स्वातंत्र्यलढ्यात सर्वात कमी वयात फासावर चढलेला क्रांतिकारक !

११ ऑगस्ट १९०८.

हा तोच दिवस होता जेव्हा एक १८ वर्षाचा युवक हसत-हसत मातृभूमीसाठी फासावर चढला होता. ज्यावेळी त्याच्या वयातील इतर तरुण आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नं विणत होते त्यावेळी हा तरुण मातृभूमीवर आपल्या हौतात्म्याचा अभिषेक करत होता.

त्यावेळी इतक्या लहान वयात देशासाठी शहीद होणारा तो पहिलाच हुतात्मा ठरला होता. खुदिराम बोस असं या भारतमातेच्या महान सुपुत्राचं नाव. खुदिराम बोस यांच्या हुतात्म्याने पुढे अनेक तरुणांच्या मनात क्रांतीच्या मशाली पेटविल्या होत्या.

३ डिसेंबर १८८९ रोजी पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथे खुदिराम बोस यांचा जन्म झाला होता. बालपणीच आपले आई आणि वडील गमावलेल्या खुदिराम यांना त्यांच्या बहिणीने लहानचं मोठं केलं होतं.

शिक्षण सुरु असतानाच ते आजूबाजूला घडणाऱ्या क्रांतिकारी चळवळीच्या संपर्कात आले.

सत्येंद्रनाथ बोस यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेतलेले खुदीराम त्यांच्या ‘युगांतरकारी दल’ या क्रांतिकारी संघटनेत सहभागी झाले. देशभक्तीचं वेड डोक्यावर इतकं स्वार होतं की शिक्षणाला मध्येच रामराम ठोकला होता.

‘युगांतरकारी दल’ या संघटनेकडून चालवण्यात येणाऱ्या ‘सोनार बांगला’ नावाच्या  पत्रावर जहाल लिखाणामुळे इंग्रज सरकारकडून बंदी घालण्यात आली होती. सुरुवातीला खुदिराम बोस हेच पत्र गुप्तपणे वितरीत करण्याचं काम करत असत.

खुदिराम करत असलेल्या या कामात मोठा धोका होता, पण त्यांनी तो सहज पत्करला.

दरम्यानच्या काळात अनेकवेळा त्यांनी इंग्रजांना चकमा देखील दिला. परंतु एप्रिल १९०७ साली मात्र ते पोलिसांच्या ताब्यात सापडले. पोलिसांकडून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांच्या विरोधात कुठलाही पुरावा न मिळाल्याने त्यांना केवळ समज देऊन सोडून देण्यात आलं.

दरम्यानच्या काळात क्रांतिकारी चळवळीतील अनेक महत्वाच्या कारनाम्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात येऊ लागली होती. याचाच भाग म्हणून डिसेंबर १९०७ साली बंगालच्या गव्हर्नरच्या ट्रेनवर आणि १९०८ साली वॅटसन  आणि पॅम्पफायल्ट या ब्रिटीश अधिकाऱ्यांवर त्यांनी बॉम्ब फेकले होते.

या दोन्ही वेळी ज्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता ते अधिकारी सहीसलामत वाचले होते.

खुदिराम यांच्या आयुष्यातील सर्वात क्रांतिकारी आणि त्यांच्या शौर्याची साक्ष देणारी घटना घडली ती ३० एप्रिल १९०८ रोजी. याच दिवशी त्यांनी बिहारमधील मुजफ्फरपूर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश किंग्जफोर्ड यांच्या हत्येच्या प्रयत्न केला होता. परंतु ब्रिटिशांना आधीच या घडामोडीची कुणकुण लागल्याने ज्या गाडीवर खुदिराम आणि प्रफुल्लकुमार चाकी या क्रांतिकारकांनी बॉम्ब फेकले त्यात किंग्जफोर्ड नसल्याने तो वाचला. या हल्ल्यात एका ब्रिटीश महिलेचा आणि तिच्या लहान बाळाचा मात्र मृत्यू झाला.

Khudiram Bose

या हल्यानंतर काही दिवसांमध्येच खुदिराम यांना पकडण्यात आलं आणि त्यांच्यावर न्यायालयात खटला चालला. त्यांनी अत्यंत अभिमानाने आपण बॉम्ब फेकला असल्याचं कबूल केलं. त्यामुळे न्यायालयाने त्यांना फाशीशी शिक्षा सुनावली. आणि ११ ऑगस्ट १९०८ रोजी या क्रांतिकारी तरुणाला मुजफ्फरपूर येथील जेलमध्ये फासावर लटकावण्यात आलं.

किंग्जफोर्डला यमसदनी पाठविण्यात जरी क्रांतीकारकांना अपयश आलं होतं तरी या घटनेमुळे किंग्जफोर्ड खूप भयभीत झाला होता. क्रांतीकारकांविषयीची धडकी त्याच्या मनात बसली होती. त्यामुळेच किंग्जफोर्डने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.