मॉन्सून आलाय मात्र पाऊस लांबलाय; लोड घेऊ नका, खरिपाचा ताळेबंद असा बांधा…

मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून जवळपास राज्यभर पसरला आहे. मात्र समाधानकारक पाऊस बऱ्याच ठिकाणी बरसलेला नाहीये. गेल्या आठवड्यात सुरवातीला बऱ्याच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती.  पण आता दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झालाय. ऊन-सावली आणि हलक्या सरी असं चित्र राज्यातील काही भागात पाहायला मिळत आहे.

जूनमध्ये २०७ मिमी पावसाची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात ८५.६ मिमी पाऊस झाला आहे. केवळ ४१ टक्के पाऊस झाला आहे. खरीप हंगामाचं भवितव्य हे पावसावरच अवलंबून आहे. म्हणून याचा सगळ्यात जास्त परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. 

‘पेरणी’ हा त्याचा महत्वाचा मुद्दा आहे. 

म्हणून सद्यस्थिती जाणून घेऊया… 

२७ जूनपर्यंत राज्यात किती पेरणी झाली याचा कृषी विभागाचा आकडा बघितला तर समजतं…

तृणधान्य २ लाख ४ हजार २३२ हेक्टर, कडधान्य १ लाख ६० हजार ३८२ हेक्टर, अन्नधान्य ३ लाख ६४ हजार ६१४ हेक्टर, तेलबिया ३ लाख ९६ हजार ०५९ हेक्टर, कापूस ९ लाख ३१ हजार ५९७ हेक्टर क्षेत्रतावर पेरणी झाली आहे. 

म्हणजे ऊस वगळता १६ लाख ९२ हजार २७० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याचं चित्र कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. 

साधारणत: जूनच्या मध्यापर्यंत ५४ लाख हेक्टरमध्ये पेरणी पूर्ण व्हायला हवी होती, पण पावसाअभावी पेरण्यांवर परिणाम झाला आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना पेरण्या करता येत नाहीये. त्यांना हात आखडता घ्यावा लागत आहे. यंदा १२% पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी या तारखेपर्यंत ३१% झाली होती. म्हणजेच पेरण्यांचा टक्का घसरला आहे, असं कृषी विभागाने सांगितलंय.

तर काही ठिकाणी पहिल्या पावसातच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. म्हणून आता पावसाने त्याचा प्रवास हळू केल्याने दुबार पेरणी करावी लागणार का? हा प्रश्न उपस्थित केला जातोय… 

दुबार पेरण्याची काही गरज पडणार नाहीये. कारण मान्सून व्यवस्थित आकार घेत आहे. फक्त सर्वदूर पाऊस झालेला नाहीये. तो पट्यापाट्यामध्ये पडतो आहे. कारण त्यासाठी जे फ्लक्स (अनुकूल स्थिती) लागत असतात ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तयार होण्याची शक्यता आहे.

ज्यांनी फारच कोरड्यामध्ये पेरणी केली असेल, किंवा पेरणीदरम्यान काही चुका झाल्या असतील, तर तुरळक ठिकाणी दुबार पेरणीची वेळ येऊ शकते, असं हवामानतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

आपल्याकडे जून शेवटपर्यंत मूग आणि उडिदाची पेरणी करावी आणि १५ जुलैपर्यंत सोयाबीन आणि इतर पिकांची पेरणी चालत असते. तेव्हा कमी पाऊस असला तरी दुबार पेरणीची आवश्यकता भासणार नाही, असं कृषी विभागाच्या संचालकांनी सांगितलंय. 

कमी पेरण्यामुळे दुबार पेरणीचा धोका तर बऱ्यापैकी टळला आहे. मात्र आता येणाऱ्या पेरण्यांसाठी कृषी विभागाने काय सांगितलं आहे?

गेल्या ८ दिवसांपासून मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि बीड जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने पेरणीला सुरवात झाली आहे. तर उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही अपेक्षित पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस जरी होत असला तरीसुद्धा ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय कुठेही शेतकर्‍यांनी पेरणी करु नये, असं मत कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

जोपर्यंत शेतामध्ये तीन ते चार इंच ओल निर्माण होत नाही, तोपर्यंत पेरणी करणं हे धोकादायक ठरु शकतं. दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर येऊ शकतं जे परवडणार नाही.

त्यामुळं उशीर झाला तरी चालेल मात्र शेतकऱ्यांनी संयमाने घ्यावं. अपुऱ्या पावसावर पेरणीचं धाडस शेतकऱ्यांनी करु नये. पाऊस यंदा चांगलाच आहे याची खात्री असावी, असं आवाहन कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केलं आहे.

काही ठिकाणी पेरणीला उशिर झाल्याने शेतकरी कडधान्याला बाजूला ठेऊन थेट कापूस आणि सोयाबीनवर भर देतायेत. कारण कापसाच्या दरामुळे यंदा क्षेत्र वाढेल, असा अंदाज होता. पण पावसाने पेरणीचं गणित बिघडल्याने मराठवाड्यात सोयाबीनचं क्षेत्र वाढणार असल्याचंही कृषी विभागाने सांगितलं आहे. 

शिवाय आगामी १५ दिवसांमध्ये पेरणी क्षेत्रात वाढ होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. 

पेरणी करतानाची काळजी तर सांगितली.. मात्र बोगस बियाणे हा सर्वात मोठा प्रश्न पेरणीच्या वेळी उभा राहत असतो.

अशात बोगस बियाण्यांबाबब  कृषी विभागाने काय सांगितलंय?

बनावट बियाणांची विक्री करणारे कृषी सेवा केंद्रातून नाही तर थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून बनावट बियाणे विकू शकतात, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे बियाणे, खते खरेदी अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडून करावी. खरेदीवेळी न चुकता पक्के बिल घ्यावे. काही तक्रार असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा असं आवाहनही करण्यात आलं आहे. 

पेरणीनंतर कमी अंकुरणाबाबतची तक्रार पेरणी केल्यापासून १० दिवसांत कृषी विभागाकडे दाखल करावी. बियाणे उत्पादकाने केलेल्या दाव्याविरुद्ध कीड पडण्याच्या आणि रोग होण्याच्या शक्यतेसंबंधीची तक्रार अशी घटना निदर्शनास आल्यानंतर तात्काळ दाखल करावी, असं सांगण्यात आलंय.

तेव्हा पाऊस लांबला असला तरी काळजी करू नये, असा एकंदरीत आशय आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.