नाव चीनचं, पण जगभरातली चिनीमातीची बरणी भारतातल्या या गावात बनतात

मध्यंतरी भारतात सर्वत्र चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली होती. सुरूवात टिकटॉकसारख्या ऍप पासून झाली. आणि मोठ्या प्रमाणात  ही मोहिम यशस्वी झाली.

 

त्यावेळी गंमतीत एक चिनी मातीच्या भांडीचा फोटो व्हायरल झालेला दिसला. त्यात म्हणलेलं आहे की,

“या बरण्या आणि चीन चा काहीही संबंध नाही. नाही तर लोणच्या सकट फोडाल😝😝😝”

गंमत म्हणून ठीक आहे हो पण अनेकांना प्रश्न पडला असेल की

आपल्या आईचा जीव की प्राण असणाऱ्या बरण्यांची चिनीमाती कुठून आली?

चिनी माती हे ‘केओलिनाइट’ या प्रकारचे एक औद्योगिक खनिज आहे. हे चीनमध्ये मोठ्या प्रमाणात सापडते म्हणून त्याला चीनीमाती असे म्हणतात.

चीनमधील जौचु फा जवळील काउलिंग नावाच्या टेकडीत आढळत असल्यामुळे या मातीला काउलिंग हे नाव पडले. केओलीन हे त्याचे अपभ्रष्ट रूप आहे. केओलिनाइट पांढऱ्या रंगाचे असते. कधीकधी मलद्रव्यांमुळे त्यास इतर रंगांच्या छटा येतात.

केओलिनाइटचा मुख्य उपयोग चिनी मातीची भांडी आणि इतर वस्तू करण्यासाठी होतो.

भारतामध्ये उच्च प्रतीच्या चिनी मातीचे साठे बिहार, कर्नाटक, केरळ, तसेच दिल्ली व जबलपूर जवळचे भाग यांच्यामध्ये आहेत.

पश्चिम बंगाल, ओरिसा, गुजरात, राजस्थान व तमिळनाडू या राज्यांतही चांगले केओलीन मिळते.

पण या चिनीमातीची भांडी मात्र उत्तरप्रदेशातील खुर्जा या गावी तयार होतात.

या मागे देखील खूप मोठा इतिहास आहे. साधारण चौदाव्या शतकात तैमुरलंग भारतात आला. अत्यंत क्रूर समजला जाणारा हा तैमुर मंगोल साम्राज्याचा सम्राट होता.

तो स्वतःला दुसरा चंगेज खान समजत असे. अख्ख्या जगावर राज्य करायचं त्याच स्वप्न होत.  इराण,अझरबैजान, अफगाणिस्तान,कुर्दीस्तान हे देश जिंकले.

त्याचं पुढचं लक्ष होतं, सोने की चिडीया समजला जाणारा भारत देश.

अफगाणिस्तानमधून तो पेशावर मार्गे भारतात उतरला. वाटेतील सगळी गावे बेचिराख करत त्याने दिल्लीकडे कूच केली. तेव्हाच दिल्लीचा सुलतान मेहमूद तुघलक याने मोठे सैन्य पाठवून तैमुरवर आक्रमण केले.

पानिपतच्या युद्धात दिल्लीच्या सुलतानाचा तैमुरने मोठा पराभव केला. मेहमूद तुघलक युद्धभूमी सोडून पळून गेला. त्याच्या पळून जाण्यामुळे दिल्ली तैमुरच्या ताब्यात आली.

कित्येक दिवस त्याने दिल्ली लुटली. लाखो जणांना मारून टाकले.

पण हा तैमुर खूप दिवस दिल्लीत थांबला नाही. त्याने पुढे उझबेकिस्तान जिंकण्यासाठी कूच केली. जाता जाता मेरठ सारखी शहरे लुटली. इथले कारागीर तो आपल्या देशाला घेऊन गेला.

भारतात असताना त्याचा मुक्काम दिल्ली जवळच्या खुर्जा या गावी होता. तैमुर परत गेला पण त्याच्या सोबत आलेले काही सैनिक मात्र खुर्जा मध्येच थांबले.

हे तैमुरचे सैनिक मूळचे कुंभार होते.

चिनी मातीची भांडी बनवण्याची मंगोल कला त्यांनी खुर्जा मध्ये रुजवली. दिल्ली पासून जवळ असलेलं हे गाव चिनी मातीच्या भांड्या साठी वर्ल्ड फेमस झाले.

30TY KHURJA POTTERY

आपण लोणचे, तिखट अशा बऱ्याच दिवस टिकावे यासाठी लागणाऱ्या खास बरण्या इथूनच भारत भरात विकायला पाठवल्या जातात.

खुर्जा मध्ये विजेचे फ्यूज़ सर्किट, इन्सुलेटर, प्रयोगशाळेतील उपकरण, विमानात लागणारे स्पेअरपार्ट, टरबाइन, रॉकेट, न्यूक्लियर फ्यूज़न, अंतराळयानासाठी लागणारे चिनीमातीचे उपकरण तयार होतात.

खुर्जाच्या तुलनेत चीन मधील वस्तू महाग आहेत.

खुर्जा मध्ये चिनीमातीच्या वस्तूंची क्वालिटी जबरदस्त आहे. विजेच्या खांबावर लागणारे चीनचे इंस्युलेटर जरा गरम झाले की खराब होतात पण खुर्जातले इन्सुलेटर त्यामानाने जास्त काळ टिकतात.

म्हणून जगभरातुन बांग्लादेश, फ्रांस, श्रीलंका, थाईलंड, सिंगापुर, जर्मनी, आफ़्रीका, इंग्लंड या देशात खुर्जामधून क्रॉकरी निर्यात होते. बीबीसी या वृत्तसंस्थेच्या दाव्यानुसार उद्योग २०१४ साली शेकडो कोटींवर पोहचला आहे.

आज भारतातल्या चीनला मागे टाकून खुर्जा चिनीमातीच्या भांड्याची राजधानी बनली आहे.

मेड इन चायना म्हटल्यावर युज आणि थ्रो वस्तुंना आपण ओळखतो पण चीनच्या नावाची खुर्जातली चिनी मातीची भांडी वर्षानुवर्षे लोणचे तिखट टिकवतात.

आजही आपल्या पैकी अनेकांच्या घरी पिढ्यानपिढ्या टिकलेल्या बरण्या आहेत. पण याचं श्रेय जात खुर्जाला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.