२००९ ला खाशाबांच्या गावी कुस्ती संकुलाची घोषणा झाली, अद्याप एक वीट रचली गेली नाही.

खाशाबा जाधव. स्वतंत्र भारताला पहिल वैयक्तिक पदक मिळवून देणारे पहिलवान. १९५२ साली हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिंक स्पर्धांमध्ये त्यांनी कांस्य पदक पटकावलं होतं. त्यानंतर भारताला कुस्तीत पदक मिळवण्यासाठी २०१२ साल उजडावं लागलं. तब्बल ५६ वर्षांनंतर भारताला कुस्तीमध्ये पदक मिळालं. मातीत सराव करुन मॅटवर कुस्ती खेळणारे ते पैलवान होते.

पण दुर्दैव म्हणजे गेली जवळपास सत्तर वर्षे भारताच्या या ऑलिंपिकवीराच्या वाट्याला उपेक्षाच आली.  

२००९च सालं. तत्कालिन क्रिडामंत्री दिलीप देशमुख जळगावमध्ये आयोजित एका कुस्ती स्पर्धेदरम्यान बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेता पै. खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या स्मरणार्थ त्यांच मुळ गावं असलेल्या सातारा जिल्ह्यातील गोळेश्वर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल उभारण्याची घोषणा केली.

त्यानंतर ५ वर्षांचा काळ लोटला. डिसेंबर २०१३ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासाठी १ कोटी ५८ लाख रुपये मंजूर केले. पुढे संकुलासाठी काहीच हालचाल नाही.

२०१७ मध्ये मेडलचा लिलाव करण्याचा निर्णय 

कुस्ती संकुल उभारण्याच्या दाव्यापासून राज्य सरकारने माघार घेतली. त्यानंतर संकुल स्थापन करण्यासाठी खाशाबा जाधव यांच्या कुटुंबियांनी जाधव यांना मिळालेल्या पदकाचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. पदकाचा लिलाव केल्यानंतर येणाऱ्या रक्कमेतून हे संकुल स्थापन करण्याचा मानस कुटुंबियांनी बोलून दाखवला.

खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी बोल भिडूशी बोलताना सांगितले की,

“त्यावेळी कांस्य पदकाचा लिलाव करण्याचा निर्णय आमच्यासाठी अत्यंत दु:खदायक होता. याचे कारण म्हणजे संकुलासाठी शासनाने माघार घेतल्यानंतर आमच्यापुढे कोणताही पर्याय नव्हता”.

यानंतर यासंबंधातील बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर तत्कालिन क्रिडामंत्री विनोद तावडे यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये गोळेश्वरचे तत्कालिन सरपंच प्रदिप जाधव आणि खाशाबांचा मुलगा रणजित जाधव यांची विधानभवनात बैठक घेतली.

यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने अडीच एकर जागा देण्याचे मान्य केले आणि शासनाकडून 3 कोटी रुपये मंजुर केले गेले. तसेच पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्याचे देखील आश्वासन दिले गेले.

अखेरीस काम सुरु झाले 

ऑगस्ट २०१७ मध्ये दिलेल्या सर्व आश्वासनांची पुर्ती होवून अखेरीस मार्च २०१९ मध्ये साताऱ्याचे तत्कालिन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते संकुलाच्या कामाचे भुमिपुजन झाले.

त्यानंतर संरक्षण भिंत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. भिंतीचे बांधकाम साडे-चार\पाच फुटापर्यंत आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या लक्षात आले की आपण शासनाकडे चुकीची जागा वर्ग केली आहे. त्यामुळे जागेची पुन्हा मोजणी करावी लागेल.

घोषणेच्या अकरा वर्षानंतर संकुलाची आजची परिस्थिती 

संकुलाची घोषणा होवून आज अकरा वर्ष पुर्ण झाली. मार्च २०१९ मध्ये कामाची सुरुवात झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या असं लक्षात आलं की आपण चुकीची जागा वर्ग केली आहे. त्यामुळे बांधकाम थांबवले गेले. अद्याप संकुलाच्या जागेची एकही वीट रचण्यात आलेली नाही.

त्यानंतर १० ऑगस्ट २०२० पर्यंत पाच वेळा जागेची मोजणी आणण्यात आली आहे, मात्र अद्यापही ग्रामपंचायतीला जशी हवी आहे तशी जागेची मोजणी झालेली नाही असं रणजित जाधव यांनी सांगितले.

तर शासनाकडे जागा वर्ग करताना आम्ही केवळ सात-बाराच्या आधारे वर्ग केली होती. त्यावेळी जागेची मोजणी करण्यात आली नव्हती. आता १० तारखेला मोजणी झाली असून लवकरच पुढच्या कार्यवाही केली जाईल अशी माहिती गोळेश्वरचे ग्रामसेवक विकास जगताप यांनी बोल भिडूशी बोलताना दिली.

पद्म पुरस्कारासाठी मागील २० वर्षापासून पाठपुरावा 

१९५४ पासून देशात पद्म पुरस्कारांना सुरुवात झाली. त्यानंतर क्रीडा क्षेत्रात पहिला पुरस्कार हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना मिळाला. पुढे १९६० साली मिल्खासिंग ऑलिम्पिकमध्ये चौथे आले, त्यांनाही पद्म मिळाला.

१९८४ साली ऑलिम्पिक खेळलेल्या पी. टी. उषा यांना १९८५ मध्ये पद्मश्री मिळाला. २००८च्या ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांना २००९ मध्ये पद्मभुषण, तर कुस्तीमध्येच कांस्य पदक खेळणाऱ्या सुशिल कुमार यांना २०११ साली पद्मश्री मिळाला. अलिकडेच रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकलेल्या पी. व्ही. सिंधूलाही पद्मभूषण मिळाला.

मात्र पहिले मेडल जिंकुन तब्बल ६८ वर्ष झाल्यानंतरही खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार मिळालेला नाही.

आजही त्यासाठी पाठपुरावा चालू आहे. २०१९ रोजी सरकारला नामांकन प्राप्त होवून देखील पुरस्काराची घोषणा झाली नव्हती. तसेच आता पद्मश्री, पद्मभुषण नाही तर मरणोत्तर ‘पद्मविभुषण’ पुरस्कार मिळाला पाहिजे असे मत रणजित जाधव यांनी व्यक्त केले.

खाशाबा जाधवांची वेळोवेळी झालेली उपेक्षा 

पदकानंतर सहा वर्षे ते बेकार होते. या खेळाडूला कुस्तीत मार्गदर्शकच्या भूमिकेत घेण्याऐवजी सरकारने त्यांच्या कर्तृत्वाच्या दृष्टीने दुय्यम असणाऱ्या महाराष्ट्र पोलिस दलात कशीबशी त्यांची उपनिरीक्षक पदावर बोळवण.

निवृत्तीनंतर राष्ट्रीय स्पोर्ट फेडरेशनकडून मिळणाऱ्या पेन्शनसाठी देखील त्यांना झगडाव लागले.

खाशाबांना ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर ४० वर्षांनंतर आणि मृत्युच्या १० वर्षानंतर १९९४ साली श्री शिवछत्रपति राज्य मरणोत्तर क्रीडा पुरस्कार मिळाला तर  केंद्रशासनाचा अर्जुन पुरस्कार मिळण्यास ४९ वर्षे लागली. त्यांच्या नावाच्या कुस्ती संकुलाची घोषणा करण्यास ५७ वर्षे उजाडली तर पद्म पुरस्कारासाठी अजूनही पाठपुरावा सुरुच आहे.

मूळगाव गोळेश्वरची हद्द जिथे सुरू होते तिथे खाशाबांचे एक समाधीस्थळ आहे. तसेच गावातच एक लहानशी तालिम स्थापन केली आहे. तिथं लहान मुलं कुस्ती खेळतात. आणि त्यांचे ऑलिम्पिकचे पदक इतक्याच काय त्या गावात आठवणी आहेत.

प्रतिष्ठीत व्यक्तींचा ते जिवंत असताना सन्मान का करण्यात येत नाही असा सवालही रणजित जाधव यांनी बोल भिडूशी बोलताना उपस्थित केला आहे.

  • ऋषिकेश नळगुणे

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.