सिंगल माल्ट व्हिस्कीचे पेग पिल्याशिवाय न झोपणारा गांधीवादी सरदारजी.

खुशवंतसिंग भारतीय पत्रकारितेतला सर्वात खट्याळ माणूस !  रंगवून रंगवून गोष्टी सांगण्याच्या त्यांच्या स्टाईलचे जगभरातले वाचक फॅन होते. 

लिखाणात आडपडदा हा विषयच त्यांना मान्य नव्हता. त्यामुळेच आवडत्या सिंगल माल्ट व्हिस्कीचे दोन पेग घेतल्याशिवाय आपण कसे झोपत नाही इथपासून ते वय झाले तरी सुंदर स्त्रियांचे आपल्याला आजही कसे आकर्षण वाटते, याविषयी लिहिताना त्यांचा हात कधी कचरला नाही. लिखाणातील कामुकता, कुठल्याही विषयात सेक्सचा उल्लेख करण्याची पद्धत आणि या गोष्टींचा खुलेआम पुरस्कार यामुळे खुशवंतसिंगांवर टीकाही खूप झाली. 

कित्येकदा ते अडचणीतही आले, पण या टीकेची फिकीर त्यांनी कधीच केली नाही. शंभरी गाठ्ल्यावरही हा अफलातून माणूस अखेरचा श्‍वास घेईपर्यंत शंभर टक्के तरुणच राहिला , आपल्याच मस्तीत वागत आणि लिहीत राहिला.

इलेस्ट्रेटेड विकली या साप्ताहिका मध्ये त्यांनी नर्मविनोदी शैलीत लिहिलेल्या खमंग किश्श्यांचा तडका खूप वाचला जायचा. त्यांनी लिहिलेली पुस्तके जगभर गाजली.  असाच आपल्या गांधीवादाचा एक खोडकर किस्सा त्यांनी आपल्या ट्रुथ , लव्ह अँड लिटल मॅलीस या आत्मचरित्रात लिहिला आहे.

खुशवंतसिंग यांच्या लहानपणीची घटना. ते पाच सहा वर्षाचे असतील. त्यांच कुटुंब खानदानी श्रीमंत होतं. त्यांचे वडील सोभासिंग हे त्याकाळात दिल्लीमधील सर्वात मोठे कॉन्ट्रक्टर होते. ब्रिटीश अधिकाऱ्यांशी त्यांचे संबंध चांगले होते. यामुळेच नवी दिल्लीमध्ये अनेक मोठ्या इमारती बनवण्याचे कंत्राट सोभा सिंगना मिळालं होतं. त्यांचं राहणीमान  देखील एखाद्या उच्चभ्रू युरोपियन अधिकाऱ्याप्रमाणे खुशमिजास होते. 

छोट्या खुशवंतचे शाळेचे कपडे देखील इंग्लंडवरून मागवलेल्या कापडाचे आणि खास टेलर कडून शिवून आणलेले असत.

एकदा खुशवंतच्या शाळेला भेट देण्यासाठी खुद्द महात्मा गांधी आले होते. शाळेच्या मैदानात रांगेत सगळ्या मुलांना बसवण्यात आलं होतं. गांधीजी त्यांच्याशी गप्पा मारत होते. अचानक त्यांच लक्ष खुशवंतसिंग वर गेलं. हा कोण छोटा अंग्रेज आहे त्यांच्या मनात विचार आला असावा.

गांधीजी चालत त्याच्याजवळ गेले. त्याच्या गणवेशाला हात लावत ते म्हणाले

“बेटा ये कपडा कहा का है?”

खुशवंतसिंगने अभिमानाने उत्तर दिल,

” विलायती !!” 

गांधीजी मिश्कील हसले आणि हळुवारपणे म्हणाले,

“ये अपने देश का होता, तो अच्छा होता ना?”

ते दिवस गांधीजीनी ब्रिटीश सत्तेविरुद्ध पुकारलेल्या असहकार आंदोलनाचे होते. विदेशी वस्तूंचा त्याग करून स्वदेशीचा आग्रह धरला जात होता. गांधीजीनी अगदी सोप्या शब्दात एका वाक्यात  जे समजावलं ते  खुशवंतसिंग यांच्या एकदम मनात कोरल गेलं. घरी आल्या आल्या त्यांनी जाहीर केलं आज पासून मी फक्त खादी वापरणार.

सोभा सिंग यांचा हा लाडाचा लेक होता. त्याच्या आईने आपल्या मुलाच्या कपड्यासाठी सुत कातायला सुरवात केली. अगदी हट्टाने पुढे अनेक वर्ष त्यांनी ही खादी वापरली.

गव्हर्न्मेंट कॉलेज लाहोर, सेंट स्टीफन्स कॉलेज दिल्ली अशा प्रतिष्ठित कॉलेज मध्ये त्यांच शिक्षण झालं. पुढे कायद्याचं शिक्षण घ्यायला ते लंडनला निघाले. तिथे जाण्यासाठीची सगळी तयारी सुरु होती. पुस्तकांनी बॅगाभरल्या होत्या. आता कपड्यांची जुळवाजुळव चालली होती. 

वकिलीसाठी खास कोट शिवायला लागणार होता. खुशवंतसिंग आपल्या नेहमीच्या टेलर कडे गेले. त्यांनी सूट साठी माप दिल. टेलरने कापड मागितल्यावर आपल्या जवळची खादी दिली. भारतातल्या त्यावेळच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींचे कपडे शिवणारा तो शिंपी हे बघून आता फक्त बेशुध्द होणे बाकी राहिल होतं. तो खुशवंतसिंगना काही बोलला नाही. पण नंतर त्याच्या वडिलाना मात्र ही बातमी सांगितली.

सोभा सिंग भडकले. त्यांनी खुशवंतसिंगची खरडपट्टी काढली,

“जगात कधी कोणी खादीचा सूट शिवला होता काय? वेड्यासारखं वागू नको.”

पुढे काही हळूहळू खुशवंतसिंग यांचं हे खादीप्रेम कमी झालं पण गांधीजीवरची भक्ती कधी कमी झाली नाही. ते कायम म्हणत,

” मी अनेक गोष्टी करतो ज्या गांधीवादामध्ये बसत नाहीत. मी दारू पितो, संभोग करतो,कधीकधी खोट ही बोलतो मात्र कधी कोणाला शारीरिकदृष्ट्या दुखावल नाही. पण मी स्वतःशी १००% प्रामाणिक आहे आणि मी स्वतःला गांधीभक्त समजतो. आजही कधी मला असुरक्षित वाटलं की मी आठवतो जर गांधीजी असते तर ते कसे वागले असते आणि तसच वागण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा माझ्यावरची सगळी संकटे चुटकीसरशी निघून जातात.” 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.