दोन पर्याय होते. गुंडगिरी करायची की क्रिकेट ? तो क्रिकेटचा गुंडा बनला…

कायरन पोलार्डनं आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. मागच्याच वर्षी पोलार्डनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. पोलार्डनं रिटायरमेंट घेतली आणि यावर्षी वेस्ट इंडिज वर्ल्डकपमध्ये सुपर-१२ साठीही क्वालिफाय झाली नाही. वेस्ट इंडीजचं क्रिकेट म्हणजे बिनभरवशाची नौका. कधी बुंगाट पळेल आणि कधी पल्टी मारेल हे सांगता येत नाही, हे पोलार्डच्या रिटायरमेंटनंतर पुन्हा एकदा सिद्ध झालं.

पोलार्डनं जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं अगदी तसंच आयपीएलही. मुंबईकडून खेळताना त्यानं अनेकदा खतरनाक बॅटिंगच्या जोरावर मॅचेस जिंकून दिल्या. मुंबईच्या चाहत्यांमध्ये ‘पोलार्ड तात्या’ या नावानं लोकप्रियताही मिळवली.

पोलार्ड जगभर फेमस झाला तोच लीग क्रिकेटमुळे.

पोलार्ड क्रिकेटमध्ये येण्यामागं स्टोरी आहे. कारण तो वाईट संगतीला लागला असता तर आज गुन्हेगारी जगतातला बादशहा असता पण क्रिकेटचं वेड त्याला जगभरात घेऊन गेलं.

१२ मे १९८७ साली त्रिनिदाद मधल्या टकरिगुआमध्ये पोलार्डचा जन्म झाला. पोलार्ड अगदीच लहान असताना त्याचे वडील घर सोडून गेले. दोन बहिणी आणि पोलार्डची जबाबदारी त्याच्या आईवर पडली. घरात अठराविश्व दारिद्र्य होतं, त्यामुळं पोलार्डची आई सगळ्यांना सोबत घेऊन टुनापूना पीआरको या शहरात स्थलांतरित झाली.

टुनापूना पीआरको हे शहर गुन्हेगारी जगातलं सगळ्यात कुप्रसिद्ध ठिकाण होतं. या शहरात दिवसाढवळ्या अंमली पदार्थांचा सर्रास व्यापार केला जायचा. गॅंगवॉर, बंदुकीच्या धाकानं, बळजबरीनं दोन नंबरची कामं या शहरात व्हायची. या अशा शहरात पोलार्डचा परिवार राहायला आला होता.

या शहराची एक खासियत होती, इथल्या लोकांना खेळ फार आवडायचे. इथं सहा महिने क्रिकेट आणि सहा महिने फुटबॉल आणि ऍथलेटिक्स खेळलं जायचं. ऑलिंपिकच्या काळात सगळेच जण ऍथलेटिक्सची तयारी करायचे, फ़ुटबॉल वर्ल्डकपच्या वेळी फुटबॉल आणि क्रिकेटच्या मोसमात त्या सगळेच लारा, सगळेच अँब्रोस बनायचे.

पोलार्डकडे त्यावेळी दोन पर्याय होते, गुन्हेगारी जगात जाऊन पैसे छापायचे आणि दुसरं म्हणजे स्वतःवर चांगली मेहनत घेऊन खेळात करियर करायचं. पोलार्डची आर्थिक स्थिती पाहता क्रिकेट खेळणं ही महाग गोष्ट होती.

पण आपली धिप्पाड शरीरयष्टी आणि मनातली जिद्द त्याला क्रिकेटच्या मैदानावर घेऊनच गेली. २००६ साली वेस्ट इंडिजच्या अंडर-१९ संघात त्याची निवड झाली. त्याची बॅट बोलत होती, फिल्डिंग जबरदस्त होत होती आणि बॉलिंगचा तर नाद नव्हता.

पुढं आयपीएल आली आणि पोलार्ड नावाचा हिरा चमकताना जगानं पाहिलं. 

त्यानं अशक्य वाटणाऱ्या मॅचेस जिंकून दिल्या, सुपरमॅन स्टाईल कॅच पकडले आणि मैदानावर राडेही केले. ५०० पेक्षा जास्त टी-२० सामने खेळलेला पोलार्ड हा जगातला पहिला खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय  रिटायर होण्यापूर्वी तो वेस्ट इंडिजच्या वनडे आणि टी२० संघाचा कॅप्टन होता. तर आयपीएलमधून रिटायर होण्याआधी मुंबई इंडियन्सची ताकद.

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाबरोबर बरेचदा त्याचे वादही झाले. पण स्वतःच्या अटीवर तो खेळत राहिला.

इतकं क्रिकेट खेळूनही त्याची वेस्ट इंडिजच्या टेस्ट संघात निवड झाली नाही.

एका माजी खेळाडूनं पोलार्डला सुनावलं होतं की,

लिजंड म्हणून मायदेशाकडून न खेळता भाडोत्री क्रिकेटर म्हणून खेळणं तुला जास्त प्रिय आहे.

यावर पोलार्ड म्हणला,

मला काहीच सिद्ध करायची गरज नाही, जगभरातल्या टी-ट्वेन्टी क्रिकेटचा मला आनंद घ्यायचा आहे. बाकी कुणाच्याही सल्ल्याची मला गरज भासत नाही.

१२३ वनडे, १०१ टी-ट्वेन्टी सामने, पोलार्डचं करीअर रन्स आणि विकेट्सनं जितकं सजलेलं तितकंच राडे आणि एंटरटेन्मेन्टनंही. जवळपास १५ वर्ष तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. बरेच वाद झाले पण जे हवं होत ते त्यानं मिळवलं. आपल्या आईला सुखाची रिटायरमेंट दिली.

पोलार्ड म्हणाला होता, ‘मी जसे अडचणीत दिवस काढले तसे दिवस माझ्या मुलांच्या वाट्याला न येवो.’

पोलार्डनं आपले शब्द खरे केले. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध त्यानं खेळलेली इनिंग कुठलाच चाहता विसरु शकत नाही, एवढं नक्की.   

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.