ठाकरे घराण्याचा “नावं” ठेवण्याचा इतिहास लय भारीय…!!!
आज राज ठाकरेंच्या नातवाचं नाव ठेवण्यात आलं. आपल्या मिडीयाने ब्रेकिंग न्यूज म्हणून राज ठाकरेंच्या नातवाचं नाव किआन ठेवल्याचं सांगितलं. आत्ता लोकांना पण या बातमीनं बरं वाटलं.
काही कार्यकर्त्यांनी “किआन” हे भारतीय नाव आहे का बाहेरचं, ऊर्दू आहे की मराठी अशी शोधाशोध सुरू केली. गुगलवर शोधलं तर गुगलनं सांगितलं किआन हा भारतीयच शब्द आहे. पण तो मराठी की संस्कृत की हिंदी हे काय सांगितल नाय. फक्त किआनचा अर्थ युनिक होतो. देवाची कृपा, राजेशाही वगैरे वगैरे समानार्थी शब्द देखील सांगण्यात आले..
आत्ता करंटची बातमी म्हणजे राज ठाकरेंच्या नातवाचं नाव किआन ठेवण्यात आलं…
पण गोष्ट ही नाही.. गोष्टाय इतिहासाची..
कारण ठाकरे घराण्याला नावं ठेवण्याची एक परंपरा लाभलेय… बाळासाहेबांच नाव बाळ कस ठेवण्यात आलं, राज ठाकरेंच नाव स्वरराज कस झालं.. राज ठाकरेंच्या बहिणीचं नाव जयवंती कस आणि आईचं नाव मधुवंती कस झालं इतकच काय तर धोडपकरचे ठाकरे कसे झाले आणि शिवसेनेच्या नावाचा अत्रे ठाकरे वाद कसा झाला इथपर्यन्त “ठाकरे” घराण्याचा संपुर्ण इतिहास मांडणार आहोत..
पहिलं म्हणजे ठाकरेंच मुळ आडनाव काय..
याबद्दल प्रबोधनकरांनीच लिहून ठेवलं आहे. ते सांगतात ठाकरे घराणे हे चांद्रसेनीय कायस्थ म्हणजेच सीकेपी. जून्या काळात भोर संस्थानात असलेल्या पालीचे हे घराणे. हेच ठाकरे घराण्याचे मुळ गाव. ठाकरे घराण्याच्या पुर्वजांपैकी कोणी एकजण धोडप किल्ल्याचा किल्लेदार होता म्हणून धोडपकर हे आडनाव लावायचे. पण प्रबोधनकरांच्या वडिलांनी धोडपकर हे आडनाव सोडून ठाकरे वापरण्यास सुरवात केली. आपल्या मुलांना शाळेत घालतानाच त्यांनी आडनावे ठाकरे अशी केली.
धोडपकरांचे ठाकरे झाले पण ठाकरेंच स्पेलिंग बदललं ते प्रबोधनकरांनी. झालं की की प्रबोधनकारांचा आवडता लेखक विल्यम्स Thackeray होता. त्याच्या आडनावाचं स्पेलिंग प्रबोधनकारांनी स्वीकारलं आणि Thakray चं स्पेलिंग Thackeray अस करण्यात आलं..
प्रबोधनकारांच्या नावाला पण इतिहास आहे, प्रबोधनकरांच नाव केशव. पण त्यांनी १९२१ मध्ये प्रबोधन हे पाक्षिक सुरू केले. त्यावरून सनातनवाद व ब्राह्मणशाहीवर चौफेर टिका करण्यास सुरवात केली. त्याअगोदर कोंदड म्हणून प्रबोधनकार ओळखले जायचे. पण प्रबोधन पाक्षिकानंतर त्यांची ओळख ही प्रबोधनकार ठाकरे अशी झाली..
बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलायचं तर प्रबोधनकार ठाकरे व रमाबाईंना चार मुलीचं झाल्या.
मुलाची इच्छा असताना मुलगी होत असल्याने प्रबोधनकार आपल्या पत्नीला म्हणाले, काय हो..आपल्या शेतात ज्वारी-बाजरीचं पिकते काय? गहू पिकतच नाही.. उपासतापास झाले आणि मुलगा झाला. हे बाळ प्रबोधनकारांनी जगदंबेच्या ओटीत ठेवले आणि हे बाळ मी तुझ्या ओटीत ठेवतो म्हणत मुलाचं नाव बाळ ठेवलं..
पुढे श्रीकांत ठाकरेंनी आपल्या मुलांची नावे संगीताच्या रागावरून ठेवायचं ठरवलं.
मुलाचं नाव स्वरराज, बायकोचं नाव मधुवंती, मुलगीचं नाव जयवंती ठेवलं. पण यातलं स्वरराज नाव बाळासाहेबांनी मुलगा व्यंगचित्र काढायला लागल्यावर बदललं आणि नुसतं राज केलं. तेव्हा श्रीकांत ठाकरे म्हणाले होते, गेले स्वर उडूनी..
पण हे झाले नावं ठेवण्याचे किस्से, नावांची मापं काढण्याची परंपरा देखील ठाकरे घराण्याला लागली आहे. यातला एक किस्सा पु.लं. देशापांडे आणि मामा वरेकर यांच्यात बाळासाहेबांच्या उपस्थितीत झाला होता. झालेलं अस की पु.लं पहिल्यांदा मामा वरेकरांना भेटले तेव्हा मामा वरेकर पुलं ना म्हणाले, काय रे हे तुझं नाव एखाद्या पुरूषाच्या लिंगासारखं…
तेव्हा पुलं म्हणाले, यातूनच भावी वरेकर निर्माण होतील. हा किस्सा श्रीकांत ठाकरेंनी लिहून ठेवला आहे.
शिवसेना नाव ठेवण्यामागे देखील मोठ्ठा इतिहास आहे. शिवसेना हे नाव पहिल्यांदा अत्रेंनी सुचवल्याचा इतिहास आहे. १९ जुलै १९५९ या तारखेला मराठा वर्तमानपत्राची हेडलाईन होती,
आचार्य अत्रेंची महाराष्ट्राला हाक शिवसेना उभारा..
मात्र तेव्हा अत्रे ठाकरे संबंध एकोप्याचे होते. त्यामुळे प्रबोधनकरांनीच हे अत्रेंना सुचवल्याची शक्यता बोलून दाखवली जाते. अत्रेंच्या डोक्यात मराठी माणसांची अशी संघटना काढायची व त्याचं नाव शिवसेना ठेवायचं डोक्यात होतं हे मात्र मराठाच्या अंकातून वारंवार स्पष्ट करण्यात आलं होतं. पुढे बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष काढण्याची जबाबदारी पार पाडली व प्रबोधनकारांनी या संघटनेचं नाव शिवसेना ठेवलं…
मार्मिक हे प्रबोधनकरांनीच सुचवले होते. सामना नावाचा इतिहास पण मजेशीर आहे. सामना हे नाव मुळात वसंत कानडेंची. मार्मिक सोबत एखादं वर्तमानपत्र असावं अशी कल्पना समोर आली पण नाव सुचत नव्हतं.
अनेक बैठका पार पडल्यानंतर बाळासाहेबांनाच नाव सुचलं ते “सामना”. हे नाव रजिस्टर करण्यासाठी सुभाष देसाई दिल्लीला गेले तर तिथे समजलं की बार्शीच्या वसंत कानडे यांच्याकडे हे नाव आहे. योगायोगाने वसंत कानडे देखील शिवसैनिकच होते. त्यांनी मोठ्या खूशीने सामना नावावरचा आपला हक्क सोडून दिला आणि बाळासाहेबांकडे सामना आला.
बरं नाव ठेवण्याची प्रथा परंपरा इथेच संपते का तर नाही.
जाहीर भाषणातून नावे ठेवण्याची प्रथा अर्त्र्यांनंतर महाराष्ट्रात कोणी भक्कम केली असेल तर ती बाळासाहेबांनी. शरद पवारांना मैद्याचं पोतं, शरदबाबू, बारामतीचा म्हमद्या नारायण राणेंना नारू किंवा नारबा, भुजबळांना लखोबा लोखंडे, अण्णा हजारेंना वाकड्या तोंडाचा गांधी, सोनिया गांधींना इटालियन बाई, ग.प. प्रधानांना म्हातारा आणि पुलं देशपांडेंना मोडकळीस आलेला पुल, तर अत्रेंना वरळीचा डुक्कर अशी अनेक नावे बाळासाहेबांनी ठेवली…
थोडक्यात काय तर नावात काय आहे हे वाक्य जगाला लागू पडो, पण ठाकरे घराण्याच्या नावातच अनेक किस्से आहेत हे नक्की.
हे ही वाच भिडू
- पोराच्या स्वरराज नावाचं फक्त राज ; झालेलं पाहून वडील म्हणाले, गेले स्वर उडूनी !!!
- शिवसेना हे नाव सर्वप्रथम कोणाला सुचलं?
- ठाकरेचं स्पेलिंग Thakre ऐवजी Thackeray, यामागे आहे विल्यम मेकपिस ठाकरे कनेक्शन