ज्यांना शिकवतात त्यांनाच हिंसेसाठी प्रवृत्त करताय म्हणून खान सरांवर गुन्हा दाखल झालाय

देशभरातील विद्यार्थी सध्या परीक्षा, अभ्यास आणि नोकऱ्या अशा कारणांनी तणावात असल्याचं जाणवत आहे. उत्तर प्रदेशमध्ये २४ जानेवारीला नौकऱ्या न मिळणं आणि परीक्षांमध्ये अनियमितता या मुख्य कारणांमुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. विद्यार्थ्यांनी रेल्वे रुळावर उतरून आपलं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग अवलंबला होता. या विद्यार्थ्यांना हलवण्यासाठी पोलिसांनी खूप प्रयत्न केले. या घटनेसंदर्भात पोलिसांवर आरोप लावण्यात आले आहेत की, ६ पोलिसांनी हॉस्टेलमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे. त्यामुळे संबंधित पोलिसांना सस्पेंड करण्यात आलं आहे.

आता याचंच प्रतिबिंब बिहारमध्ये दिसत आहेत. बिहारमध्येही सध्या विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. बिहारमध्ये आरआरबी एनटीपीसी निकालासंदर्भात तरुण आंदोलन करताय. दरम्यान, पाटणा पोलिसांनी अनेक कोचिंग ऑपरेटरसह ४०० हून जास्त लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कोचिंग इन्स्टिट्यूटवर विद्यार्थ्यांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

या प्रकारणांसंदर्भात विशेष गोष्ट अशी की, या लोकांमध्ये प्रसिद्ध खान सर यांचाही समावेश असल्याचं समोर आलंय.

ज्यांचा समावेश असल्याच्या बातमीने हे प्रकरण तापलं आहे ते खान सर कोण आहेत, हे आधी जाणून घेऊया…

खान सर हे एक असे शिक्षक आहेत जे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत. सोशल मीडिया आणि युट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी त्यांचे व्हिडीओज फॉलो करत असतात. ‘खान जीएस रिसर्च सेंटर’ नावाने त्यांचं चॅनेल प्रसिद्ध आहे. कठीण गोष्टी सोप्या शब्दांत समजावून सांगण्याच्या शैलीसाठी खान सर यांना ओळखलं जातं.

बिहारमध्ये हे विद्यार्थी का आंदोलन करतायेत?

गेल्या १४ आणि १५ जानेवारीला रेलवे रिक्रूटमेंट बोर्डाने (RRB) एनटीपीसी सीबीटी-१ (NTPC CBT-1) परीक्षेचा निकाल जाहीर केला होता. या निकालाच्या आधारे, उमेदवारांना CBT-2 म्हणजेच फेज II परीक्षेसाठी निवडण्यात आलं आहे. पण एनटीपीसी सीबीटी-१ च्या निकालात हेराफेरी झाल्याचा आरोप  विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांनी आरआरबीविरोधात निदर्शने सुरू केलीयेत. याच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी पॅसेंजर ट्रेन पेटवली आणि पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप लावण्यात आला.

याप्रकरणी खान सरांवर एफआयआर का नोंदवण्यात आलीये?

हिंसा केल्याप्रकरणी पोलिसांनी २४ आणि २५ जानेवारीला काही विद्यार्थ्यांना अटक केली. या अटक केलेल्या विद्यार्थ्यांनी पोलिसांना सांगितलं की, सोशल मीडियावर एक व्हिडिओ त्यांच्याकडे आला होता ज्यात त्यांना हिंसा आणि दंगा करण्यासाठी प्रवृत्त केल्या गेलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडिओमध्ये खान सर विद्यार्थ्यांना RRB NTPC परीक्षा रद्द न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास प्रवृत्त करत होते. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खान सर आणि इतर कोचिंग क्लासेसच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला गेलाय.

यावर खान सर मीडियासमोर बोलते झाले आहे. तेव्हा बघूया त्यांचं काय म्हणणं आहे?

खान सरांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपाला साफ नकार दिला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, ते विद्यार्थ्यांना प्रवृत्त करत नसून त्यांना शांत होण्यासाठी सांगत आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलन करू नये असं ते वारंवार विद्यार्थ्यांना सांगतायत. जर त्यांच्या सांगण्याने विद्यार्थी आंदोलन करतायत, हिंसा करतायत असं असतं तर या समीकरणानुसार आम्ही विद्यार्थ्यांशी बोलणं बंद केल्यावर आंदोलनही शांत व्हायला हवं होतं. पण तसं होत नाहीये. हे आंदोलन कोणत्याही लीडर शिवाय चालू असून जे होतंय ते विद्यार्थी स्वतः करतायत, असं खान सरांचं म्हणणंय.

शिवाय हे आंदोलन हिंसक होण्यामागे खान सरांनी आरआरबीला मुख्य दोषी सांगितलं आहे. 

खान सरांनी सांगितलं की, आरआरबीच्या एका निर्णयामुळे दोन विद्यार्थी समूह एकत्र येऊन आंदोलन करतायत आणि म्हणून आंदोलन उग्र रूप घेतंय. २४ जानेवारीला एनटीपीसीचे जवळपास ५०० विद्यार्थी पाटणाच्या राजेंद्र नगर टर्मिनलवर आरआरबीच्या नोटिफिकेशनची वाट बघत होते. पण तेव्हा आरआरबीने ग्रुप डीच्या विद्यार्थ्यांसाठी नोटीस जारी केली. यात त्यांनी जो खुलासा केला त्याने ग्रुप डीचे विद्यार्थी संतप्त होऊन एनटीपीसीच्या विद्यार्थ्यांसोबत सामील झाले.

नोटिफिकेशन असं होतं की, ग्रुप डी वाल्या विद्यार्थ्यांची आता मेन्सची परीक्षा होणार आहे. या विद्यार्थ्यांनी २०१९ मध्ये परीक्षा फॉर्म भरला होता. आता फेब्रुवारीमध्ये त्यांची परीक्षा आहे आणि परीक्षेच्या १५ दिवस अगोदर आरआरबी याबद्दल बोलतंय. ग्रुप डीचे सिंगल एक्झाम देणारे जवळपास दीड करोड विद्यार्थी आहे. हे विद्यार्थी आरआरबीच्या अशा वागण्याने  रागावले आणि तेही आंदोलनाला उतरले, ज्यामुळे आंदोलन मोठं आणि उग्र झालं आहे.

यावर सरकारचं काय म्हणणं आहे?

संतप्त आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर २६ जानेवारीला रेल्वेने विद्यार्थ्यांच्या  RRB NTPC CBT-1 आणि ग्रुप डी  CBT-2 परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र रेल्वेचं म्हणणं आहे की, परीक्षेच्या निकालात कोणताच गोंधळ झाला नाहीये. त्यांच्या टीममध्ये अनुभवी लोक आहेत ज्यांनी याआधीही यशस्वीपणे हे कार्य केलं आहे. मात्र जर विद्यार्थ्यांचा  हेराफेरीचा आरोप आहे, ते आंदोलन करत आहेत तर नवीन समिती स्थापन करून चौकशी केली जाईल. ही समिती तीन आठवड्यांत आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे.

रेल्वेच्या या निर्णयावर खान सरांचं म्हणणं आहे की, हा निर्णय जर रेल्वे शासनाने आधीच घेतला असता तर हिंसाचार वाचला असता. खान सरांनी यासंदर्भात ट्विटरवर जवळपास ८ मिलियन ट्विट केले होते, पण आरआरबीने त्याकडे लक्ष दिल नाही. परिमाणी हे आंदोलन झालं आहे. आता या प्रकरणात पुढे काय होतंय, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.