त्यांनी किल्लारीची ५२ गावं पुन्हा उभा करून दाखवली…

किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा जिल्हाधिकारी होते प्रविणसिंह परदेशी. सांगली-कोल्हापूरमध्ये महापूर आल्यानंतर सांगली पुन्हा पहिल्याप्रमाणे उभा करण्याची जबाबदारी प्रविणसिंह परदेशी यांच्याकडे देण्यात आली होती, याचं कारण काय,

तर त्यांनी किल्लारीमध्ये केलेलं काम. किल्लारी परिसरातील नागरिक आजही त्यांच नाव काढतात अस काम त्यांनी किल्लारीत केलं.

त्यांनी किल्लारी पुन्हा कसं उभा केलं हे सांगणारा लेख भिडू दत्ता कनवडे यांनी “बोलभिडू”साठी लिहला होता. तोच लेख आम्ही पुर्नप्रकाशित करत आहोत. 

किल्लारीचा भूकंप ही तशी भीषण आपत्ती होती. या भूकंपात अनेक माणसं मेली तशी अनेक नांदती कुटुंब नाहीशी झाली कित्येक घरात दिवा लावण्यासाठी माणूस सुद्धा शिल्लक राहिला नाही. हे संकट फक्त किल्लारी आणि परिसरातल्या 52 गावावर कोसळलेल नव्हतं तर ते संपूर्ण महाराष्ट्रवरलं संकट होतं जेंव्हा मोठी संकट येतात तेंव्हा ती पेलण्यासाठी माणसंही धीरोदात्त असावी लागतात,

किल्लारीचा भूकंप झाला तेंव्हा शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. भूकंप झाला तो पहाटे चार वाजता आणि विशेष म्हणजे त्यावेळी मुंबईत असलेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शरद पवार हे किल्लारीत पोचले ते सकाळी साडेआठ वाजता इतकी तत्परता शरद पवारांनी त्यावेळी दाखवली होती.

पण यात आणखी एक व्यक्ती मात्र प्रशासनाच्या धबडग्यात प्रसिद्धीच्या झोतातून विसरून गेला आहे.

तो म्हणजे प्रविणसिंह परदेशी…

परदेशी हे त्यावेळी लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. किल्लारीचा भुकंप झाला तेंव्हा प्रविणसिंह परदेशी हे पहाटेच केंव्हातरी किल्लारीत पोचले होते. आणि विशेष म्हणजे शरद पवार यांना सुद्धा त्यांनीच प्रशासक या नात्याने भल्या पहाटे फोन करून कळवलं सुद्धा होतं. किल्लारीच्या पुनर्वसनात शरद पवार यांनी जेवढी शिताफी दाखवली तेवढीच किंबहुना त्यापेक्षा कैक पटीने जास्त कष्ट परदेशी यांनी उपसले आहेत.

आजही भूकंपग्रस्त भागात फिरताना तब्बल 25 वर्षानंतर सुद्धा त्या खेडवळ भागात या IAS अधिकाऱ्यांचे नाव अनेक लोक घेत असतात हे विशेष…

खरंतर त्यावेळी प्रविणसिंह परदेशी हे प्रशासनात नवखे, आणि त्यातल्या त्यात इतक्या भीषण आपत्तीचा अनुभव तर त्यांच्या पाठीशी नव्हताच पण तरीही हे संकट या अधिकाऱ्याने मोठ्या धीराने हाताळले.

भूकंप झाल्यानंतर सगळ्या जगात किल्लारी हे नाव समोर आलं त्यामुळे मदतीचा ओघ किंवा स्वयंसेवकांची रांग ही फक्त किल्लारीतच लागू लागली पण किल्लारी एवढंच नुकसान परिसरातल्या गावातही झालं होतं. तेंव्हा ही बाबा तातडीने हेरून प्रविणसिंह परदेशी यांनी येणाऱ्या स्वयंसेवकांना इतरत्र 52 गावांमध्ये वळवायला सुरुवात केली. येणारी मदत सुद्धा 52 गावांमध्ये समप्रमाणात कशी विभागली जाईल याची काळजी त्यांनी घेतली होती.

विशेष म्हणजे जेव्हा मदतीचे ट्रक यायचे तेंव्हा त्यावर तुंबळ गर्दी उडायची मग म्हातारे कोतारे बायबापड्या लहान मुलं यांच्या हाती काहीच लागायचं नाही. मग शेवटी परदेशी यांनी मदतीची पद्धत बदलली आणि प्रत्येक व्यक्तीला त्यांच्यापर्यंत मदत द्यायला सुरुवात केली.

खरतर सुरुवातीचे काही दिवस अन्नपाण्यासाठी लोकांची दशा होत होती. जवळपास लाखभर लोक या भूकंपाने बाधित झाले होते. त्यांच्यासाठी तयार बनवलेलं अन्न देणं गरजेचं होत आणि लाखभर लोकांना अन्न पुरवणं हे मोठं जिकिरीचं काम होत. पण परदेशी यांनी अनेक लोकांची मदत घेऊन रोजच्या रोज तीन वेळा किमान लाखभर लोकांना गरम ताजे अन्न खाऊ घालण्याचं मोठं धनुष्य लीलया पेललं होतं.

खरंतर जेंव्हा भूकंप झाला तेंव्हा जोराचा पाऊसही सुरू झाला होता आणि असंख्य लोक घराविना रस्त्यावर होते. त्यांना अधिक काळ असंच रस्त्यावर सोडलं असतं तर डायरिया मलेरिया आणि आशा असंख्य साथीच्या आजारांनी लोकांचा मृत्यू झाला असता. पण अधिकरी म्हणजे काय असतो त्याचं खरंखुरं उदाहरण असलेल्या परदेशींनी तात्काळ पत्र्याची तात्पुरती घर बांधायला सुरुवात केली.

आणि विशेष म्हणजे एका महिन्याच्या आत तब्बल पन्नास हजार तात्पुरते शेड्स त्यावेळी उभारण्यात आले होते. हा विक्रम म्हणजे जागतिक पातळीवरल एकमेव उदाहरण होतं. तात्पुरते शेड्स उभारून त्यात लोकांना आसरा निर्माण करून दिला आणि हे करत असताना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय आणि स्वच्छतागृह सुद्धा उभारले होते.

जे लोक जिवंत होते आणि त्यांचे नातेवाईक या आपत्तीत मृत्युमुखी पडले होते. त्यांना मानसिक आधार देणं खूप गरजेचं होत त्यातल्या त्यात महिलांची अवस्था ही खूप बिकट बनली होती.

या महिलांना आधार देण्यासाठी नीलम गोरे यांच्या स्त्री आधार केंद्राचा परदेशी यांनी खूप फायदा झाला होता. यात दोन महत्वाच्या बाबी आशा होत्या की, ज्या मुली या संकटात अनाथ झाल्या आहेत त्यांना त्यांचे दुरदूरचे नातेवाईक हे मिळत असलेली मदत पाहून आम्ही सांभाळ करतो म्हणून येऊ लागले पण ते कसे सांभाळतील काय होईल याचा प्रश्न होता.

तेंव्हा परदेशी यांनी नीलम गोरे यांच्या स्त्री आधार केंद्राला या मुली कुठल्या नातेवाईकांकडे जास्त सुरक्षित राहू शकतात याचा अहवाल द्यायला सांगितला जवळपास चारशे अनाथ मुली होत्या त्यांचा पूर्ण अहवाल नीलम गोरे यांच्या संस्थेने दिला आणि त्यानुसार त्या मुलींना त्या त्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं.

दुसरी बाब अशी होती की ज्या विधवा महिला होत्या त्यांची शेती आम्ही कसतो असं सांगूनही अनेक नातेवाईक येत होते. तेंव्हा पुन्हा परदेशींनी त्यांची शेती कुणीही कसणार नाही त्या विधवा महिला स्वतःच स्वतःची शेती कसतील आणि त्यासाठी शासन त्यांना मदत करेल असा निर्णय घेतला आणि तेही काम नीलम गोरे यांच्या स्त्री आधार केंद्राकडे सोपवलं आज 25 वर्षानंतर सुद्धा हे स्त्री आधार केंद्र त्या विधवा महिलांना आजही शेती करण्यासाठी मदत करत आहे.

त्यांना पाठबळ देण्यासाठी गावागावात ठामपणे उभं आहे. पुनर्वसनाचे काम ते स्त्री आधार केंद्र अजूनही करते आहे. महिलांच्या बाबतीत इतका दृष्टा निर्णय घेणारा प्रवीण परदेशी हा अधिकारी निव्वळ महान समजावा लागेल. पण आपल्याकडे शासकीय अधिकाऱ्यांबद्दल चांगलं बोलण्याची पद्धत नसल्यामुळे या अधिकाऱ्याचं कार्य दुर्लक्षितच राहिलं आहे.

देशात कुठलेही प्रोजेक्ट राबवले गेले तर त्यावर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप होतात पण किल्लारी पुनर्वसन हे एकमेव असं व्यवस्थापन होतं त्यावर आजपर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही.

जेंव्हा भूकंप झाला तेंव्हा प्रौढमृताला 50 हजार आणि लहान मृतास 25 हजार रुपयांची मदत देण्यात अली होती. ती मदत सुध्दा योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोचली त्याबाबत आजपर्यंत एकही आक्षेप नोंदवला गेला नाही हे विशेष. यातली सर्वात महत्वाची बाबा अशी होती की जी मुलं अनाथ झाली त्यांना खूप मोठी मदत मिळाली होती.

ती मदत जर त्या अनाथ मुलांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केली तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त होती त्यामुळे या सगळ्या मुलांचं पालकत्व हे कलेक्टर या नात्याने प्रविणसिंह परदेशी यांच्याकडे सोपवण्यात आलं आणि ही मदत त्या मुलांच्या नावाने त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात अली आणि विशेष म्हणजे संबंधित मुलगा जेव्हा 18 वर्षांचा होईल तेंव्हा त्याला ती व्याजासह परत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आज असंख्य मुलांना ती रक्कम व्याजासह मिळाली आहे त्यावर सुद्धा एकही आक्षेप समोर आलेला नाही. हे या पुनर्वसनाचे महत्वाचं यश होतं.

किल्लारी परिसरातल्या मंगरूळ गावचे रहिवाशी असलेले अमर बिराजदार सांगत होते. की,

“त्यावेळी परदेशी साहेब जर जिल्हाधिकारी नसते तर किल्लारी 52 गावांच्या पुनर्वसनाचा पूर्णपणे नास झाला असता, साहेबांनी या पुनर्वसनात भ्रष्टाचाराला तर थाराच दिला नाही पण भ्रष्टचार करतील अशी शंक असलेल्या माणसांना सुद्धा तातडीने बाजूला सारलं त्यामुळेच हे पुनर्वसन इतकं प्रामाणिक होऊ शकलं”

प्रविणसिंह परदेशी यांनी किल्लारीचं संकट धीरोदात्तपणे पेलेलं तर होतंच पण तितक्याच ताकतीने त्यांनी पुनर्वसन सुद्धा केलं आहे. त्यामुळेच आजही किल्लारी आणि परिसरात फिरताना प्रविणसिंह परदेशी हा अधिकारी इथल्या लोकांच्या काळजात असल्याचं पाहायला मिळतं.

शरद पवार आणि प्रविणसिंह परदेशी ही दोन माणसं त्या भूकंपाच्या वेळी नसती तर आज किल्लारी कुठल्या टोकाला असती याचा विचार न केलेला बरा…

दत्ता कानवटे, औरंगाबाद. ( 9975306001 )

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.