चौकात येताच पाहतो तर चोहीकडून असंख्य लोक जीव मुठीत घेऊन पळताना दिसत होते.

गाढ झोपेत असतानाच अचानक एका धक्क्यानिशी गडगड असा आवाज झाला. मी दचकून जागा झालो. उठून बसतो न बसतो तोच सगळे घर गदगद हलायला लागले. घरातील सर्व भांडी व भिंतीवरील तसबिरी कोणीतरी फेकल्यासारखे जमिनीवर आदळू लागले. क्षणभर भांबावल्या सारखे झाले. विचार करायला उसंत नव्हती. नेमकं काय होत आहे हेही कळत नव्हत. हा भूकंपाचा धक्का आहे हे लक्षात आलं. एव्हाना पत्नी जागी झाली. मी झोपलेल्या संकेतला क्षणात जवळ घेतले व जीव वाचविण्याच्या हेतूने मी पत्नीस चल चल म्हणत आम्ही सर्व बाहेर आलो.

समोरील घरे पत्त्याचे बंगले जसे कोसळावेत तसे कोसळत होते. लाईटही गेलेली होती. जिकडे तिकडे क्षणात धुळीचे साम्राज्य पसरले. अंधाराने संपूर्ण गाव आपल्या कवेत घेतला. समोरील काहीही दिसत नव्हत. मात्र रडण्या-ओरडण्याचे आवाज आणि किंकाळ्या आसमंतात दाटल्या होत्या.

प्रचंड बेचैनीत माझ्या लक्षात आले की हा भूकंपच आहे. मी पत्नीला म्हणालो,

” अरे बापरे..! भूकंप झाला.”

तिच्याही लक्षात आले.

आम्ही घाबरून गेलो. आमच्या घरासमोरील भिंत कोसळल्यामुळे रस्ता बंद झाला होता. बाहेर पडण्याची धडपड करीत होतो. पण काहीच सुचत नव्हते, का कोण जाणे? कसे बाहेर पडलो हेही समजले नाही. जीवाच्या आकांताने समोर पडलेल्या भिंतीचा ढिगाराही दिसला नाही. पायाखाली येणारे दगडही दिसत नव्हते. फक्त जीव वाचविणे ह्या एकाच धडपडीत आम्ही भिंतीच्या ढिगाऱ्यावरून बाहेर कसे पडलो याचे आश्चर्य आजही वाटते.

आम्ही ज्या घरात राहत होतो, त्या घरातून बाहेर येता क्षणीच छत कोसळले. त्या वेळेस कोणताच विचार आला नाही. परंतु जेव्हा ह्या भयाण प्रसंगाची आठवण होते तेव्हा अंगावर शहारे येतात.

Screenshot 2019 09 30 at 1.16.26 PM

एका सेकंदाने घराबाहेर पडण्यास जर विलंब झाला असता तर आम्ही सुद्धा इतरांसारखेच ढिगऱ्याखाली समाधीस्थ झालो असतो. हा प्रसंग आठवला की वाटतं बर झालं त्यादिवशी प्यालो नाही. या विचाराने आजही मी भयभीत होतो. त्या रात्री झोपण्यापूर्वी भिंतीवरील गणरायाचे दर्शन झाले होते. कदाचित त्यानेच भूकंप होता क्षणीच आम्हाला जागे केले व बाहेर पडण्याची बुद्धी दिली असावी. अशी माझी श्रद्धा आहे.

समोरचे काहीच दिसत नव्हते. नाकातोंडात धूळ जात होती. मी पोलीस स्टेशनकडे जाण्यास निघालो. पायाखालचा रस्ता असूनही पोलीस स्टेशन कोणत्या दिशेला हे प्रयत्न करूनही लक्षात येत नव्हते. सगळेच काही बदललेले होते. रोजचा ओळखीचा परिसर दिसत नव्हता. कोणाचीही भीतीने गाळण उडून अंगावर काटे उभे राहावे अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती.

थोड्या वेळापुरते मला काय करावे हे काहीच सुचत नव्हते. शेवटी हिंमत करून पत्नीला म्हणलो, चल पोलीस स्टेशनकडे तरी जाऊ. पत्नीसह अंदाजानेच त्या भयाण अंधारात पडलेल्या दगडा-मातीच्या ढीगऱ्यावरून रस्ता शोधीत शोधीत चालू लागलो. परंतु रस्त्याच्या कडेच्या भिंती पडल्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी दगडा-मातीचे ढिगारे पडले होते. रस्ता त्यात हरवला होता. सर्व दिशा संपल्या होत्या. कधी मी पत्नीस हाताचा आधार देत होतो तर कधी पत्नी मला आधार देत होती. असे एकमेकांच्या आधाराने मुलाला घेऊन अंधार कापीत एक एक पाउल पुढे जात होतो. चौक आल्याचे जाणवले.

चौकाच्या प्रत्येक कोपऱ्यातून किंकाळ्या आणि रडण्याच्या आवाज येत होता. पाहतो तर हा पोलीस स्टेशन पुढील नेहमीचाच शिवाजी चौक होता.

चौकात येताच पाहतो तर चोहीकडून असंख्य लोक भयभीत होऊन जीव मुठीत घेऊन पळताना दिसत होते.

त्यांच्या फक्त आकृत्या दिसायच्या. प्रचंड आक्रोश चालला होता. अंधारातही लोक दिसेल त्याला विनंती करीत,

“अहो माझ्या घरात वडील दबलेत, कोणी म्हणे आई, पत्नी, मुलगा दबला. जे कोणी अडकले असतील त्याचे नाव त्यांना काढण्यास चला. हो म्हणून केविलवाणी विनंती करीत. ऐकणाराही सांगणाऱ्यालाही अशीच विनंती करीत होता. शेवटी सर्वजण हताश होऊन एकमेकांच्या चेहऱ्याकडे भांबावलेल्या परिस्थतीत पाहत रडत उभे होते.

Screenshot 2019 09 30 at 1.16.34 PM

ह्या बिकट परिस्थतीत माझ्यावरील आपत्ती टळली होती. थोडासा धीर आला होता. आलेल्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी माझ्यात नवे बळ संचारल्याची मला जाणीव झाली. माझ्या घाबरलेल्या पत्नीस मी धीर दिला, तीही सावरली. मी तिला संकेतला घेऊन कुठेतरी बसण्यास सांगितले. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येतो, असे सांगून मी निघालो. पोलीस स्टेशनच्या गेट समोर घाबरलेल्या अवस्थेत पवार उभे होते.

संकट काळात लोकांच्या मदतीला धावून जाणे हे पोलीस खात्याचे ब्रीद वाक्य मला प्रेरित करत गेले. सर्व विसरून मी कामाला लागलो.

“नियंत्रण-कक्षाला माहिती दिली का ?” त्याच्या उत्तराची वाट न पाहता मी पोलीस स्टेशन समोर गेलो. थोड्या वेळापूर्वी अनुभवलेल्या भयंक संकटामुळे इमारतीमध्ये जाण्याची हिंमत होत नव्हती. त्या इमारतीचा बिनतारी संच हाताळता येत नव्हता. आत जाताच इमारत कोसळेल ही भीती सतत जाणवू लागली. इमारतीच्या मागून गेलो. सुदैवाने बिनतारी संच हा खिडकीच्या अगदी जवळच बसविण्यात आला होता.

त्यामुळे ताबडतोब खिडकीतून हात घालून माईक ओढून घेतला व त्याद्वारे मी पोलीस अधीक्षक श्री. बिप्पीन बिहारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना घाबरलेल्या मनस्थितीत,

“सर, किल्लारीला भूकंप झाला आहे. अंदाजे पाचशे जण मृत्युमुखी पडले असावेत,”

अशी माहिती एका दमात दिली. ती वेळ अंदाजे सकाळी ४.१५ मिनिटांची असावी. त्यांनी उलट उत्तरी कळविले, “ठीक है, हम आ रहे है.” हा पोलीस अधीक्षकांचा संदेश घेऊन, मी पोलीस स्टेशनच्या आवारातून परत शिवाजी चौकाकडे जाण्यास निघालो.

समोर पाहिले तर जवळपास शंभर लोकांचा जमाव आक्रोश करीत पोलीस स्टेशनकडे येत होता. या मागचे कारण एकच होते, आपल्या घरातील व्यक्तीचे प्राण वाचवावे व आपल्याला आधी मदत मिळावी म्हणून ते पोलिसांची मदत मागण्यासाठी येत होते. प्रत्येकाचं आप्तस्वकीय ढिगऱ्याखाली गाडले गेले होते. जिकडे तिकडे भेसूर आक्रोशांचा कल्लोळ चालला होता.

पोलिसांचे मोजके हात किती जणाला मदत करतील ? मदतीसाठी सदैव तयार असलेल्या हातांच्या मागे असलेली मनेसुद्धा भयभीत झालेली होती. याची लोकांना काय कल्पना !

एकंदरीत सर्वजण मदतीकरिता याचना करीत होते. अशा स्थितीमध्ये स्थानिक मोजकेच पोलीस मदतीकरिता उपलब्ध होते, अशा निसर्गाच्या प्रकोपाचा भेसूर व विदारक प्रसंग आयुष्यात प्रथमच अनुभवायला आला होता. हा एकीकडे गोंधळ सूर असतांना पोलीस स्टेशनचे पवार, उडते, शेटकर, हिंगे हे सर्व कर्मचारी भयभीत अवस्थेतच माझ्याजवळ आले.

जमावातला प्रत्येकजण आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेऊन होता.

कोण काय बोलतं हे आम्हाला कळत नव्हते. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. हे सर्व आम्ही पाहिले व पाहत होतो. त्यांचे समाधान करणे आमचे कर्तव्य होते. “चला आम्ही आलोच” एवढे म्हणतो न म्हणतो तोच एक माणूस इतरांना रेटीत पुढे आला. तो मोठमोठ्याने ओरडून आकाश पातळ एक करीत होता. त्याचे बोलणे आणि रडणे आम्हाला सारखेच वाटू लागले.

“हमारा घर गिरके लोगा घरके अंदर दब गये, तुम क्या कर रहे हो ? उन्हे निकालने के लिये चलो,” भावनाविवश आणि क्रोधाने तो बोलत होता. अंधार असल्याने तो कोण आहे हे आम्हाला ओळखता आले नाही.पण त्याचा आवाज ओळखीचा वाटल्याने मी त्याच्याजवळ सरकलो व त्याच्या जवळ जावून म्हणालो, “अरे अत्तार भाई, क्या बात है ? घबरावो मत, हम सब आयेंगे.” असे म्हणून त्याला धीर दिला. तो रागात बोलला तरी मला त्याचा मुळीच राग आला नाही. त्याला मदत करावी हीच भावना माझ्या मनात होती. आभाळ फाटले होते. इच्छा असूनही ठिगळे लावता येत नव्हती. आम्ही केवळ नऊ-दहा जणच होतो. आमच्या दही दिशांनी केवळ आक्रोश कानावर पडत होता.

जिकडे तिकडे हीच धावपळ असताना आम्हीही अस्वस्थ होतो. भूकंपाच्या संकटातून मी व पोलीस कर्मचारीही सुटलो नव्हतो. आमचीही घरे कोसळली होती. या पडझडीत आमच्या कर्मचार्यांना व त्यांच्या घरातील सर्व कुटुंबियांना दुखापती झाल्या होत्या. अशाही परिस्थतीत जनसेवा लक्षात घेऊन व लागलेला मार विसरून आम्ही सर्वांनी आमची मुले बाईल रस्तावर बसवून लोकांना मदत करण्यासाठी पुढे आलो होतो.

अत्तारचा आक्रोश भयंकर होता. त्याच्या सोबत मी, उडते, शेटकर, हिंगे त्याच्या घराकडे निघालो. काही अंतर चालून गेल्यानंतर दगडा-मातीच्या अनेक ढिगऱ्यापैकी त्याने एक ढिगारा दाखविला आणि म्हणाला,

“साहब, ये मेरा घर घर है, इसके अंदर मेरे घरके लोग दब गये”

आणि त्याने ऊर बडवायला सुरुवात केली.

त्याचे सर्व घर जमीनदोस्त झाले होते.घरांच्या भिंती पडल्यामुळे घरावरील पत्रे व लाकडे ढिगऱ्यावर होती. ढिगारा कोणत्या बाजूकडून उपसावा, क्षणभर विचार केला. तोच ढिगऱ्याखालून कण्हण्याचा आवाज आला आणि आम्ही भराभर दगड-माती बाजूला काढायला सुरुवात केली. काहीजण पत्रे ओढत होते तर काहीजण त्याखालची लाकडे. पत्रे खिळलेले असल्यामुळे प्रचंड ओढाताण होत होती.

Screenshot 2019 09 30 at 1.16.44 PM

अडकलेल्यांना बाहेर काढणे हेच प्रत्येकाचं ध्येय होत. मी स्वतः देखील प्रचंड वेगाने दगड-माती बाजूला सारीत होतो. समोर आक्रोश करीत असणारा अत्तार रडत रडत म्हणू लागला, “घबराहो मत..घबराहो मत.. अभी निकालते है” आणि तो पूर्ण अवसान गळाल्यासारखा विकलांग होऊन रडत होता. ढिगारा उपसतांना एखादा दगड अडकलेल्या व्यक्तीवर पडला किंवा माती ढासळली तर आतला माणूस जिवंत राहू शकणार नव्हता. “दमसे निकालो, दमसे निकालो” प्रत्येकजण प्रत्येकाला सूचना देत होता.

सुदैवाने ढिगऱ्यातून आम्ही तिघांना जिवंत बाहेर काढले. तमिजबी अत्तार, फारूक आणि अल्लाबक्श हे तिघे निघाले. सगळेजण अत्तारच्या भोवती जमा झाले. एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागले.

आक्रोशाने आसमंत भरून गेला होता. मी स्वतः आणि माझे सहकारी लोकांना जास्तीत जास्त मदत करत होते. कुठूनतरी असाच किंचाळण्याचा आवाज आला. मी त्या दिशेने निघालो. लोक सैरावैरा पळत असल्याचे दिसले. मी अनेकांना अडवून, “काय झालं ?” म्हणून विचारलं. जो तो आपला जीव मुठीत घेऊन पळत होता. हे का पळत आहेत हे अजूनही मला समजत नव्हते. यांच्यावर अजून कोणते संकट आलेले आहे. याची क्षणभर कल्पना केली. पण सत्य कळणे कठीण झाले.

धावणारा एकजण हातवारे करीत सांगू लागला,

“धरण फुटले, पळा..पळा..”

हे ऐकून मी फार परेशान झालो. माझ्यातील सगळी शक्ती गळून पडते आहे, असे मला वाटू लागले. आता काय करावे. मीच मला प्रश्न विचारला. उत्तर सापडत नव्हते. भूकंपातून कसेबसे वाचलो, धरण फुटलं तर यातून वाचणे शक्य नाही. असा विचार मनात चमकून गेला. होणारे तर टळणार नव्हतेच. मग थांबायचे तरी कशाला. म्हणून मी दगडा-मातीच्या ढिगऱ्यावरून धावत होतो. लोकं सैरावैरा पळतच होते. त्यांची दिशा वेगळी माझी दिशा वेगळी.

जर माकणी धरण फुटले तर भूकंपातील ढिगऱ्या सकट आपण सर्वजण वाहून गेल्याशिवाय राहणार नाही.

याची जाणीव मला झाली. मृत्युच्या तांडवातून आपण सुटणार नाही हे माझ्या लक्षात आले. धावण्याचा माझा वेग कमी झाला. पोलीस स्टेशनवर पोहचलो. माझे सहकारी प्रचंड दडपणाखाली माझ्यासोबतच होते. आमच्यापैकी कोणालाही आपल्या कुटुंबाची मुलाबाळांची आठवण आली नाही. केवळ कर्तव्य म्हणून आम्ही वेड्यासारखे लोकांच्या मदतीसाठी धावलो. माकणी धरण खरेच फुटले काय याची खात्री करणे आवश्यक होते.

पोलीस स्टेशनवर पोहोचताच मी बिनतारी संदेशावरून लातूर कंट्रोल रूमशी संपर्क साधला. त्यांनी लगेच खात्री करून कळविले की, धरण फुटले नाही.

कारण अगोदरच नैसर्गिक कोपामुळे लोक भयभीत झाले. त्यात पुन्हा धरण फुटल्याची अफवा ! आपणही वाहून जाणार, या भीतीपोटी लोक येणाऱ्या नव्या संकटातून आपला जीव मुठीत घेऊन समोर दिसेल त्या रस्त्याने धावत होते. ह्या धावपळीत पोटाच्या मुलाचा सुद्धा विचार न करता आपलाच जीक आपला समजून पळत होते. अपंग, ज्यांना पळता येत नव्हते, असे खुरडत खुरडत पुढे सरकू लागले. त्यांनाही येणाऱ्या पुरातून स्वतःला वाचवायचे होते.

धरण फुटल्याच्या अफवेने लहान मुलापासून ते म्हातार्यांपर्यंत सर्वजण पळतच होते. माकणी धरण फुटल्याची केवळ अफवा होती. यातून लोकांना सावरणे आवश्यक होते. काय करावे लोकांना धीर द्यावा तरी कसा ! मी लगबगीने पोलीस जीप जवळ आलो व स्पीकरवरून लोकांना आवाहन केले,

” बाबांनो, पळू नका..घाबरू नका..माकणी धरण फुटले नाही.”

हेच वारंवार घसा कोरडा होईपर्यंत सांगत राहिलो. समोरून धावणाऱ्यांनाही हाताने इशारा करून थांबा-थांबा म्हणालो. माझ्यावर कुणीही विश्वास ठेवण्याला तयार नव्हते. माझ्या तळमळीला कोणीही दाद देत नव्हते.

भूकंप झाल्यावर पोलिसांची मदत मागण्यासाठी हजारो लोक अंधारात माझ्याकडे आले होते. पण आता एकही जण मदतीची अपेक्षा न ठेवता स्वतःच गावाच्या बाहेर पडत होता.

पळणाऱ्या कित्येकांचे आप्तस्वकीय ढिगऱ्याखाली सापडले. जे जखमी होते ते विव्हळत होते. माकणी धरण फुटल्याच्या अफवेने त्यांच्याकडे त्यांचाच आप्तस्वकीय बघायला तयार नव्हता. हीच पळणारी माणसं धरण फुटल्याच्या अफवेपुर्वी धडपडून रडत-भेकत इतरांची मदत घेऊन अडकलेल्या माणसाला जिवंत बाहेर काढण्यासाठी धडपडत होते. जखमींना दवाखान्यात कसे नेता येईल या विवंचनेत होते.

Screenshot 2019 09 30 at 1.16.26 PM

पण एका अफवेने लोकांची मानसिकता क्षणात अमुलाग्र बदललेली होती. माकणी धरण फुटल्याच्या अवफेपूर्वी सगळे हात ढिगऱ्यात दबलेल्यांना बाहेर काढण्यासाठी गुंतले होते. अनेकांना जिवंत बाहेर काढले होते, तर अनेकांना जिवंत बाहेर कंबरेपर्यंतच काढले असताना, धरण फुटल्याची अफवा पसरली. क्षणात मदत करणारे हात मागे आले. अर्धे अधिक शरीर बाहेर पडलेल्यांना नवा सूर्य दिसणार होता. अशांना आपण कोसळलेल्या संकटातून जिवंत बाहेर निघणार, ही त्यांची आशा पल्लवित झाली होती. त्यांनी आपले हात समोरच्यांनी ओढावेत यासाठी जीवाच्या आकांताने वर उचलले. श्वासापुरती हवा मिळाली पण मदत करता करताच मदतीचे हात थांबले. दबलेल्यांच्या मनात आपण जिवंत निघू, ही जी आशा क्षणापूर्वी निर्माण झाली होती ती दुसर्याच क्षणी संपली.

सूर्योदय होता होताच मावळला. मदतीची याचना करीत करीत व तडफडत त्यांनी शेवटी आपले प्राण सोडले.

ज्यांच्या अंगावर, पायावर दगड-माती, माळवद पडून गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी काहींच्या जखमेतून प्रचंड रक्तस्त्राव होत होता. त्यांच्या चेहऱ्यावर आपण जिवंत राहिलो याचे समाधान होते. त्याचे आप्तस्वकीय त्यांना वैद्यकीय उपचारासाठी सुरक्षित ठिकाणी नेत होते. अनेकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद नव्हती. रक्त वाहत असल्याने त्यांना जागेवरून उठता पण येत नव्हते किंवा हालचालही करता येत नव्हती. अशांना त्यांचे आप्तस्वकीय आधारकाठी होऊन त्यांना शिवाजी चौकाकडे आणण्याचा प्रयत्न करीत होते.

दगडा-मातीच्या ढिगाऱ्यांची त्यांना पर्वा नव्हती. अफवा आली. जखमींना खांद्यावर घेऊन जाणाऱ्यांनी त्याला तिथेच टाकून दिलं. ज्यांना हाताचा आधार देत चालवीत आणू लागले. अशा पंगु लोकांना झालेल्यांना तिथेच सोडून निघून गेले.

“अरे…मला सोडून जाऊ नका..मला वाचवा रे…!”

गयावया करीत जाग्यावरच खुरडत मागून पळत जाणाऱ्यांना विनवू लागले, “मला घेऊन चला..मला कोणीतरी वाचवा रे बाप्पा..” जखमी आणि पंगुचा आक्रोश हवेत विरून जात होता. धावणारा एकहीजण त्यांच्याकडे बघतही नव्हता. जो तो आपल्याच घाईत. आपल्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. मदत करण्याऐवजी आपल्याला तुडवून लोकं धावत आहेत. आपल्याला जिवंत राहायचं आहे, कोण वाचवतील आता..कोणाला हाक मारावी ? काय करावे ? … सगळे मार्ग खुंटले.

आता एकच मार्ग शिल्लक उरला होता. तो म्हणजे ‘नीळकंठेश्वर’.

“बाप्पा…नीळकंठेश्वरा…तू तरी धाव !” म्हणत म्हणत अनेकांनी आकाशाकडे पाहत आपले प्राण सोडले. असाह्य लोकांना रस्त्यात सोडून आपला जीव वाचविण्यासाठी जे लोकं पळू लागले, त्यांच्यापैकी काहीजण दगडा-मातीच्या ढिगाऱ्यावरून पळताना नाटीला, पत्राला, दगडाला पाय अडकून पडले. तिथच मेले. काहीजण असेच अडखळून पडले. मागचे त्यांना तुडवून पुढे गेले. अशा तुडवातुडवीत काही मेले.

माकणी धरण फुटल्याची अफवा आहे, हे धावणाऱ्यांच्या लक्षात आले. मघाशी स्पीकरवरून पोलिसांनी सांगितलेले खरे आहे, हे त्यांच्या उशिराने लक्षात आले. पुन्हा त्यांना भूकंपाची आठवण झाली. पडलेल्या घरांची आठवण झाली. दगडा-मातीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्यांची आठवण झाली. धावपळीत हरवलेल्या मुला-बाळांची आठवण झाली. काहीना घरात पुरून ठेवलेल्या धनाची आठवण झाली.

पुराच्या अफवेमुळे पळणारा लोंढा रीबोंड झाला. मी व माझे सहकारी, ढिगाऱ्यात दबलेल्या लोकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत होतो. पळत गेलेले लोकं लगेच परतले. पुन्हा गोंधळ सुरु झाला. पुन्हा हात मदतीसाठी सरसावले. प्रचंड वेगाने ढिगारे उपसले जाऊ लागले. भूकंपामुळे गावाचा नकाशा आणि दिशाही बदलल्या होत्या. सर्व माणसे दिशाहीन झाली होती. जमेल त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करू लागली.

एका ढिगाऱ्याखाली एक मुलगी सापडली.

असेल तेरा चौदा दिवसांची. बाहेर काढलं तेव्हा बेशुद्ध होती. आजूबाजूला काम करणाऱ्या लोकांनी ढिगारे उपसण्याच काम थांबवील. सगळे त्या लेकराभोवती गोळा झाले. नीळकंठेश्वराची कृपा म्हणून लेकरू वाचलं. अनेकांनी उद्दगार काढले. काही तरुणांनी तिला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. आणि ती शुद्धीवर आली. ही गोष्ट सर्वांनाच या दुःखाच्या क्षणी एक सुखद अनुभव देऊन गेली.

ती वाचलेली मुलगी कोणाची आहे याचा प्रयत्न करूनही शोध लागला नाही. त्यामुळे तिच्या जातीचाही प्रश्न आला नाही. तिच्या धर्माचाही प्रश्न आला नाही. निसर्गाने तिच्यावरील जाती धर्माची बंधने तोडून तिला मुक्त केले होते. ती आता केवळ मानवाची कन्या होती. नावावरूनही धर्माची ओळख होते. ज्या भूकंपामुळे तिला जाती धर्माच्या भिंती पलीकडे जाता आले, तिला एकच नाव शोभून दिसेल ते म्हणजे ‘भूकंपकन्या.’

किल्लारी या गावात लिंगायत आणि मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. येथे द्राक्ष आणि ऊसाच्या बागायती आहेत. या शेतावर काम करणाऱ्या मजुरांच्याही वेगवेगळ्या जाती आहेत. गणेश उत्सवात निर्माण झालेला जातीय तणाव, हे सर्व भेद भूकंपाने या क्षणी संपविले होते. सगळ्या जाती धर्माच्या भिंती दगडा-मातीच्या भिंती बरोबरच ढासळल्या. जिवंत राहिलेल्या लोकांना भूकंपग्रस्त या नव्या नावाने जगभरात ओळखले जाऊ लागले.

तिथे कोणी हिंदू नव्हता, कोणी मुस्लीम नव्हता, कोणी बौद्ध नव्हता, कोणी शीख नव्हता, कोणी इसाई नव्हता या सर्वांना मिळून एकच नाव ते म्हणजे भूकंपग्रस्त !

भूकंपामुळे जातीपातीची बंधने तुटली होती. शत्रुत्व संपले होते. श्रीमंती आणि गरिबी मध्ये भेदभाव राहिला नव्हता. पूर्वीचे सर्व विसरून एकमेकांना आधार देत होते. सर्वांच्याच पदरात नियतीने दुख टाकले होते. दुःखाचे प्रमाणही समान होते. केवळ मानवता हाच धर्म समजून कित्येक लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा जीव वाचावा म्हणून वेड्यागत धडपडत होते. सर्वजण नियतीच्या फुटक्या नावेतील सहप्रवाशी होते. प्रत्येकाची जिवंत राहण्याची धडपड चालू होती. मानवी प्रवृत्तीच्या काही विचित्र छटा पाहून मन बेचैन झाले.

ढिगारे उपसण्याचे काम चालू असताना एक माणूस चादरीत नोटा गुंडाळून ते गाठोडे पाठीवर घेऊन पळून जाताना दिसला. तर एकजण ढिगाऱ्यात अडकलेल्या आपल्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष करून जमिनीत पुरलेले धन काढण्यात मग्न होता.

साभार : किल्लारीचा साक्षीदार : लेखक : किशोर नावंदे (पोलीस उपनिरीक्षक)

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.