त्या अफवेमुळं अख्खा खान्देश रात्रभर जागा राहिला होता !

“अफवा” ही गोष्ट प्रकाशाच्या व आवाजाच्या वेगानंतर सर्वात वेगाने पसरणारी तिसरी गोष्ट आहे. कोण कधी कुठली अफवा पसरवेल आणि त्या अफवेमुळे काय रान उठेल ह्या बद्दल बोलायचं झालं तर मागे दोन चार आठवड्यापूर्वी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात चार लोकांना मुलं पकडणारी टोळी समजून जमावाकडून मारून टाकण्यात आलं. अत्यंत घृणास्पद असा हा प्रकार होता. हे सर्व फक्त अफवे मुळे झालं होतं.

महाराष्ट्र तसा अफवांच्या बाबतीत फार जास्त “सुबत्त” प्रांत आहे. त्यातल्या त्यात “खान्देश” हा भाग तर अफवांचं माहेरघर म्हटला जावा इतका प्रसिद्ध आहे. 

इथे जर एखाद्या घरात नुसतं भांडण झालं तरी गाव घर फुटल्यापासून घटस्फोटानंतरच्या मुलं बाळांच्या ताब्यापर्यंत चर्चा करून टाकत असतात. रात्री शाळेतल्या झाडावर नाचणाऱ्या कटेल मुंडक्या पासून तर रात्रीची हाक मारणाऱ्या हाका मारी पर्यंतच्या अफवां ऐकून आमचं बालपण गेलं आहे.

 पण एक अफवा आहे जी आजून ही आमच्या खान्देशच्या बऱ्याचशा लोकांच्या आठवणीतील राहिली आहे. अशी अफवा जिच्यामुळे अख्खा खान्देश रात्रभर जागा होता. 

ती अफवा होती “मानमोडी” ची!

साधारणपणे 2006-2007 च्या काळातील घटना आहे. एका रात्री रात्रीच्या अचानक खान्देशातील प्रत्येक घरातील फोन खणाणु लागले. रात्रीचा फोन वाजणे म्हणजे शंभर टक्के वाईट बातमी ह्या हिशोबाने जड अंतःकरणाने लोकांनी तो फोन उचलला, तेवढ्यात पलीकडून आवाज आला की मानमोडी आली, मानमोडी आली आहे, जागे रहा !!

हे हि वाचा –  

बस्स मग एक एक करत खान्देशातील बऱ्यापैकी घरातील लोक जागे व्हायला सुरवात झाली. एक जण जागा व्हायचा तो 5 जणांना जागा करायचा, अश्या प्रकारे पूर्ण खान्देश तसेच पुण्या मुंबईतले खान्देशी जागे झाले. लोकांना काही कळेना फक्त एक भीती होती की मानमोडी आली आहे आणि लोक मरायला सुरवात झाली आहे. बघता बघता मानमोडी व तिच्या कथेमुळे संपूर्ण गाव भयभीत होऊन लहान मुलं, मोठ्या सकट जागा होता. 

मानमोडी मध्ये म्हणे रात्री झोपेतच माणसाचा मान वाकडी होऊन मृत्यू होतो. मग काय मरण्यापेक्षा जागण बरं म्हणून खान्देशातल्या प्रामुख्याने ग्रामीण भागातील जनता रात्रभर जागी राहिली.

दुसऱ्या दिवशी बातमी आली की मानमोडीची अफवा खोटी आहे. 

एका व्यक्तीने त्याचा बायकोला घाबरवण्यासाठी ती अफवा सांगितलेली आणि तिने ती सिरीयस घेत अख्ख्या खान्देशला सांगितलेली होती. 

त्यामुळे अर्धा खान्देश तरी जागा होता. सोबतच दुसऱ्या दिवशी कामाची घाई असणारे मुंबई पुण्याचे खान्देशी लोक पण जागे होते. ह्या एका अफवे मुळे त्याकाळी लोकांच्या दुसऱ्या दिवशीच्या कामाचा पार बट्या बोळ झाला.

तर मानमोडी म्हणजे नेमकं काय होतं की लोक त्या अफवेला इतकं सत्य मानून बसले आणि रात्रभर जागे राहिले ?  

मानमोडी हे प्लेग या संसर्गजन्य आजाराला देण्यात आलेलं नाव आहे. प्लेग ह्या आजाराने 1905-1920 च्या काळात भारतात थैमान घातलं होतं. त्यामुळे अगदी ढिगाने लोक मरत होते. रात्री झोपेतच लोकांना प्लेग होऊन त्यांची मान मोडून ते मरायचे ! 

अगदी भारताच्या स्वातंत्र्यता संग्रामात प्लेगला खूप महत्व आहे. चाफेकर बंधूनी रँड नावाच्या अधिकाऱ्याची हत्या ही या प्लेगच्या साथीमुळेच केली होती. प्लेग हा आजार लसीकरण व वैद्यक शास्त्रातील प्रगतीमुळे नाहीसा झाला परंतु तो आजार लोकांचा मनात अशी दहशत बसवून गेला की तब्बल शतक भरानंतर ही लोक रात्रभर त्याचा भीती ने जागे राहिले होते.

खरंतर या अश्या अफवा त्या टेलिफोन युगात होत्या, सध्या सोशल मीडियाच्या काळात त्या अफवाना कुठलाच नियम अथवा बंधन उरलेलं नाही आहे. कोणी एखादा मेसेज बनवून पाठवला की लोक तो हजार लोकांना पाठवतात. अश्या प्रकारे अफवा सत्य होऊन जाते! त्यावेळी मीडिया ही जागरूक होती, आता मीडिया स्वतः अफवा पसरवते उदाहरण हवं असेल तर 2000 च्या नोटेतील चिप शोधायला घ्या मित्रांनो!

  •  भिडू नचिकेत शिरुडे

हे हि वाचा ! 

1 Comment
  1. Sunil Girnare says

    हो हि अफवा आली होती,तेव्हा मी जळगावला डीएड ला होतो…अख्खी रात्र आम्ही एम जे कॉलेजच्या गेटवर जागून काढली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.