मराठी मातीचा अभिमान असणाऱ्या खिल्लारी बैलांची पहिली पैदास औंध संस्थानात झाली होती

महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात जा तिथल्या प्रत्येक शेतकऱ्याचं एक माफक स्वप्न असतं. राहायला चांगलं घर असो वा नसो पण घराशेजारी मोठा गोठा असावा, तिथे दुधदुभत देणाऱ्या गायी म्हैशी असाव्यात.

सगळ्यात महत्वाच म्हणजे दारात खिल्लारी बैलांची जोडी असावी.

खिल्लारी बैल म्हणजे बैलांचा राजा.

पांढराधमक रंग, ऐटबाज शिंगे, काटक उंची, पाणीदार तीक्ष्ण डोळे, ताकदवान शरीर. शेतकाम असो किंवा शर्यत हे तगडे बैल सर्वात पुढे असतात.

फक्त एकच वैशिष्ट्य म्हणजे हे हुशार असलेलं जनावर बैल स्वभावाने तापट समजलं जातं.पण या जातीच्या गायी अतिशय प्रेमळ असतात. याच दूध मात्र पोषक असतं. यासाठीच खिल्लारी महाराष्ट्राचा अभिमान समजलं जातं.

महाराष्ट्रात खिल्लारी बैलांची पहिली पैदास औंधच्या राजांनी केली.

श्रीपतराव उर्फ श्रीनिवास पंतप्रतिनिधी म्हणजे साताराच्या शंभुपुत्र शाहू महाराजांचे कारभारी. छत्रपती शाहू महाराज अनेकदा सल्ल्यासाठी श्रीनिवास पंतप्रतिनिधीवर अवलंबून असायचे.

त्यांना तीन हत्ती,शिरपेंच, कंठी, शिक्केकटार, चौघडा, तीन हत्ती व सोन्याच्या दांडीची चवरी, ढाल, तरवार, जरीपटका, घोडा व सोन्याच्या काठीचा मान होता.

औंधला त्यांची परंपरागत जहागीर होती.

बाळाजी विश्वनाथ भटांच्या मृत्यूनंतर पेशवे पद पंतप्रतिनिधींना देण्यात यावं अशी मागणी आली होती पण शाहू महाराजांनी ते पद तरुण बाजीरावाला दिले. पद मिळाले नसले तरी श्रीनिवास पंतप्रतिनिधी यांचे इमान छत्रपतींच्या गादीशी कायम होते.

पुढे जेव्हा बाजीराव पेशव्यांनी कर्नाटक मोहीम हाती घेतली तेव्हा पंतप्रतिनिधी सुद्धा सोबत होते.

१७२५ ते १७२७ या काळात मराठा सैन्याने म्हैसूरवर केलेल्या आक्रमणात म्हणावे तसे यश मिळाले नाही. तब्बल दोन वर्षे या मोहिमेत खर्ची घालवून बाजीराव पेशवे व पंतप्रतिनिधी महाराष्ट्रात परत आले.

श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांना गोपालनाची आवड होती.

त्यांनी म्हैसूरजवळ मोठमोठ्या तोफा वाहणारे हल्लीकर बैल पाहिले होते. ते त्यांना प्रचंड आवडले. कर्नाटक मोहिमेतुन येताना त्यांनी तिथल्या हल्लीकर व अमृत महाल जातीची गायी व बैले सोबत आणली.

आटपाडी महालात या बैलांची व गायीची खास निगा राखून पालन करण्यात आले. तिथल्या मराठी गाईशी संकर होऊन नव्याच जातीच्या बैलांची पैदास झाली.

यालाच आपण आज खिलार म्हणून ओळखतो.

खिलारचा मूळ अर्थ होतो गुरांचा कळप.

हे प्रतिनिधी यांचे खिलार १८७६ पर्यंत फार मोठे म्हणजे हजार पंधराशे गाईबैलांचे झाले होते पण पुढे दुष्काळामुळे ते नष्ट झाले.

१९१० साली औंधचे दूरदृष्टीचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांनी काही गायी घेऊन ही परंपरा पुन्हा सुरू केली. त्यावर्षी १४२ जनावरे होती. पुढे वाढत जाऊन त्याची संख्या १५००० इतकी झाली.

प्रत्येक वर्षी संस्थानातील गावांमध्ये जनावरांचा बाजार भरू लागला.

त्या ठिकाणी उत्तम जनावरांना बक्षिसे सुद्धा दिली जात होती. दर पौष पौर्णिमेला आटपाडी, महाशिवरात्रीला करगणी, कार्तिकी पौर्णिमेला किन्हई आणि माघी पौर्णिमेला कुंडल इथे हा बाजार भरत असे.

आटपाडीला तर शेती खालोखाल मोठा व्यवसाय जनावरांचा होता. तिथे खिल्लारी बैलांच्या पैदासीच केंद्र बनवण्यात आलं.

खरं तर औंध आटपाडी हा भाग दुष्काळी समजला जातो.

ओला चारा मिळण्याच प्रमाण कमी. पण उत्तम गाईबैलांची पैदास व्हावी म्हणून औंध राजाने ५१ गावांना मोफत गायराने दिली होती.

आटपाडीमध्ये हे ३७५ एकरांचं गायरान सरकारी खिलारासाठी मोकळं सोडलं होतं त्यात रयतेची जनावरे सुद्धा चरत.

चांगल्या शेतीसाठी आणि सदृढ प्रजेसाठी उत्तम जनावरांची आवश्यकता असते.

हे ब्रीद जाणून औंधच्या राजाने या खिल्लारी गाई बैलांच्या देखभालीकडे विशेष लक्ष होत.

औंध संस्थानातील गुरांच्या बाजाराची ख्याती सर्वत्र पसरली.

लोक खास खिल्लारी बैल घेण्यासाठी येथे येऊ लागले. आता फक्त दक्षिण सातारा, उत्तर सांगलीच नाही तर संपूर्ण राज्यभरात खिल्लारी बैल आढळतात.

भौगोलिक रचनेनुसार काही पोटजाती निर्माण झाल्या आहेत. उदा. माणदेशी खिल्लार, कर्नाटकी खिल्लार, पंढरपूरी खिल्लार, नकली खिल्लार. अनेकदा लाखोंच्या किंमतीने हे बैल विकले जातात.

आता ट्रॅक्टरच्या जमान्यात बैल मागे पडले आहेत.

त्यांची मोठ्या प्रमाणात पैदास होत नाही. त्यांना सांभाळण्याचा खर्च देखील अनेकांना परवडत नाही. बैलगाड्या, बैलांच्या शर्यती तर इतिहासजमा झाल्या.

तरीही जातिवंत शेतकरी आजही आपल्या दाराशी रुबाबदार खिल्लारी बैल जोडी बांधन्याचं स्वप्न सोडत नाही.

बाहेरच्या राज्यातील गिर सारख्या गाईच प्रमोशन करून त्यांचं दूध मोठ्या प्रमाणात विकल जात आहे. मराठी मातीतल्या खिल्लारीचंही दूध दुसऱ्या वर्गात मोडते व तेही तितकंच पौष्टिक आहे पण सरकारी अनास्थेमुळे तिच्या कडे दुर्लक्ष झाले व हळूहळू ही जात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

याबाबत लवकर पाऊल उचलले नाही तर आणखी काही वर्षांनी आपल्या पुढच्या पिढीला ही सर्जा राजाची खिल्लारी जोडी फक्त फोटोतच पाहायला मिळेल की काय अशीच वेळ येऊन ठेपली आहे.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.