औरंगजेबाने शंभूराजांच्या पुत्रास मुस्लीम धर्म स्वीकारण्यास सांगितलं इतक्यात..

मराठा स्वराज्यासाठीचा काळा कालखंड सुरू होता. छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीत सापडले होते. त्यांनी धर्मांतर करावं म्हणून बादशहा अनन्वित छळ करत होता.

मात्र अखेरच्या श्वासापर्यंत शंभू महाराजांनी बादशहाच्या धर्मांतराच्या मागणीला भीक घातली नाही.

संभाजी महाराजांनी स्वाभिमानापायी प्राणाची आहुती दिली.

अनेक गडकिल्ल्याप्रमाणे स्वराज्याची राजधानी रायगड मुघलांनी जिंकून घेतली. रायगडाचा लढा नेटाने चालवणाऱ्या महाराणी येसूबाई व शंभुपुत्र युवराज शाहू महाराज मुघलांना सापडले.

धाकटे छत्रपती राजाराम महाराज यांना दक्षिणेत परागंदा व्हावे लागले होते. पण मराठ्यांनी हार मानली नाही. महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेल्या औरंगजेबाला त्राही त्राही करून सोडले.

मुघलांच्या घोड्यांनाही पाण्यात मराठे दिसू लागले होते.

छत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या वागणुकीमुळे किती मराठे पेटून उठले हे औरंगजेबाला दिसत होते. म्हणूनच त्याने संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई व त्यांचा मुलगा शाहू यांचा विशेष छळ केला नाही.

औरंगजेबाची सर्वात थोरली व लाडकी मुलगी

झैबुनिस्सा हीचे शाहू महाराजांवर अपत्यवत प्रेम होते.

ती एकदम औरंगजेबाच्या स्वभावाच्या विरुद्ध होती, ती सुशिक्षित होती, स्वभावाने दयाळू होती, कट्टर धर्माधंतेचा तिला राग यायचा. तिला कविता करायची आवड होती.

झैबुनिस्सा प्रचंड हुशार होती, औरंगजेब बादशाह राज्यकारभारात तिचा सल्ला घ्यायचा. या झैबुनिस्साच्या आग्रहामुळे औरंगजेबाने महाराणी येसूबाई व शाहू महाराज यांच्यावर अत्याचार होऊ दिला नाही.

१७०० साली राजाराम महाराजांचा सिंहगडावर मृत्यू झाला.

त्यांचा मुलगा अल्पवयीन होता, शाहू महाराज कैदेत होते. पण तरीही राजाराम महाराजांच्या पत्नीने ताराराणींनी पराक्रमाने छत्रपतींची गादी सांभाळली.

कित्येक वर्षे दक्षिणेत ठाण मांडूनही मराठे आपल्याला शरण येत नाहीत यामुळे औरंगजेबाचा संयम सुटत चालला होता.

त्याने शाहू महाराजांचे धर्मांतर करावे असा आग्रह सुरू केला.

अवघ्या सात आठ वर्षाचे असताना शाहू महाराज औरंगजेबाच्या तावडीत सापडले होते. तेव्हा पासून पुढची अनेक वर्षे त्यांनी कैदेत काढली होती. मुघल बादशाहने काहीही करून त्यांना मुस्लिम बनवायचे ठाण मांडले होते.

अखेर झैबुनिस्सा शाहू महाराजांच्या मदतीला आली.

तिने आपल्या वडिलांची समजूत काढली. शाहूमहाराजांच्या वतीने ज्योत्याजी केसरकर यांनी बाजू मांडली. हट्टी समजला जाणारा औरंगजेब बादशाह अखेर तयार झाला पण त्याने अट घातली,

मी निश्चित केला तो मोडल्यास माझ्या शब्दाची किंमत जाते, बादशहाचा उच्चार लटका पडता नये, तर एक युवराज शाहु ऐवजी दुसरे दोन प्रसिद्ध पुरुष मुसलमान होत असतील तर मी शाहुपुरता आपला हुकुम मागे घेतो.

बादशाहला वाटले की या अटीसाठी कोणी तयार होणार नाही.

आपल्या धन्यासाठी हे वेड धाडस करायला दोन तरुण समोर आले.

खंडेराव गुजर आणि जगजीवन गुजर

स्वराज्याचे महान पराक्रमी सेनापती प्रतापराव गुजर यांची ही दोन मुले. बहलोल खानाच्या दगाबाजीचा बदला घेण्या साठी अवघ्या सहा सैनिकांसह लढून आपले प्राणार्पण करणारे प्रतापराव यांचं वेडं रक्त त्यांच्या मुलांच्यातही दौडत होत.

स्वराज्याचा वारस जगला पाहिजे फक्त एवढ्या साठी स्वतःहून हे हलाहल पिण्यास ते तयार झाले.

१६ मे १७०३ रोजी मोहरम च्या मुहूर्तावर या दोन्ही भावांना मुसलमान करून त्याचा नावे अब्दुर्रहीम व अब्दुरेहीमान अशी ठेवली गेली.

त्यांनी असें धर्मांतर केल्यामुळें शाहू महाराजांवरील हा प्रसंग टळला.

प्रतापराव गुजर यांची एक मुलगी राजाराम महाराजांना दिली होती, या नात्याने हे दोन्ही भाऊ शाहू महाराजांचे भाचे लागत होते. शाहूमहाराज त्यांचे उपकार कधी विसरले नाहीत.

आमचा मामा आम्हाबदल मुसलमान जाहला

असे त्यांनी म्हटल्याचे उल्लेख समकालीन कागदपत्रात आढळतात.

पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांची सुटका झाली. गादीवर बसल्यानंतर त्यांनीं खंडोजी गुजर यांना त्यांच्या कृत्यासाठीं, परळ खोर्‍यांतील साठ गांवांचें देशमुखी वतन इनाम करून दिलें.

हें वतन त्यापूर्वी सुभानजी लांवघऱें याला, त्यानें सातारचा किल्ला फितूर होऊन औरंगझेबास दिल्यामुळें त्यांच्याकडून इनाम मिळालें होतें. तें त्याच्याकडून जप्‍त करून शाहूमहाराजांनी गुजर यांना दिले. पण तत्कालीन धर्ममार्तंडांनी गुजर यांना परत धर्मात येऊ दिल नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.