टिळकांच्या कानात निरोप सांगण्यात आला, खिंडीतला गणपती नवसाला पावला..

22 जून 1897 रात्रीची वेळ. पुण्याच्या केसरी वाड्यात कसलासा कार्यक्रम सुरू होता. लोकमान्य टिळक सभास्थानी होते. भाषणे रंगात आली होती. इतक्यात स्टेजच्या जवळपास कोणीतरी धावतपळत आला. वर बसलेल्या टिळकांच्या कानात निरोप सांगण्यात आला,

खिंडीतला गणपती नवसाला पावला

लोकमान्य टिळकांच्या गंभीर मुद्रेवर समाधानाची एक लकेर उमटून गेली.  कसला नवस बोलण्यात आलेला??

त्यावर्षी पुण्याला प्लेगच्या साथीने हैराण केले होते. गोऱ्या सोजिरांनी या साथीत मदतकार्याच्या नावाखाली बळजबरीचा उच्छाद मांडला होता. विशेषतः रँड हा अधिकारी हा आपल्या जुलूमामुळे कुप्रसिद्ध झाला होता. या दडपशाहीविरुद्ध काही तरुण पेटून उठले होते.

यातच होते चाफेकर बंधू.

आज जिथे पुणे विद्यापीठाची मुख्य इमारत आहे तिथे व्हिक्टोरिया राणीच्या राज्यरोहणाला 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मेजवणीचा जंगी कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी रँड येणार ही चाफेकर बंधूंना खात्री होती. सापळा रचण्यात आला. या कटाची पूर्वकल्पना टिळकांना देण्यात आली होती. त्यांचा आशीर्वादच होता.

डिनरसाठी निघालेली रँडची बग्गी गणेशखिंडीत आली. ठरल्याप्रमाणे “गोंदया आला रे” हाकारी पिटण्यात आली. इशारा मिळताच चाफेकर बंधूनी बग्गीवर हल्ला करून रँडचा वध केला. कामगिरी फत्ते झाली हे टिळकांना कळण्यासाठी संदेश पाठवला की खिंडीतला गणपती नवसाला पावला.

गणेश खिंडीतला पार्वतीनंदन गणपती नवसाला पावण्यासाठी प्रसिद्धच होता.

अस म्हणतात की,

जिजाऊ पुण्यात असताना दर सोमवारी पाषाणच्या शिवमंदिरात पूजेला जायच्या. एकदा रस्त्यात गणेशखिंडीत हे पडक मंदिर त्यांना दिसलं. त्याचा जीर्णोद्धार त्यांनी करवला. धर्मशाळा बांधली, विहीर खणली, पूजाअर्चा करण्याची व्यवस्था लावून दिली. शिवउत्तर काळात गावाबाहेर असलेल हे मंदिर परत दुर्लक्षिततेच्या गर्तेत सापडले.

पुढे अनेक वर्षांनी शिवराम भट चित्राव यांना मंदिराची देखभाल करताना सोण्याच्या नाण्यांनी भरलेला खजिना सापडला. तेव्हा पहिले बाजीराव गादीवर होते. शिवरामपंतांनी जमिनीखाली सापडलेला खजिना राजाचा या समजुतीनुसार सरकार जमा करण्यासाठी नेला. बाजीरावाने तो त्यांनाच मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी परत केला.

शिवराम भटांनी त्या पैशातून संपूर्ण मंदिराचा जिर्णोद्धार केला. शिल्लक राहिलेल्या पैशातून ओंकारेश्वरचे मंदिर उभारण्यात आले. त्यानंतरही बरेच पैसे शिल्लक राहिले. हे पैसे बाजीरावानंतर पेशवा बनलेल्या नानासाहेबाने जमा करून घेतले व या पैशाच्या व्याजातून पुण्यातील 36 मंदिरांना वार्षिक उत्पन्न सुरू केले जे आजही चालूच आहे.

कोणत्याही मोहिमेला जाण्यापूर्वी पेशवे या गणपतीचा आशीर्वाद घेऊनच मग बाहेर पडत.

गावापासून दूर जंगलात असल्यामुळे या मंदिराच्या परिसरात रस्त्यावर दरोडेखोरांचा वाटसरूना त्रास होत होता. त्यांना रान आडवे असे म्हणत. या लुटारूंचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी काशीवरुन आलेल्या दिक्षित या ब्राम्हण कुटुंबाला देण्यात आली. यावरून नंतर दिक्षितांना रानडे हे नाव मिळाले अशी आख्यायिका आहे.

आजही पुण्याच्या सेनापती बापट रोडवर चतुशृंगीमंदिराजवळच्या बोळात हे ऐतिहासिक देऊळ आहे. त्याच्या समोर तीन दगडी दीपमाळा आहेत. पेशवेकालीन स्थापत्यशैली प्रमाणे लाकडी सभामंडप आहे. शेंदूरचर्चित, चतुर्भुज गणेशाची दोन फुटाची मूर्ती आहे. यामंदिराच्या प्रवेशद्वारातच एक शेपूट उंचावला दुर्मिळ मारुती देखील आहे. पण जिजाऊंनी बांधलेली विहीर मुजवल्यामुळे पहावयास मिळत नाही.

या गणपती उत्सवात नेहमीच्या गणेश मंडळांना भेट देताना आशा या काळानुरूप दुर्लक्षित झालेल्या जुना राजकीय, ऐतिहासिक संदर्भ असणाऱ्या मंदिराचीही भेट नक्की घ्या.

हे हि वाच भिडू. 

3 Comments
  1. Krishnal Karamore says

    Network market chagle ah ka?

  2. Ganesh Godik says

    Nice

Leave A Reply

Your email address will not be published.