ते अखेरपर्यंत काँग्रेसच्या हाता पाया पडत राहिले, “आम्हाला पाकिस्तानात ढकलू नका “

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक लोकांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. स्वातंत्र्य मिळालेल्या भारतात राहण्याचं अनेक क्रांतिकारकांचं स्वप्न होतं पण अनपेक्षित घटनांनी ते काही जणांचं स्वप्न पूर्ण झालं नाही. त्यापैकीच असेच एक क्रांतिकारक होते खान अब्दुल गफ्फार खान.

खान अब्दुल गफ्फार खान हे फ्रंटियर किंवा सरहद गांधी म्हणून सगळ्यांना परिचित आहेत. १८९० साली पेशावरमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आणि अलिगढ युनिव्हर्सिटी मधून उर्वरित शिक्षण पूर्ण केलं. बाचा खान आणि बादशाह खान म्हणून त्यांना लोक ओळखत असत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अब्दुल गफ्फार खान यांनी आपलं सगळं आयुष्य पणाला लावलं.

भारतावर इंग्रजांचं लादलं गेलेलं राज्य त्यांना मान्य नव्हतं. इंग्रज भारतीयांचा अतोनात छळ करत असे त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं. १९१९ साली जेव्हा फौजी कानून लागू करण्यात आला तेव्हा अब्दुल गफ्फार खान यांनी त्याचा कडाडून विरोध केला. ठिकठिकाणी त्यांनी इंग्रजांच्या जुलमी राजवटीचा निषेध केला.

अब्दुल गफ्फार खान यांचा वाढता प्रभाव बघून इंग्रजांनी त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबलं. काहीही कारण नसताना इंग्रजांनी त्यांना सहा महिने तुरुंगवास भोगायला लावला. याच काळात अब्दुल गफ्फार खान यांची ओळख महात्मा गांधींशी झाली. महात्मा गांधी यांचा अहिंसात्मक पद्धतीने विरोध करणे हा विचार अब्दुल गफ्फार खान याना पटला. अहिंसावादी धोरण त्यांनी अवलंबलं.

१९२० साली खिलाफत चळवळीत महात्मा गांधींसोबत ते सहभागी झाले. ज्यावेळी खिलाफत चळवळीचा प्रभाव ओसरला तेव्हा इंग्रजी राजवट अधिकच आक्रमक होऊन जनतेवर अन्याय करू लागली. तेव्हा अब्दुल गफ्फार खान यांनी विरोध म्हणून १९३० साली खुदाई खिदमतगार नावाची संघटना सुरु केली. 

खुदाई खिदमतगार संघटनेमुळे मुस्लिम समाज एकवटला आणि अब्दुल गफ्फार खान यांच्यामुळे ते सगळे जण अहिंसावादी धोरणाने लढू लागले. याच दरम्यान मिठाचा सत्याग्रह झाला यात सुद्धा अब्दुल गफ्फार खान यांची भूमिका महत्वाची होती. पण पुन्हा त्यांना इंग्रज राजवटीने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

अब्दुल गफ्फार खान यांचा लढा अहिंसात्मक जरी असला तरी तो तीव्र होता त्यामुळे इंग्रज राजवट त्यांना दबकून राहत असे. त्यांनी लोकांना सांगितले होते कि मी तुम्हाला असं हत्यार देणार आहे त्यापुढे इंग्रज फौजा काहीच करू शकत नाही. ते अस्त्र आहेत संयम आणि अहिंसा.

ज्यावेळी अब्दुल गफ्फार खान यांना अटक झाली तेव्हा देशभरातून इंग्रजांचा निषेध करण्यासाठी मोर्चे निघू लागले. किस्सा ख्वानी बाजारात इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात खुदाई खिदमतगार संघटनेचे बरेच लोक मारले गेले. लहान मुले, महिला, वृद्ध नागरिक असे अनेक निष्पाप लोकं त्यादिवशी मारली गेली. ५०० पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला.

या घटनेने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी चाललेला लढा अधिकच आक्रमक झाला. पुढे गांधी इर्विन यांच्यात झालेल्या चर्चेतून अब्दुल गफ्फार खान यांची सुटका झाली. देशाला स्वातंत्र्य मिळालं खरं पण सगळ्यात वाईट घटना घडली ती म्हणजे फाळणी.

देशाच्या या विभाजनाने अब्दुल गफ्फार खान हे प्रचंड नाराज आणि दुखी झाले.

गांधीजी कोलकत्याला जायला निघाले तेव्हा खान अब्दुल गफार खान त्यांना निरोप द्यायला रेल्वे स्थानकावर गेले.

‘‘महात्माजी, मी तुमचा सैनिक आहे. तुमचा शब्द माझ्यासाठी कायदा आहे. तुमच्यावर माझा पूर्ण भरवसा आहे, परंतु आज आपलेही पाठबळ नाही’’

नाईलाजाने त्यांनी पाकिस्तानची वाट धरली. पण पाकिस्तानात जाऊनही तिथे ते तिथल्या राजवटीविरुद्ध लढत राहिले.

नेहरूंनी त्यांना पुरस्कार देण्यासाठी भारतात बोलवलं, त्यावेळी भाषण करताना ते म्हणाले कि,

भारत ने मुझे भेडियों के सामने डाल दिया हे,

मेरी एक भी मांग पुरी नहीं हुई…

१९८७ साली अब्दुल गफ्फार खान यांना भारतातला सर्वश्रेष्ठ समजला जाणारा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. पाकिस्तानात गेल्यावर त्यांना पाकिस्तान सरकारने नजरकैदेत ठेवले हे मोठं दुर्दैव. देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या अब्दुल गफ्फार खानांना त्यांच्या शेवटच्या काळात वाईट वागणूक मिळाली. २० जानेवारी १९८८ साली त्यांचं निधन झालं. 

तेव्हा राजीव गांधी भारताचे पंतप्रधान होते. सरहद्द गांधींच्या मृत्यूविषयी कळताच ते तातडीने पेशावरला गेले. भारताने आणि अफगाणिस्ताननेही सरहद्द गांधींच्या निधनानिमित्ताने दुखवटा पाळला, पण पाकिस्तानी पार्लमेंटचे तेव्हा अधिवेशन सुरू असूनही त्यांच्या निधनाचा साधा उल्लेख देखील तेथे करण्यात आला नाही.

भारत देशाला स्वातंत्र्य करणाऱ्या आद्य क्रांतिकारकांमध्ये त्यांचं नाव कायमच वरच्या रांगेत आहे. सरहद गांधी हि त्यांची ओळख जगभरात गाजली होती.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.