अंपायरला गोळी घालून डॉन बनलेलं युपीचं पोरगं थेट दाऊदला नडायला निघालेलं

डॉक्टरचा भाऊ डॉक्टर बनतोच असं नाही, खेळाडूचा भाऊही खेळ सोडून दुसरी लाईन पकडतो, दोन लाईनी मात्र अशा असतात जिथं भावाच्या पावलावर पाऊल कळत-नकळत का होईना, पण पडतंच.एक म्हणजे बिझनेस आणि दुसरी लाईन म्हणजे भाईगिरी…

दाऊद आणि इकबाल कासकर, अमर आणि अश्विन नाईक अशी कित्येक उदाहरणं भाईगिरीतल्या भावकीत आहेत. आवाज असाच एक भाईगिरीचा किस्सा सांगतो, जो मुंबईतला नाही तर उत्तर प्रदेश मधलाय. पण त्यातही एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे अंडरवर्ल्ड..!

छोटा राजन गॅंगमधला खास शूटर म्हणजे जफर सुपारी खान. जफर सुपारी एवढा खुंखार होता, की तो वयाच्या १५ वर्षीच खून करुन जेलमध्ये गेला. त्याला मारायची सुपारीच ५ कोटींची होती. जफरचा भाऊ खान मुबारक. लहान वयात डॉन झाला, आणि पुढं जाऊन भावाप्रमाणंच छोटा राजनच्या टोळीत सामील झाला. बरं मुबारकची भाईगिरीमधली स्वप्न एवढी मोठी होती की, त्यानं छोटा राजन सोबत मिळून दाऊदला मारण्यासाठी टोळी बनवली.

मुबारक गुन्हेगारी विश्वात कसा आला, याचा किस्साही खतरनाक आहे…

मुबारक एकदा क्रिकेट खेळत होता, आता ती काय मोठी स्पर्धा किंवा भारतीय संघातून खेळण्याची संधी देणारी मॅच नव्हती. मुबारक नेमका रनआऊट झाला, ज्या अंपायरनं तो आऊट असल्याचं सांगितलं, मुबारकनं त्याचा एन्डगेम केला. गुन्हेगारी विश्वात त्याची अधिकृतपणे एंट्री झालेली.

पुढं २००६ मध्ये त्यानं प्रयागराजमधलं पोस्ट ऑफिस लुटलं, त्या भागात तेव्हा डॉन मुन्ना बजरंगीचा कंट्रोल होता. साहजिकच मुबारक आणि मुन्नामध्ये राडे झाले. शूटआऊट झाले आणि खूनही पडले. पुढं मुबारक मुंबईला गेला आणि छोटा राजनच्या टोळीत सामील झाला. मुंबईच्या दुनियेत त्याचं नाव झळकलं, ते काळाघोडा चकमकीमध्ये. छोटा राजनचा खास माणूस एजाज खानकडून अमजद खान आणि हिमांशु चौधरी यांनी ५० लाख घेतले आणि परत न देताच ते दाऊदला जाऊन मिळाले. 

राजनला या दोघांची सुपारी मिळाली होती, पण अमजद आणि हिमांशू मुंबई पोलिसांच्या ताब्यात होते. पण मुबारक आणि त्याच्या शूटर्सनी डेरिंग दाखवली. मुंबईच्या काळाघोडा एरियामध्ये या गॅंगनं पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या अमजद आणि हिमांशूला उडवलं. दिवसाढवळ्या झालेल्या या केसनं मुंबईत दहशत पसरवली. पुढं राजनला दगा देणाऱ्या राजनच्याच माणसाला मुबारकनं संपवलं आणि गोळ्यांनी छिन्नविछिन्न झालेलं त्याचं शरीर रेल्वे स्टेशनवर सापडलं.

कधी पोलिस स्टेशनच्या आत, कधी बाहेर असंच मुबारकचं सुरू होतं, पोलिसांसोबत त्याच्या चकमकी झाल्या, पण मुबारक प्रत्येकवेळी निसटत राहिला. मुबारक २०१२ मध्ये तुरुंगातून बाहेर आला आणि आल्याआल्या त्यानं खंडणी वसूल करायचं काम सुरू केलं. आता त्याच्या गुन्हेगारीला वेगळं वळण मिळालं होतं. खंडणी, जमिनीचा व्यापार आणि शुटर पुरवायचं काम तो करू लागला.

पण आता राडे घरापर्यंत आले होते, बसपाचा नेता होता जुगराम मेहंदी, त्याच्या नावावरही दरोडा, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल होते. त्याच्यात आणि मुबारकमध्ये राडे होऊ लागले, जुगरामच्या माणसांनी मुबारकवर हल्ला केला, मग हा हल्ल्यांचा सिलसिला सुरू राहिला, अखेर ऑक्टोबर २०१८ मध्ये मुबारकच्या टोळीनं तो जेलमध्ये असताना एका चकमकीत जुगरामला संपवलं आणि एका संघर्षात बाजी मारली.

जेलमध्ये असताना त्यानं फक्त खूनच नाही केला, तर एक व्हिडीओही व्हायरल केला. ज्यात तो म्हणत होता, ‘माझ्यावर हल्ला करायचा प्रयत्न होतोय, पण खान मुबारक कधीच न संपणारी टोळी आहे. मला चुकूनही काही झालं, तर खाकी आणि खादी कुणाचंच काही खरं नाही.’ त्याच्यासारखा कुख्यात गुंड जेलमध्ये बसून खून करतो, धमकवणारे व्हिडीओ टाकतो यावरुन बराच गदारोळही झाला होता.

उत्तर प्रदेश पोलिसांनी कारवाईत मुबारकच्या १७ कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली. उत्तरप्रदेश मधल्या टॉपच्या गुंडांमध्ये त्याचं नाव घेतलं जातंय आणि मिशन क्लीन युपीनुसार तो पोलिसांच्या रडारवरही आहे, त्यामुळं मुबारकच्या स्टोरीचा शेवट अजूनतरी झालेला नाही हे खरं आणि तो कसा होईल हे सांगताही येत नाही…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.