एकेकाळी रणभूमी गाजवणाऱ्यानं ‘मै पल दो पल का शायर हूँ’ सारखं रोमँटिक गाणं बनवलं.

आज संगीतकार खय्याम साहेब ९३ वर्षाचे झाले. भारतीय सिनेमासंगीताच्या सुवर्णकाळाचे ते अखेरचे शिलेदार. गेली साठ वर्षे त्यांच्या गाण्यांची जादू रसिकांना वेडं करत आहे. 

मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी यांचा जन्म पंजाब मधल्या राहोन या गावचा. त्याकाळातल्या प्रत्येक पंजाबी मुलाप्रमाणे त्यांना अभ्यासापेक्षा सिनेमामध्ये जाण्याचं वेड लागलं होत. त्यांना गाणीही खूप आवडायची. शाळा चुकवून सिनेमे बघणे हा आवडता छंद. एक दिवस हिंमत केली आणि घरी न सांगता सरळ गाव सोडून दिल्लीचा रस्ता पकडला.

दिल्लीत आपल्या काकाच्या घरी पोहचला. पण काकांनी त्याला परत शाळेत घातलं. काका शिकलेले होते, शहाणे होते. त्यांनी ओळखलं की या मुलाची आवड जर का आपण मारली तर हा परत इथूनही पळून जाईल. त्यानी त्याला पंडीत अमरनाथ यांच्या कडे संगीत शिकायला पाठवलं. खय्यामला त्यांचा सल्ला आयुष्यभर लक्षात राहिला,

“जे काही आवडत ते आधी शिक आणि मगच त्याच्यात आपलं करीयर कर”

त्याकाळात मुंबईच्या खालोखाल पंजाब मधल्या लाहोर मध्ये फिल्म इंडस्ट्री आकार घेत होती. सोळा वर्षाचा खय्याम तिथे हिरो बनण्यासाठी पोहचला. तिथे त्याला बाबा चिश्ती म्हणून सुप्रसिद्ध संगीतकार होते त्यांची भेट झाली. बाबा चीश्ती हे स्वतः तर मोठे संगीतकार होतेच पण त्यांनी अनेक नव्या कलाकारांना संधी दिली होती. यात प्रामुख्याने नाव होत लिजेंडरी गायिका नूरजहॉं.

बाबा चिश्तीना खय्यामनी काही गाणी गाऊन दाखवली. पारखी नजर असलेल्या बाबा चिश्तीनी त्याला आपल्या पंखाखाली घेतले. सिनेमा संगीताची खरी ओळख खय्यामना बाबा चिश्तीमुळे झाली.

याच दरम्यान दुसरे महायुद्धाचा ज्वर टोकाला पोहचला होता. गावाकडचे दोस्त सैन्यासाठी प्राण पणाला लावत आहेत, आपल्या वयाची मूले शहीद होत आहेत हे खय्यामना दिसत होत. याच अस्वस्थतेमध्ये त्यांनी आपली सिनेमा संगीत ही आवड बाजूला ठेवली आणि सरळ ते आर्मी मध्ये सामील झाले. महान शायर फैज अहमद फैज यांच्या नेतृत्वाखाली ट्रूपसोबत ते लोकांना सैन्यात सामील व्हा असे जनजागृती करणारे गीत सादर करायचे.

दुसरे महायुद्ध संपले. १९४७ ला देश स्वतंत्र झाला. पंजाबची फाळणी झाली. मुसलमान कुटुंबे पाकिस्तानात गेली तिथले हिंदू बांधव भारतात आले. सगळे नातेवाईक खय्यामना पाकिस्तानला बोलावत होते. पण खय्यामला आपला देश सोडायचा नव्हता. 

मेरी मिट्टी मेरी मां उसे छोडकर जाना मुझे मंजूर नही.

खय्याम तेव्हा आपल्या पहिल्या प्रेमाला सिनेमाला मिळवण्यासाठी मुंबईला आले होते. रेहमान वर्मा या संगीतकारासोबत त्यांची जोडी जमली. त्यावेळी त्यांनी शर्माजी हे टोपणनाव घेतले. शर्माजीवर्माजी या जोडीने हिरराझा या सिनेमासाठी संगीत दिले. सिनेमा काही चालला नाही तशीच वर्माजी बरोबरची त्यांची जोडी देखील टिकली नाही. फाळणीचा फटका बसल्यामुळे अस्वस्थ झालेले रेहमान वर्मा पाकिस्तानला निघून गेले.

पुढे सुप्रसिद्ध अभिनेत्री नर्गीस यांच्या आईमुळे जद्द्नबाई यांच्या मुळे त्यांना फुटपाथ या सिनेमासाठी पहिला सोलो ब्रेक मिळाला. याच सिनेमावेळी लेखकाने त्यांना फक्त खय्याम या नावाने संगीत दे असे सुचवले. पुढे याच नावाने  संगीत क्षेत्रात खळबळ उडणार होती. 

त्याकाळात लता मंगेशकर यांच्या पुढे बाकीच्या सगळ्या गायिका झाकोळल्या गेल्या होत्या. लता दीदीना जे गाण आवडायचं नाही अथवा मेन हिरोईनचं गाण नसेल तर अशी उरलेली गाणी बाकीच्या गायिकांच्या वाट्याला यायची. अशा वेळी खय्यामनी आपल्या पहिल्याच सिनेमात आशा भोसले ना पहिल्यांदाच हिरोईनचा आवाज म्हणून संधी देण्याचं धाडस दाखवलं.

जेष्ठ दिग्दर्शक रमेश सैगल एक सिनेमा बनवत होते “फिर सुभह होगी”. यात हिरो होता सुपरस्टार राज कपूर आणि गाणी लिहणार होते साहीर लुधयानवी. रमेश सैगलना इच्छा होती खय्यामला घ्यावे पण राज कपूरच्या प्रत्येक सिनेमाला शंकर जयकिशन संगीत द्यायचे. राज कपूरनी दिग्दर्शकाच्या इच्छेखातर खय्यामची फक्त एक ट्यून ऐकली. ऐकता क्षणीच तो तयार झाला.

मुकेशच्या आवाजातील वो सुभह आयेगी, चीनो अरब वगैरे गाण्यांनी इतिहास घडवला. खय्यामना भावी नौशाद म्हणून ओळख मिळाली.

शोला और शबनम, आखरी खत अशा सिनेमांनी त्यांना गुणवान संगीतकार म्हणून इंडस्ट्रीमध्ये नाव मिळवून दिल. पण खय्याम यांचा स्वभाव फटकळ होता.  गाणी न चोरता संगीत देण्याची प्रतिज्ञा त्यांनी घेतली होती. जर दर्जेदार गीत नसेल तर  दिग्दर्शकाला ते सरळ तोंडावर नाही म्हणून सांगत. यामुळेच त्यांच्याशी काम करायला अनेक जण घाबरत.

अशातच अफवा पसरवण्यात आली की खय्याम हे चांगल संगीत देतात पण त्यांच संगीत असलेले सिनेमे सिल्व्हर ज्युबली करत नाहीत. खय्याम यांच्याकडे कोणतच काम नाही अशी वेळ आली होती. तेव्हा एक दिवस त्यांच्याकडे यश चोप्रा आले. दिवारच्या मोठया यशानंतर अमिताभला घेऊन ते  कभी कभी हा रोमांटिक सिनेमा बनवत होते .

साहीर लुधीयानवी यांनी पन्नासच्या दशकात आपली प्रेयसी अमृता प्रीतम हिच्या प्रेमात काही कविता लिहिल्या होत्या. याच कविता यश चोप्रांना सिनेमात वापरायच्या होत्या. नाव सुद्धा याच कवितेतल्या एक ओळीवरून देण्यात आलं होत,”कभी कभी”. पण त्यांना माहित होते साहीरसारख्या महान उर्दू शायरच्या शब्दांना न्याय देऊ शकेल असा एकच संगीतकार आहे तो म्हणजे खय्याम.

सगळ्यांचा विरोध पत्करून चोप्रांनी खय्यामना संगीताची जबाबदारी दिली. या सिनेमाच्या टायटल सॉंगसाठी खाय्यामनी मुकेशना अमिताभचा आवाज म्हणून वापरले. अंग्री यंग मन म्हणून फेमस असणारा बच्चन कवीच्या हळूवार मनाच्या कवीच्या रुपात पहिल्यांदाच येत होता. असे अनेक प्रयोग होते तरी सिनेमा हिट झाला. गाणी सुपरहिट झाली. यशजींचा प्रयोग यशस्वी झाला. आणि खय्याम यांच्या वरचा कमनशिबी असल्याचा शिक्का सुद्धा मिटला.

कभी कभी च्या नितांतसुंदर गाण्यांसाठी त्यांना पहिला फिल्मफेअर मिळाला. पण अशा हजारो पुरस्करापेक्षा एक मोठी गोष्ट त्यांना या सिनेमामुळे मिळाली ती म्हणजे खुद्द साहीर लुधियानवी यांनी केलेलं कौतुक,

“तुमसे पहले भी लोगों ने इन नज़्मों को गाने की कोशिश की है. तुम्हारी धुनों को सुनकर मुझे लगा कि ये नज़्म मैंने नहीं तुमने ही लिखी है. ये नज़्म साहिर ने नहीं लिखी, खैय्याम ने ही लिखी है”

खय्यामच्या आयुष्यातला आणखी एक महत्वाचा सिनेमा म्हणजे उमराव जान. १८४०सालच्या एका तवायफच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमाच संगीत देणे म्हणजे खय्याम यांची सुद्धा परीक्षाच होती. पण त्यांनी हे शिवधनुष्य पेलले. या सिनेमातल्या सगळ्या गाण्यांसाठी त्यांनी आशा भोसले यांच्यावर विश्वास दाखवला. लता दीदींच्याही एक पाउल पुढे आपण जाऊ शकतो हे अशा भोसलेंनी या सिनेमामधल्या गाण्यांनी दाखवून दिले,

संगीत ऑर्केस्ट्राच्या कर्कशाचा कमीतकमी आवाज, अभिजात शास्त्रीय संगीताचा रागदारीचा प्रामुख्याने वापर, स्वरामध्ये ठहराव अशा अनेक वैशिष्ट्यामुळे खय्याम याचं संगीत कालातीत ठरले. आजही त्यांची गाणी ऐकणाऱ्याला शरीरावरून मोरपीस फिरल्याचा भास होतो. म्हणूनच की काय त्यांना सुवर्णकाळातला शेवटचा शिलेदार म्हणून ओळखतात.

आज खय्यामसाब ब्याण्णव वर्षाचे झाले. काही वर्षापूर्वी त्यांनी आपली दहा कोटी रुपयांची संपत्ती समाजासाठी दान केली.  नवोदित गायक होतकरू संगीतकार यांच्या मदतीसाठी हे पैसे खर्च केले जाणार आहेत.

जिवंत इतिहास असलेला हा माणूस या वयातही आपल्या कलेची आपल्या देशाची सेवा करण्यात पुढे आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.