जिद्दीला पेटलेल्या शाहू महाराजांनी युरोपीयन मैदानांना लाजवेल असं ‘खासबाग मैदान’ उभारलं .

कुस्ती आणि कोल्हापूर हे समानार्थी शब्द झाले आहेत. भारतात दक्षिणेतली कुस्तीची राजधानी कोल्हापूर मानली जाते. एक काळ उत्तरेतल्या पहिलवानांनी गाजवला. इंग्रजांच्या काळात कुस्तीची वाताहात झाली. उत्तरेत पटियाला नरेश आणि दक्षिणेत कोल्हापूरचे शाहू महाराज या दोघांनी कुस्तीला हात दिला. या दोघांमुळे कुस्ती जगली आणि वाढली असं म्हटल तर चुकीच ठरणार नाही.

कोल्हापूर गाव शांत निवांत. पंचगंगेच्या कृपेन शेतीमळा कायम फुललेला. वरुणराजाच्या आशिर्वादान आणि शाहू महाराजाच्या राधानगरी धरणामूळ शेतीला कधी पाणी कमी पडल नाही. अशा पोषक वातावरणात गावच्या म्हैशी सुद्धा हत्तीच्या पिल्ला एवढ्या मोठ्या न झाल्या तर नवलच. दुधदुभत्याचा सुकाळ. मग कोल्हापूरच्या रगेल मातीला शोभेल असा रगेल खेळ कुस्ती. तेव्हा महाराष्ट्रातले राजे महाराजे लोकांच्या मनोरंजनाकरता पंजाबी मल्लांच्या कुस्तीची मैदाने भरवायचे.

शाहू महाराजांच्या मनात आलं की किती दिवस आपण हे अस उत्तरेतल्या पहिलवानांच कौतुक करायचं? आपल्या भागातल्या पोरांच्यात सुद्धा रुस्तुम ए हिंद बनायची ताकद आहे. त्यांना एक वाट दाखवली की झालं. आता स्वतः शाहू महाराजांच्या मनात आलं म्हटल्यावर हे कार्य सिद्धीस जाऊन मगच थांबणार हे अटळ होत.

तसं महाराज स्वतः पट्टीचे पहिलवान होते. त्यांनी लहानपणी अस्वलाशी कुस्ती खेळून त्याला हरवलं अशी आख्यायिका त्याकाळात फेमस होती. त्यांची धिप्पाड शरीरयष्टी बघता ते खरच घडलंही असू शकत अस पाहणाऱ्याला वाटे.

महाराजांच्या कारकिर्दीत कोल्हापूर भागात गावोगावी, गल्लोगल्ली तालमी उभ्या राहिल्या.  सर्व जातीधर्माच्या मल्लांना महाराजांनी आश्रय दिला. उत्तर-दक्षिण, हिंदू-मुस्लीम असा कोणताही भेद केला नाही. त्यांच्या खास मल्लामध्ये देवाप्पा धनगर, शिवाप्पा बेरड,काका पंजाबी, व्यंकप्पा बुरुड, पांडू भोसले, कमरुद्दीन, गोविंद कसबेकर, गामा बालीवाला, कृष्णा बारदाने असे अनेक बुरुजबंद पहिलवान होते. या सगळ्या मल्लांच्या खुराकापासून त्यांच्या व्यायाम उस्तादांचे प्रशिक्षण या सगळ्याकडे महराजांचे जातीने लक्ष असायचे.

स्वतः पहाटे लवकर उठून आपल्या मल्लांना ते तालमीत घेऊन जात. स्वतः लांग चढवून हौद्यात उतरत आणि त्यांना डावपेच शिकवत.

त्याकाळातल्या शिवाप्पा बेरड या शाहू महाराजांच्या एका पहिलवानाचा एका दिवसाचा खुराक म्हणजे एका वेळेस दोन कोंबड्या, दीड शेर बदाम, एक शेर लोणी, पुलाव रोट्या आणि चार शेर हाडांची आकनी, मटन आणि ४चार शेर दुध इतका आहार . हजार जोर बैठका काढणाऱ्या पहिलवानांना हा आहार सहज पचत असे.

आपल्या आश्रित मल्लांवर महाराज महिन्याला वैयक्तिक तिजोरीतून तीस हजार रुपये खर्च करत असत. त्याकाळी म्हैशीच दुध १ रुपयास १० ते १२ शेर मिळायचं यावरून कळेल की तो खर्च किती प्रचंड आहे ते.

शाहूमहाराज १९०२ साली सातव्या एडवर्ड बादशहाच्या राज्यारोहण समारंभासाठी इंग्लंड ला गेले होते.

तेव्हा त्यांनी युरोपमध्ये रोमन काळात ग्लडीएटरना झुंजण्यासाठी बांधलेले कोलोजियम पाहिले. तिथे हजारो लोक एका वेळी खेळाचा आनंद घेऊ शकतात. शाहू महाराजांना ही कन्सेप्ट खूप आवडली. त्यांनी असेच स्टेडियम कुस्तीसाठी कोल्हापुरात उभारायचे ठरवले.

भारतात आल्यावरही मथुरा वगैरे ठिकाणचे आखाडे डोळ्याखालून घालण्यासाठी आपल्या इंजिनियर्सनां  महाराजांनी उत्तरेत पाठवलं. सगळीकडंच अभ्यास करून मैदानाचं  फायनल डिझाईन रेडी करण्यात आलं. १९०७ साली प्रत्यक्षात  बांधकाम सुरु झालं. ते पाच वर्ष चाललं. लाखो रुपये खर्च केल्यावर १९१२ साली भव्य असे खासबाग कुस्तीचे मैदान उभं राहिलं.

तारीख होती, २० एप्रिल १९१२.

अख्खी करवीर नगरी एखाद्या सणासारखी सजली होती. गावभर प्रत्येकाच्या अंगणात रांगोळी काढली गेली होती, गुढ्या उभारल्या होत्या गावातल सार वातावरण उत्सवमय  झाले होते. सकाळी  शाहू महाराजांच मैदानातील लालमातीत आगमन झालं  त्यांनी मुहूर्ताचा नारळ फोडला.

त्या दिवशी संध्याकाळी मुहूर्ताची पहिली कुस्ती आयोजित करण्यात आली होती. सुप्रसिद्ध गामाचा धाकटा भाऊ लाहोरचा जगज्जेचा पहिलवान इमामबक्ष आणि त्याच्याविरुद्ध गुलाम मोईद्दिन पैलवान यांच्यात पहिली मानाची कुस्ती लावली गेली.

फक्त कुस्तीच पाहण्यासाठी नव्हे तर महाराजांनी सार्‍या देशात चर्चेचा विषय केलेले ते ‘खासबाग कुस्तीचे मैदान’ पाहाण्यासाठी कोल्हापूरच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या मधून कुस्तीप्रेमी रसिक कोल्हापूरकडे धाव घेत होते.

ती पहिलीवहिली कुस्ती.

सूर्य कलण्याच्या सुमारास संध्याकाळी ५.०० च्या दरम्यान छत्रपती शाहू महाराज खास रथातून खासबाग मध्ये आले. मैदान आधीच प्रेक्षकांनी भरलं होतं. महाराजांचं आगमन होताच घोषणांची ललकारी झाली. तोपर्यंत लाल मातीत व्यायामाचा सराव करीत असलेले ते दोन अक्राळविक्राळ देहयष्टीच्या पैलवानांनी महाराजांपुढे झुकून कुर्नीसात केला.  त्यांच्या इशार्‍याचीच वाट पाहू लागले. त्या दिवशी कुस्ती आणि मैदान पाहायला आलेल्या लाखो कुस्तीप्रेमींचा उत्साह खवळलेल्या समुद्रासारखा होता.

शिट्ट्या आणि आरोळ्या यानी मैदानच नव्हे तर आकाशही भरून गेले आणि महाराजांनी दोन्ही पैलवानांचा एकमेकाच्या हातात हात दिला आणि दोन्ही डोंगर एकमेकाला भिडले.

पुढील दोन तास अक्षरश: एकाद्या युद्धप्रमाणे अटीतटीची कुस्ती झाली. पण अनुभवी इमामबक्षने मोईद्दीनवर बाजी मारलीच. १९१२ ची या मैदानातील ती पहिलीवहिली कुस्ती अविस्मरणीय झाली होती. दोन्ही मल्लांना महाराजांनी स्वतः मैदानात येऊन रोख रकमेची पारितोषिके दिली. तिथे जमलेल्या विशालकाय जनसागराने कडकडाटात दोघांचंही कौतुक केलं.

‘खासबाग’ मैदान जनतेला अर्पण करण्यात आलं होत. हे मैदान उभारणे हि कोल्हापूरच्या कुस्तीसाठी महत्वाची घटना होती.

देशभरातल्या पैलवानांना आयुष्यात एकदातरी खासबाग आणि कोल्हापूरची लाल माती अंगावर लागावी, इथल्या जाणत्या रसिकांकडून आपल कौतुक व्हावं हि इच्छा असते.

आजही “भारतातलं कुस्तीच लॉर्डस” म्हणूनच खासबाग ला ओळखलं जात आणि याच सगळं श्रेय जातं कोल्हापूरच्या दूरदर्शी राजाला, ‘शाहूरायाला’ !!

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.