मराठी मातीचा अभिमान असलेल्या खो-खो चा इतिहास महाभारता एवढा जुना आहे.
संबंध महाराष्ट्रामध्ये कुठेही जा खेळाच्या मैदानात फुटबॉल व्हॉलीबॉलचे नेट असतील किंवा नसतील पण खो खो चे दोन खांब हमखास आढळतात. आजही मराठी शाळांमध्ये मुलाच्या दफ्तरमध्ये क्रिकेट बॉल सापडला तर शिक्षा केली जाते.
आपल्या अनेक पिढ्या कबड्डी खोखो खेळत मोठ्या झाल्या.
कबड्डी आणि खो खो हे अस्सल भारतीय खेळ म्हणून ओळखले जातात. या खेळांसाठी कोणतेही महागडे साहित्य लागत नाही. खो-खो खेळामुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत होते कारण हा खेळ खेळताना शरीराच्या सर्व भागांचा समावेश होतो. त्यामुळे हा खेळ शरीरासाठी उत्तम व्यायाम आहे.
कबड्डी हा कुस्तीसारखा ताकदीचा गेम आहे तर खो खो चपळतेचा. हां पण डाव रचण्याची चतुराई दोन्ही कडे लागते.
अस म्हणतात की खोखो खेळ शिकाऱ्यांनी शोधला असावा.
पळून जाणारे भक्ष व त्याहून अधिक वेगाने पळून आपल्या कब्जात आणणे हा सृष्टीचा नियम येथे प्रत्यही जाणवतो. त्यामुळे वेग हे या खेळाचे प्रमुख लक्षण आहे.
तर काही जण या खेळाला शेतकऱ्यांचा खेळ असंही म्हणतात.
पिकांनी भरलेली शेती जनावरांनी खराब करू नये म्हणून जे विविध उपाय योजले जात असत त्यापैकी त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करून त्यांना पळवून लावणे हा प्रमुख उपाय असे. त्यासाठी शेतात काही ठराविक अंतरावर लहान मुले एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून बसवून त्यांना कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज (भो भो) करायला सांगितले जात असावे.
पिकाच्या रक्षणातून लहान मुलांचा खो-खो खेळ-पळती /पाठलागाचा सुरु झाला असावा.
खो खो किती जुना आहे हे सांगता येत नाही पण याचा उगम महाराष्ट्रात झाला आहे असे मानले जाते. रामायण महाभारत काळातही अशाच एका खेळाचा उल्लेख आहे.
फक्त तो रथात बसून खेळला जात होता म्हणून त्याला रथोद असं म्हणायचे.
महाभारतात कर्णाचा साथीदार शल्य उत्तम अश्वचालक होता. तसेच कृष्णही उत्तम अश्वचालक होता. युद्धात रथांच्या सहाय्याने भेदला जाणारा रथोद नावाचा व्युह असो व तो भेदण्यासाठी चाल असो यात दोघेही आपले रथ एकेरी साखळी पद्धतीने टाकत पुढे मार्ग काढत जायचे.
अभिमन्यु जेव्हा कौरवांचे चक्रव्यूह भेदत आत शिरला ते तंत्र गोलातला खेळ तोडणे ह्या तंत्राशी साधर्म्य दाखवते.या रथोदामध्ये उत्क्रांती होत होत आज आपण खेळतो त्या खो खो ची निर्मिती झाली.
हा खेळ जरी देशभर खेळला जात असला तरी याच महाराष्ट्राच्या मातीशी एक वेगळंच नात आहे.
सभासदाच्या बखरीमधते छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात देखील या खो खो चा उल्लेख आढळतो.
त्याकाळच्या संतसाहित्यातही खोखो चे संदर्भ येऊन जातात. संत तुकाराम आपल्या अभंगात म्हणतात,
मागे पुढे पाहे सांभाळुनी दोनी ठाय
चुकावूनि जाय गडी राखे गडीयांसी।
मुरडे दंडा दोन्ही तोंडे गडियां सावध करी
भेटलिया संगे तया हाल तुजवरी।।
महाराष्ट्राबाहेरच्या मराठी मुलखात ही हा खेळ आवडीने आणि त्वेषाने खेळला जायचा.
सयाजीराव गायकवाडांचा बडोदा हे तर खो-खो चे माहेर मानले जाते. गेल्या शे दीडशे वर्षात खोखो शाळांमध्ये व गावागावातल्या मंडळामध्ये खेळला जाऊ लागला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या खेळात सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
१९१४ साली पुण्याच्या डेक्कन जिमखाना येथे खो-खोचे नियम बनवण्यासाठी एका समितीची स्थापना झाली.
१९२४ साली बडोदा जिमखान्याने खो-खोची नियमावली प्रसिद्ध केली. १९५९-६० साली भारत सरकारने आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे खो-खोची पहिली राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली.
एरव्ही लाल मातीमध्ये अनवाणी पायांनी खेळला जाणारा हा गेम कलकत्याच्या आशियाई स्पर्धेमध्ये वूडन कोर्टवर खेळला गेला.
प्रो कबड्डी लीगच्या माध्यमातून कब्बडीला ग्लॅमर आले तसे खो खोला ही यावे अशी क्रीडाप्रेमींची इच्छा आहे. हा थरारक खेळ सहज आंतरराष्ट्रीय पातळीवर हिट होईल मात्र राजकीय इच्छाशक्ती कमी पडते.
आजही आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑलिंपिक सारख्या पातळीवर खो खो ला पोहचवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
ते काहीही असलं तरी खेडोपाड्यातील शाळा, महाविद्यालये इथल्या क्रीडामहोत्सवामध्ये अत्यंत चुरशीने हा देशी खेळ जिवंत ठेवला गेला आहे हे नक्की.
संदर्भ- महाराष्ट्र खो खो असोसिएशन यांची वेबसाईट
हे ही वाच भिडू.
- आपल्या मातीमधली कबड्डी शरद पवारांनी आंतरराष्ट्रीय मॅटवर कशी नेली..?
- साताऱ्यात दाभोलकरांची कबड्डीवाली हनुमान उडी सुपरहिट होती.
- बेळगावच्या चौगुलेंनी भारताला पहिलं ऑलिंपिक मेडल मिळवून दिलं असतं पण..