इस्रोने केलेल्या एका प्रयोगामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात दूरदर्शन दिसू लागले.

एक काळ होता टीव्हीवर फक्त एकच चॅनल असायचं ते म्हणजे दूरदर्शन.  प्रत्येकाच्या घरात टीव्ही होताच असे नाही. अख्ख्या गल्लीत कोणातरी एकाच्याच घरी टीव्ही असायचा. रामायण महाभारत बघायसाठी तिथे गाव गोळा व्हायचं. टीव्हीमुळे देशात माहितीची क्रांती झाली हे कोणीही नाकारू शकत नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात सुशिक्षित अडाणी प्रत्येकाला दूरदर्शन माहितीचा सागर खुला करून देत होते.

आजही टीव्ही हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक बनला आहे. सध्या देशात जवळपास १४०० टीव्ही चनल आहेत. डीटीएचमुळे डिजीटल झालेले  टीव्ही आत्ता तर इंटरनेटमुळे स्मार्ट देखील झालेत. हे सगळ घडलं त्या पाठीमागचा प्रवास मात्र खूप मोठा आणि खाचखळग्यानी भरलेला आहे.

१५ सप्टेंबर १९५९ दिल्लीमध्ये पहिल्यांदा टीव्ही सुरु झाले. युनेस्कोच्या मदतीने आकाशवाणीने २१ टीव्हीक्लब स्थापन करून प्रायोगिक तत्वावर दूरदर्शनची स्थापना केली. मुख्यतः शैक्षणिक कार्यक्रम बनवणे हाच त्यांचा उद्देश होता. फिपिल्स कंपनीचे हे टेलिव्हिजन सेट होते. दूरदर्शनच्या कार्यक्रमांच्या प्रक्षेपणासाठी प्रीतमपुरा येथे टॉवर उभा करण्यात आले होते. पुढच्या काही वर्षात दिल्लीच्या अडीचशे शाळांमध्ये टीव्हीसेट पोहचवून तेथील मुलांना आठवड्यातून दोन वेळा कार्यक्रम दाखवले जात होते.

त्याकाळी टीव्ही हे फारच मोजक्या देशांमध्ये होते आणि भारत त्यापैकी एक होता. साधारण याच काळात अमेरिकेने अंतरिक्षात उपग्रह सोडून त्याच्याद्वारे टीव्हीचे प्रक्षेपण करण्याचा प्रयोग केला. यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना टीव्ही कार्यक्रम बघायला मिळू लागले.

अंतरीक्ष संशोधन आणि टीव्ही यांची डेव्हलपमेंट हातात हात घालून होत होती.

भारतात टीव्ही येण्याचे प्रमुख कारण म्हणजे भारतात अंतराळ संशोधन सुद्धा जोरात सुरु होते. आधी होमी भाभा व त्यांच्यानंतर विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली अणुउर्जा समितीच्या अंतर्गत हे संशोधन चाललेलं होतं. साधारण १९६९ साली साराभाई यांनी अंतराळविज्ञानासाठी वेगळी अशी इस्रो या संस्थेची स्थापना केली.

साराभाई यांना रेडियो व दूरदर्शन या दोन्हीच्या विकासामध्ये विशेष रुची होती. त्यांनी त्याच्या संशोधनासाठी देखील जोर लावला. दरम्यानच्या काळात दिल्ली पाठोपाठ मुंबई अमृतसर श्रीनगर या शहरातही दूरदर्शन केंद्र सुरु झाले होते. मात्र अजूनही ग्रामीण भागात टीव्ही पोहचला नव्हता. नाही म्हणायला दिल्ली जवळील ६० किमी अंतरातील खेड्यापर्यंत कृषीदर्शन हा कार्यक्रम दाखवण्यात आला होता.

पण विक्रम साराभाई यांचं टार्गेट होतं भारतातल्या कानाकोपऱ्यातल्या शेतकरी खेडूत कामगार प्रत्येकापर्यंत दूरदर्शन पोहचला पाहिजे.

यासाठी त्यांनी अमेरिकेतल्या नासाबरोबर बोलणी सुरु ठेवली होती. यातूनच समोर आला प्रोजेक्ट साईट(Satellite Instructional Television Experiment) 

विक्रम साराभाई यांच्या प्रोजेक्टसाठी त्यांच्याच अहमदाबाद जवळचं एक खेड निवडल गेलं. नाव ‘पिज’. जिल्हा खेडा. महात्मा गांधींच्या ऐतिहासिक सत्याग्रहाचा हा जिल्हा. इथल्या लोकांनी इंग्रजांना हाकलून लावण्यात महत्वाचा सहभाग नोंदवला होता तेच लोक भारतात नवी क्रांती आणणाऱ्या प्रयोगाचा भाग होत होते.

हा प्रयोग कार्यान्वित व्हायला १९७५ हे साल उजाडलं. तो पर्यंत दुर्दैवाने साराभाई हे पाहायला जिवंत नव्हते. खेडा जिल्ह्यातील सात आठशे खेड्यामध्ये शाळांमध्ये टीव्ही सेट जोडण्यात आले. पिज मध्ये नासाने दिलेले ट्रान्स्पोर्टर बसवण्यात आले. जुलै महिन्यात पहिलं प्रक्षेपण करण्यात आलं. 

हजारो गावकरी आपापल्या गावातल्या शाळांच्या मैदानात ही काय जादू आहे ते पाहायला हजर झाले होते. गुजरातमधील लोककलाकार, नाटकवाले यांनी दूरदर्शनसाठी काही कार्यक्रमबनवले होते. त्याचं प्रक्षेपण होणार होतं. आपल्या भाषेतील कलाकार आपली माणसे या टीव्ही म्हणवल्या जाणाऱ्या छोट्याशा डब्यात कसे काय दिसतात याची चर्चा संपूर्ण गुजरातमध्ये होऊ लागली. राज्यभरातून पाहुणे रावळे टीव्ही बघायला खेडामध्ये दाखल होऊ लागले.

हे कार्यक्रम खासकरून ग्रामीण प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आले होते. सरकारी योजना, शेतकरयांचे प्रश्न, सामाजिक जन जागृती असे विषय हाताळण्यात येत होते. यामधली दाद फरियाद ही सिरीयल खूप गाजली. हवे ना सहेवा पाप नावाची सिरीयल दलितप्रश्नांवर आधारित होती. इस्रोचे संशोधक, इंजिनियर अहमदाबादमध्ये बसून साईटला ऑपरेट करत होते.

जवळपास दहा वर्ष हा प्रयोग चालला. युनोमध्ये या प्रोजेक्टला मोठे बक्षीस देखील मिळाले. याच्याच यशामुळे देशभरात ग्रामीण भागात टीव्ही पोहचायला मदत झाली. भारतात १९८२ मध्ये आशियाड गेम्सच्या निमित्ताने रंगीत टीव्ही आले. नव्वदच्या क्रांतीनंतर खाजगी उपग्रह वाहिन्या आल्या.

भारतीय दूरदर्शनचा इतिहास जर लिहायचा झाला तर गुजरातच्या खेडाला टाळून पुढे जाणे शक्य नाही.  आज पिज या गावातील ट्रान्समिटर चेन्नईला हलवला गेलाय. त्या जागी लोक शेती करतात. पण म्हातारे गावकरी अजूनही टीव्ही केंद्राच्या आठवणीत रमलेले दिसतात.

विक्रम साराभाई व इस्रोने विचारवंताचा आव आणत टीव्हीला इडीयट बॉक्स म्हणत कमी लेखलं असत तर भारत कम्युनिकेशन क्षेत्रात एवढी प्रगती करूच शकला नसता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.