तो पाणीवाला पोरगा.

२-३ वर्षापूर्वीची गोष्ट असेल. शनिवारी नाशिकला मुक्काम होता. रविवारी सकाळी ठाण्याला परतायचे होते. पण कळाले की कसारा घाट जॅम आहे. आता जरा प्रवास सुसह्य झाला आहे. आधी एकच घाट होता आणि त्यात दोन लेन. घाट जॅम असल्याने विचार केला की दिवसभर नाशिकमध्येच थांबू आणि मग संध्याकाळी निघू. अमोल होताच टाईमपास करायला आणि सोबतीला. संध्याकाळी निघताना कळाले की ट्रॅफिक जॅम अजून आहे. मग ठरवले की कसारापर्यंत काळी-पिवळीने जाऊ. मग तिथून ट्रेनने पुढे मार्गी लागू.

मग त्याप्रमाणे निघालो. कसाऱ्यापर्यंत पोचलो आणि कळाले की घाट खाली आहे पण पुढे जॅम झालाय. मी मनात म्हटले जाऊ दे नाहीतरी आपल्याला ट्रेनने जायचे आहे. कसारा स्टेशनला आलो तिकीट काढले आणि बघितले तर स्टेशनला ही गर्दी! कुठेतरी डबे घसरले होते. त्यामुळे ट्रेन नव्हती. मनात म्हटले की आता लागली, आता आपण काय घरी लवकर पोचत नाही.

तिकीट खिडकीपाशी गेलो तर तिकडचा माणूस बोलला की ट्रेन ८ शिवाय काय येणार नाही! तुम्ही हायवेला जाऊन बघा काही वाहन मिळते का? पण तिकडेही जॅम असल्याचे माहीत होते. म्हणून तो प्रयत्न काही केला नाही. मग विचार केला, कसारा गाव फिरू. बघुतरी काय काय आहे ह्या गावात. म्हणून स्टेशनच्या बाहेर पडलो. काहीतरी खावे म्हणून इकडेतिकडे बघितले. पण रस्त्याने उडणारी धूळ आणि त्यात असलेली वडापावची गाडी पाहून वडापाव खायची इच्छा मरून गेली. एक पाण्याची बाटली घेतली आणि निघालो. आता सगळ्याच पाण्याच्या बाटल्यांवर आयएसआय मार्क कसे असते हा एक गहन प्रश्न आहे. त्या बाटल्यांचा दर्जाही भिक्कार असतो.

पाण्याची चव कुणाला कळते म्हणा. असो. मी गावात फिरायला निघालो.

संध्याकाळ होत आलेली. कसारा गाव काही फार मोठे नाही. दहा-बारा पावले चाललो आणि कळाले पुढेतर सरळ हाय-वे लागतो. आता वेळ कसा काढायचा हा विचार पुन्हा डोक्यात आला. अमोलला फोन केला तर साला फिदी फिदी हसायला लागला. मला बोलला, ‘सर, मी ‘इनायत’मध्ये क्रिकेट सामना बघतोय. स्कोर सांगू का?’ त्याला २-४ शिव्या हासडल्या आणि फोन ठेवला. च्यामारी सगळे मस्त सामना बघत असतील आणि मी इकडे फिरतोय.

आता काय करायचे म्हणून एका पानवाल्याला विचारला की इकडे टीव्ही कुठल्या हॉटेलमध्ये असेल? तो खोखो हसला. मग मलाच कळाले की आयला, मी कसाऱ्यामध्ये असा कसा प्रश्न विचारू शकतो ! मग तो बोलला की तिकडे एक बार आहे, तिथे आहे टीव्ही…मी मनात हसलो…मग तर सोने पे सुहागा…बारच्या शोधात मी निघालो.

निघताना एका कोपऱ्यात ४-५ पोरे सिगारेट ओढताना दिसली. त्यातला एक चेहरा ओळखीचा दिसला. मला बघताच तो पसार झाला. जाताना त्या वासावरून कळाले की ही पोरे तर वीड पीत होती. मी अंदाज लावत होतो की हा पोऱ्या कोण? जास्त वेळ लागला नाही. तो कसारा स्टेशनवर पाणी विकणारा पोरगा होता. मी बार न शोधता त्याच्या मागे गेलो तर तो तिकडे बहुधा माझीच वाट बघत होता.

त्याची आणि माझी तशी चांगली ओळख होती. कधी कूल कॅबने गेलो नाही तर कसारा लोकलने जायचो. तेव्हा नेहमी त्याच्याकडून पाणी घ्यायचो. गाडी सुटेपर्यंत माझ्याशी गप्पा मारायचा. तो गुटखा खायचा पण मी डोळे वटारले की लगेच चूळ भरून यायचा आणि म्हणायचा, ‘सॉरी सर, परत नाही खाणार.’ अर्थात नेहमीच खायचा. तोच माझी वाट बघत होता. त्याला बोललो, ‘काय रे, चरस ओढत होता की गांजा?’ तो जास्त आढेवेढे न घेता बोलला, ‘सर, तुम्हाला मी म्हणून मानतो? सरळ मुद्दयावर बोलता. आणि समोरचा नक्की काय करत होता याचा अंदाज करेक्ट बांधता.’ मी बोललो, ‘ते सोड. पण हे काय आता नवीन.’

मला मग तो सांगायला लागला. ‘सर, घरी कुणी काम करत नाही. आई आजारी असते. बाप सोडून गेला कधीच. अधूनमधून येतो ते पण पैसे मागायला. मी दिवसाला १०० रुपये कमावतो. त्यात काही आईची औषधे आणि लहान भावाच्या शिक्षणात खर्च होतात.’ १३-१४ वर्षाचा पोरगा घरातल्या कर्त्या पुरुषासारखा बोलत होता. ‘आज बापाशी भांडण झाले. डोक्याला ताप झाला. मग स्वस्तात मिळणारा गांजा घेऊन जरा डोके हलके करत होतो. बापाने माझे क्लासचे पैसे हिसकावून घेतले आणि निघून गेला’.

मग त्याने सांगितले की ‘मला शिक्षणाची फार आवड नाही पण इंग्लिश बोलता आले तर मुंबईला नोकरी करता येईल म्हणून इंग्लिशचा क्लास लावणार होतो.’ मी त्याला बोललो, ‘मी तुझ्या क्लासचे पैसे देतो. किती लागतील? पण एका अटीवर देईन. तू मला ते व्याजासकट परत द्यायचे एकरकमी. कारण फुकट दिलेल्या पैशाची कुणाला कदर नसते.’ त्याने डोळे मिचकावून सांगितले, ‘सर, २००० रुपये लागतील.’ मी त्याला काढून दिले. आणि बोललो की ‘मी तुला मध्ये काहीच विचारणार नाही. मी जर तुला दिसलो तर तूच मला काय प्रगती आहे ते सांगायचे.’ त्याने ते कबूल केले. ‘मी आशा करतो की तू पुन्हा गांजा पिणार नाहीस.’ त्याने मान डोलावली. आणि निघून गेला.

तो बहुधा खिन्न असावा. जाताना काहीच बोलला नाही. नंतर मी कामाला लागलो आणि जवळच बार सापडला. त्यात टीव्हीपण होता. छोट्या शहरामध्ये एक भारी असते की पिण्यासोबत फक्त चणे-फुटाणे मिळतात. बास. बाकीचे तुम्ही काय ते बघायचे. इकडे समोरच एक चायनीजचे हॉटेल होते. तिकडून ऑर्डर आणून मिळेल असे वेटर कम मालक बोलला. मी काहीतरी ऑर्डर दिली तर तोच पाणीवाला पोरगा ऑर्डर घेऊन आला. मी काही बोलणार इतक्यात तोच बोलला, ‘सर, रात्री कुणी पाणी विकत घेत नाही. मग इकडे काम करतो. २० रुपये मिळतात आणि जेवण.’ मी काही प्रतिक्रिया देऊ शकलो नाही. नंतर मग जातानाही डोक्यात त्या पोराचा भुंगा फिरत होता. फक्त तोंडओळख होती. त्याचे नावसुद्धा माहीत नव्हते.

पण त्याने जे काही मला सांगितले हे मला खरे वाटले आणि त्याच्या डोळ्यात एक सच्चेपणा होता. तितक्यात ट्रेनचा भोंगा ऐकू आला. रात्री घरी आलो. एका मित्राला फोन केला आणि हा किस्सा सांगितला तर तो बोलला, तुला त्याने येडा बनवला. मी बोललो नक्की सांगता येत नाही पण तो प्रामाणिक वाटला.

यानंतर माझे नाशिकला जाणे जवळपास बंद झाले. आणि कधी गेलोच तर कारने वगैरे गेलो. कसारा लोकलने गेलो नाही. काल बऱ्याच दिवसांनी नाशिकला जाणार होतो. मग सहज विचार केला कसारा लोकलने जाऊ. मी त्या पोराला पार विसरून गेलो होतो. विचार केला की कसारा लोकलने जाताना उन्हात फुलणारी रंगीबेरंगी फुले दिसतील. आणि म्हणून ९.१५ ची लोकल ठाण्यावरून पकडली.

कसाऱ्याला पोचलो. काळीपिवळी बघत होतो. तर एक मारुती जिप्सी दिसली जी नाशिकसाठीच होती. मी पुढे जाऊन बसलो. तर मागून आवाज आला, ‘सर, पाणी हवे आहे काय? मी न बघताच नको रे असे बोललो आणि मागे फिरून बघितले तर तो पोरगा दिसला. मी आश्चर्यचकित झालो. ‘अरे तू? कसा आहेस? मोठा दिसायला लागलास. काय करतोस सध्या?’ तो बोलला, ‘दुपारी पाणी विकतो आणि रात्री कॉलेजला जातो. अकरावीला आहे. आणि सर, I can talk in proper english without any hesitation.’ आणि हसायला लागला. मी मनात बोललो, भारीच.

घरचे कसे आहे असे विचारल्यावर त्याने आपल्या भावाला खुणेनेच बोलावले. त्याची आणि माझी ओळख करून दिली. मग बोलू लागला की, ‘सर, हा पण दुपारी काम करतो आणि रात्री शिकतो. आई गेल्यावर्षी वारली आणि बापाचा पत्ता नाही. आता घरी येत नाही.’ मला पुढे काही विचारायची हिम्मत झाली नाही.

अचानक त्याला काहीतरी आठवले. मला बोलला, ‘सर,एक मिनिट थांबा. मी लगेच आलो. तुमचे पैसे द्यायचे आहेत. आलोच.’ मग मला आठवले की याला मी पैसे दिले होते. गाडीवाल्याला सांगून गेला की गाडी थांबव रे, मी आलो. तो पळत पळत गेला. गाडी भरली होतीच. मी गाडीवाल्याला बोललो. ‘चल, आपण निघूया, बाकी लोकांना त्रास नको.’ तो बहुधा पुढेच राहत होता. कारण मला तो धावत घराकडे जाताना दिसला तसा परत येतानाही दिसला. पण आता मला ते पैसे परत घ्यायचे नव्हते. कारण ते व्याजाने १०० पट वाढले होते. आणि मला ते तसेच ‘लाँग टर्म डिपॉझीट’ म्हणून त्याच्याकडेच ठेवायचे होते.

त्याच्या हातात मला पाकीट दिसले. मी त्याला धावत्या गाडीतूनच हात दाखवला आणि ऑल द बेस्टची खूण केली. गाडीवाला बोलला, ‘बहुधा तुम्हीच त्याचे ते अनोळखी सर दिसताय. खूप बोलायचा तुमच्याबद्दल!’  मी काही न बोलता स्वत:ला सावरून घेत मोबाईलवर गाणी ऐकत पुढे निघालो. चेहऱ्यावर आनंद होता कारण तो ‘जिंकला’ होता.

  • अविनाश वीर (६ मार्च २०११)
  • av
Leave A Reply

Your email address will not be published.