गरीब अल्ताफ शेख ह्याचं आयुष्य डुबऱ्या ने पालटलं होतं.

खान्देश प्रांत तसा महाराष्ट्रातल्या इतर प्रांतात उठून दिसतो तो त्याचा संस्कृतिक वेगळेपणामुळे, अगदी भाषेपासून खाद्य पदार्थांपर्यंत खान्देश आपलं वेगळं कल्चर जपून आहे. खान्देशी लोक स्वभावाला मदमस्त मन मौजी तर असतातच पण खान्देशी लोकांना प्रत्येक मोठया गोष्टीची प्रतिकृती बनवायची सवय आहे, मग औरंगाबादेत ताज महलची कॉपी म्हणून बांधलेल्या बीबी का मकबरा बांधायला पण खान्देशचीच जनता कामगार म्हणून होती. सुदैवाने त्यांचे हात कापायचे धाडस औरंगजेबाने केलं नाही. असो हा आपला विषय नाही.

तर खान्देशात तुम्हाला अगदी प्रत्येक गोष्टीची कॉपी भेटेल, शिर्डीचा साईबाबांच्या मंदिरापासून ते तिरुपतीच्या बालाजी पर्यंत, गुजरातच्या आशा पुरा मातेपासून तर द्वारकेच्या कृष्णापर्यंत, अगदी झ्याक जशीच्या तशी प्रतिकृति उभी करण्यात खान्देशी जनतेने तुफान यश कमावलं आहे. आमच्या इकडंच शहादा प्रकाशा हे प्रतिकाशी आहे असं म्हणतात. तिथल्या सारखा गंगा घाट इथं पण बांधून ठेवलाय. प्रत्येक ऋषी पंचमीला आमच्या इकडच्या बाया बापड्या तिकडं गंगास्नान करण्यासाठी तौबा गर्दी करत असतात.

तर अशा ह्या आमच्या कॉपी कॅट खान्देशात बॉलीवुडची कॉपी करणार नाही तर कसं जमणार होय?

ह्यातूनच खान्देशी चित्रपट सृष्टीचा जन्म झाला, साधारण चाळीस वर्षांपूर्वी मास्टर दत्ताराम चिंचोले यांनी खान्देशातील पहिला चित्रपट बनवला, त्या चित्रपटाचे नाव होते “सटीना”, ह्याचा निर्मितीची कथा आपण आधीच बोल भिडू वर वाचली आहे.

तर साधारण दहा पंधरा वर्षांपूर्वी मूळचे धुळे जिल्ह्यातील असलेले बी कुमार पाटील यांनी विंग्ज मीडियाच्या नावाने खान्देशी चित्रपट निर्मितीला सुरुवात केली. ती “डुबऱ्या” ह्या अजरामर कॅरेक्टर ने, अल्ताफ शेख ह्या 3 फूट उंचीचा कलाकाराने डुबऱ्या नावाचा कॅरेक्टर खान्देशात घरा घरात पोहचवलं.  त्याचा जोडीला असलेल्या विद्या भाटिया व इतर खान्देशी लोकल कलाकारांनी डुबऱ्याचा चित्रपटात काम केलं, मुळात हे फुल लेंथ चे चित्रपट नव्हते पण शॉर्ट फिल्म सारखे होते. 15-15 मिनिटाच्या अशा छोट्या शॉर्ट फिल्म्सचं कलेक्शन करून डीव्हीडी बाजारात विकायला आली.

ह्या डीव्हीडी ने बाजारात धुमाकुळ घातला. खान्देशात डुबऱ्या फेमस झाला.

प्रत्येक व्यक्ती ज्याचाकडे डीव्हीडी होता ती डुबऱ्या चे चित्रपट लावायचा आणि केबलवाले पण त्याचेच चित्रपट चालवायचे. आहिराणी कॉमेडी असल्याने ते चित्रपट वेगाने लोकप्रिय तर झाले पण पुढे अजून मोठ्या प्रमाणावर अल्ताफ शेख ह्यांनी डुबऱ्या साकारला. डुबऱ्या बन गया डॉक्टर, डुबऱ्या 420, डुबऱ्या की मौत अश्या तत्सम शीर्षकाने हे चित्रपट प्रदर्शित झाले. हलक्या फुलक्या विनोदामुळे अबाल वृद्धांनी ह्या चित्रपटाचा आनंद घेतला होता.
डुबऱ्या साकारणारा अल्ताफ शेख खान्देशात सुपरस्टार बनला होता.

लोकल स्टार असल्या मुळे विविध कार्यक्रमासाठी त्याला बोलावणे आले. अत्यंत गरीब असलेल्या अल्ताफ शेख ह्याचं आयुष्य डुबऱ्या ने पालटलं होतं. अल्ताफ शेख ह्यांचा डायलॉगबाजीचे फॅन लोक झाले होते. जेवढी प्रसिद्धी आणि प्रेम गेम ऑफ थ्रोन्सच्या टीरियन लानिस्टर भेटली तेवढी लोकल लेव्हलला अल्ताफ शेख यांना भेटली. त्यांना विविध समारंभात पाहुणे म्हणून बोलवायचे तिथे ते लाईव्ह परफॉर्मनस करायला लावायचे. डुबऱ्याच्या चित्रपटाबरोबर त्यातले काही गाणे पण प्रसिद्ध झाले. कालांतराने आहिराणी गाण्यांनी ही खान्देशी समाजावर गारुड घातलं. खान्देशी लोक डुबऱ्याला बघायला तौबा गर्दी करत असत.

Screen Shot 2018 12 22 at 6.12.37 PM

डुबऱ्याच्या बायकोचा रोल करणाऱ्या विद्या भाटिया यांना पण ह्यामुळे प्रचंड प्रसिद्धी भेटली. डुबऱ्या च्या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे डुबऱ्या हा अहिराणी कमी उर्दू जास्त बोलायचा आणि इतर सर्व आहिराणी तरी देखील त्या चित्रपटावरची डुबऱ्याची पकड मजबूत होती.

ह्या चित्रपटाच्या सुरुवातीला सत्य नारायणाची पूजा देखील दाखवली जायची कारण माहिती नाही. ह्या चित्रपटाच्या आधी एक आवाहन केले जायचे की ह्या चित्रपटाची विंग्ज कंपनीची डिव्हीडी विकत घेऊन बघा. मुळात ह्या चित्रपटांना देखील त्या काळात पायरसीचं ग्रहण लागलं होतं. हे चित्रपट लो बजेट होते. तरीही त्यांनी खान्देशी जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवलं. नफा कमावला, प्रेम कमावलं. कलाकारांना फायदा झाला.

कालांतराने खान्देशी सिनेमा अजून प्रगत होत गेला आणि नवीन प्रयोग झाले त्यातून मालेगावचं प्रसिद्ध मॉलिवूड आकारास आलं, सोबतचं आहिराणी भाषेतही लहान मोठ्या प्रमाणावर चित्रपट निर्मिती सुरू झाली. त्यात हा खान्देशचा सुपरस्टार डुबऱ्या मागे पडला. पण आजही जेव्हा कोण्या खान्देशी माणसाला कंटाळा आला की तो निखळ मनोरंजना साठी यु ट्यूबवर “डुबऱ्या” चे पारायण करत असतो.

खान्देशी सिनेमाची वाटचाल कशी झाली आणि मॉलिवूडच्या निर्मितीची रंजक कथा आपण पुढील भागात जाणून घेऊ.

Leave A Reply

Your email address will not be published.