिस्तानची मागणी पहिल्यांदा केली गेली. 

लँड ऑफ खालसा म्हणजे खलिस्तान  

मोहम्मद अली जिना सारख्या नेत्यांचा या मागणीला सुरवातीपासून फूस होती. अशातच अकाली दल सारखा शिखांचा वेगळा पक्ष राजकारणात उदयास येत होता. पण त्यांनीही खलिस्तानसारख्या फुटीरतावादी घोषणेकडे लक्ष दिले नव्हते.

देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. फाळणीचा सर्वात मोठा फटका शीख समुदायाला बसला. पाकिस्तानमध्ये गेलेल्या पंजाबमधून भारतात येणाऱ्या लाखो लोकांवर, आया बहिणींवर अत्याचार झाले आणि त्यांना घरदार अब्रू लुटली गेली. शीख समुदायातील खलिस्तान वाद्यांची मागणी यात विझून गेली.

पुढे अनेक वर्षांनी जेव्हा भारताने पाकिस्तानचे तुकडे करून बांगलादेशची निर्मिती केली तेव्हा याचा बदला घेण्यासाठी पाक लष्कराने खलिस्तानचा मेलेला मुडदा उकरून जिवंत केला.

सत्तरच्या दशकात खलिस्तानची मागणी पुन्हा जोर धरू लागली.

अकाली दलाचे पंजाबमधील वर्चस्व मोडून काढण्यासाठी इंदिरा गांधींच्या काँग्रेसने केलेल्या मदतीमुळे मोठा झालेला धर्मगुरू भिंद्रणवाले पलटला आणि त्यानेच सीमेपलीकडून मदत घेऊन खलिस्तानची मोहीम सुरु केली.

त्याची चिथवणीखोर भाषणे शीख तरुणांच्यात प्रचंड फेमस झाली. बब्बर खालसा ही संघटना पाकिस्तानी लष्कराची मदत, प्रशिक्षण घेऊन अतिरेकी बनवत होती.

डिसेंबर १९८३ मध्ये भिंद्रनवाले याने अमृतसर सुवर्ण मंदिरातील अकाल तख्त साहिब मध्ये आश्रय घेतला. तेथेच आपले मुख्यालय स्थापन करून त्यांनी सुवर्णमंदिरात शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जमवला. त्याला आपला किल्ला बनवले.

अखेर इंदिरा गांधी यांनी सुवर्णमंदिरावर लष्करी कारवाई करून हा उठाव मोडीत काढला. यात भिंद्रनवाले मारला गेला. ऑपरेशन ब्ल्यूस्टार म्हणून ओळखल्या गेलेल्या या कारवाई बद्दल सविस्तर वाचायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता.

या कारवाईमुळे शिखांच्या भावनेला मात्र धक्का बसला. सरकार विरोधी असंतोष वाढीस लागला. इंदिरा गांधींच्या जीवास त्यांच्या शीख बॉडीगार्ड्स यांच्या कडून धोका आहे असा गुप्तचर संस्थेने अहवाल दिला मात्र धर्मनिरपेक्ष विचारसरणीतून इंदिरा गांधींनी त्यांना हटवले नाही. याच शीख सुरक्षारक्षकांनी त्यांचा खून केला.

खलिस्तानवादी चळवळीने भारताच्या पंतप्रधानांना गिळलं.

याच रागातून दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिखांची घरे पेटवून दिली, विलक्षण नरसंहार घडवून आणला. देशभरात हिंदू -शीख दंगली भडकल्या. खलिस्तानवादी चळवळीने याच फायदाच घेतला.

तिथून पुढे जवळपास दहा पंधरा वर्षे पंजाब जळत राहिला. पाकिस्तानने आगीत तेल ओतून हि आग धगधगत ठेवली. यात कॅनडामध्ये स्थायिक असलेल्या श्रीमंत शिखांनी खलिस्तान चळवळीला आर्थिक रसद पुरवली. तिथे देखील अतिरेकी तयार झाले.

विमान अपहरणाच्या घटना वारंवार घडू लागल्या. देशभरात शिखांच्या प्रति अविश्वासाचे वातावरण बनू लागले. अखेर इंदिराजींचे सुपुत्र पंतप्रधान राजीव गांधी यांनी अकाली दलाच्या लोंगोवाल यांच्याशी करार करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.

या करारानंतर सर्वसामान्यातील असंतोष कमी झाला मात्र अतिरेकी कारवाया थांबल्या नाहीत. लोंगोवाला यांचीच हत्या करण्यात आली. रक्तपाताचा सिलसिला चालू राहिला. ऑपरेशन ब्ल्यूस्टारवेळी भारताचे लष्करप्रमुख असलेले जनरल अरुण कुमार वैद्य यांची खलिस्तानवादी अतिरेक्यांनी पुण्यात हत्या घडवून आणली.

पंजाब शांत करण्याची जबाबदारी केपीएस गिल आणि ज्युलियस रिबेरो यांच्यासारख्या तडफदार पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली. त्यांच्यावरही हल्ले झाले मात्र त्यांनी व पंजाबच्या जाँबाज पोलीस दलाने अतिरेक्यांना खणून काढले व संपवले. रिबेरो यांनी बुलेट फॉर बुलेट या तत्वावर अतिरेक्यांशी सामना केला.

या सर्व कारवाया, बदलते राजकीय सामाजिक सन्दर्भ यामुळे हळूहळू नव्वदच्या दशकात खलिस्तान वादी चळवळीचा शेवट होत गेला मात्र तरीही पंजाबच्या मुख्यमंत्री बियांत सिंग यांचा घास या खलिस्तानवाद्यांनी घेतलाच.

दोन हजार सालानंतर तर खलिस्तानवाद्यांचा जोर संपूर्णपणे बंद झाला होता. ज्या काँग्रेसच्या विरोधात शिखांचा राग होता असं म्हटलं जात होतं त्याच काँग्रेसने पंजाबमध्ये निवडणूक जिंकल्या, अमरिंदर सिंग या शीख व्यक्तीलाच मुख्यमंत्री बनवलं. इतकंच काय तर देशातही पंतप्रधान म्हणून सोनिया गांधी यांनी डॉ.मनमोहन सिंग यांची निवड केली.

काळाच्या ओघात १९८४ साली शीख दंगलीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या रक्तपाताबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी देखील मागितली.

भारतात जरी खलिस्तानवादी चळवळ मृतप्राय झाली असली तरी कॅनडा, इंग्लंड, अमेरिका येथील काही शीख नागरिक मात्र तिला जिवंत ठेऊन आहेत. मध्यंतरी पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय खलिस्तान्यांची भावना भडकवून आंदोलन पेटवत असल्याची माहिती समोर आली होती.

भिंद्रनवाले यांच्या बब्बर खालसाचा वारसा चालवणारे खलिस्तान लिबरेशन आर्मी, खलिस्तान जिंदाबाद फोर्स अशा संघटना आजही कार्यरत आहेत. त्यांच्या काही छोट्या मोठ्या कारवाया सुरु असतात, त्यांना अटक देखील होते.

काही वर्षांपूर्वी हरमिंदर सिंग मिंटू नावाच्या खलिस्तानवादी नेत्याला फिल्मी स्टाईलमध्ये जेल फोडून बाहेर काढण्यात आलं होतं पण त्याला अटक झाली आणि जेलमध्येच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या निमित्ताने खलिस्तानची आग संपूर्ण्पणे विझली नाही हे देखील लक्षात आले.

गेल्या काही वर्षांपासून कॅनडा मधील श्रीमंत शिखांनी २०२० साली भारतापासून वेगळा खलिस्तान बनवा याची मोहीम सुरु केली होती. भारतातही दोन वर्षांपूर्वी सुवर्णमंदिरात खलिस्तानचे बॅनर घेऊन लोक घोषणा देत होते. (याच बॅनर धारकांचा फोटो आजकाल शेतकरी चळवळीतील खलिस्तानवादी म्हणून व्हायरल होतो आहे .) कोरोना मुळे या संघटनांनी खलिस्तान निर्मिती साठी २०२० च्या ऐवजी २०२२ हे लक्ष्य आपल्या समोर ठेवले आहे.

यावर्षीच दिल्लीत पोलिसांनी काही तरुणांना खलिस्तानवादी झेंडे फडकवल्याबद्दल अटक करून शिक्षा देखील केली होती.

याचाच अर्थ खलिस्तानवादी चळवळ पूर्णपणे संपलेली नाही.दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाशी या चळवळीचा संबंध नसला तरी सध्या सरकार करत असलेल्या दडपशाहीमुळे पसरत असलेल्या असंतोषाचा फायदा घेऊन या अतिरेकी संघटना पुन्हा जोर खाऊ शकतात हे नक्की.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.