विचित्र सवय असलेला गुजरातचा राजा ३५ किलो जेवणासोबत विषसुद्धा प्यायचा….

इतिहासामध्ये बरेच राजे महाराजे होऊन गेले त्यांच्या गोष्टी आणि पराक्रमाचे किस्से आपण ऐकत असतो. यापैकी काही राजे आपल्या दहशतीसाठी प्रसिद्ध होते तर काही राजे दानशूर आणि पराक्रमी वृत्तीसाठी प्रसिद्ध होते. काहीजण तर आपल्या क्रूर कारनाम्यांमुळे प्रसिद्ध झाले आणि इतिहासात आपलं नाव कोरून गेले. आजचा आपला किस्सा जरा हटके आहे.

आजचा किस्सा आहे सुलतान मेहमूद बेगडा या गुजराती राजाचा. हा पराक्रमी तर होताच पण त्याचा पराक्रम बाजूला राहिला आणि भलत्याच गोष्टीसाठी त्याचं नाव झालं. हा मेहमूद बेगडा प्रसिद्ध होता आपल्या भरमसाट खाण्याच्या सवयींविषयी आणि धडकी भरवणारी गोष्ट म्हणजे तो विष सुद्धा प्यायचा. 

मेहमूद शाह हा मेहमूद बेगडा याच नावाने ओळखला जायचा. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी तो गुजरातल्या राजगादीवर बसला आणि तिथून पुढे त्याने तब्बल ५२ वर्ष ( १४५९- १५११ ) गुजरातवर यशस्वीपणे राज्य केलं.

गिरनार आणि चंपानेर या किल्ल्यांना जिंकल्यामुळे मेहमूद शहाला बेगडा हि पदवी मिळाली होती.

पण खरंतर मेहमूद बेगडा हा आपल्या पराक्रमासाठी कधीच ओळखला गेला नाही. तो चर्चेत राहिला त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आणि लांब लांब असलेल्या मिश्यांमुळे आणि दाढीमुळे. असं सांगण्यात येतं कि मेहमूद बेगडाच्या मिशा इतक्या मोठ्या होत्या कि तो त्या डोक्याच्या पाठीमागे बांधून चालायचा. 

आजवर बरेच खाण्याचे शौकीन पाहिले असतील पण मेहमूद बेगडा हा खाण्याच्या बाबतीत तुर्र्म खान होता. एका दिवसाला तब्बल ३५ किलो जेवण तो जेवायचा. इतकं सारं खाऊनसुद्धा त्याला रात्री झोपताना भूक लागायची. त्यामुळे त्याच्या पलंगाच्या दोन्ही बाजुंनी मांसाने भरलेले समोसे ठेवले जात असे जेणेकरून तो झोपेतून उठल्यावर खाऊ शकेल.

इटालियन प्रवासी Ludovico di Varthema ने आपल्या प्रवास वर्णनात या राजाचा उल्लेख केला आहे. आपल्या पत्रांमध्ये त्याने मेहमूद बेगडाचं वर्णन आणि त्याच्या भरमसाट जेवणाबद्दल लिहिलं आहे. म्हणजे त्याने बेगडाच्या नाश्त्यापासून ते जेवणापर्यंतचा आहार नमूद केलेला आहे.

रोज सकाळी एक ग्लास मध आणि १५० हुन अधिक केळी तो फस्त करायचा. दुपारच्या पोटभर जेवणानंतर त्याला गोड खाण्याचा शौक होता. यामुळे तो रोज जवळपास साडेचार किलो मिठाया खात असे.

यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जेवणाबरोबर मेहमूद बेगडा विष सुद्धा पीत असे. याबाबत पोर्तुगालचा प्रवासी  Duarte Barbosa गुजरातच्या दौऱ्यावर आला होता. त्याने आपल्या पुस्तकात या घटनेबाबतचा उल्लेख केला आहे कि सुलतान रोज जेवण झाल्यावर विष प्राशन करत असे. आता या मेहमूद बेगडाला विष पिण्याची सवय कशी लागली याची एक बॅकस्टोरी आहे. 

ज्यावेळी सुलतान बेगडा हा लहान होता तेव्हा त्याला विष देऊन मारण्याचं कारस्थान रचण्यात आलं होतं.  पण चमत्काराने तो वाचला. तेव्हापासून बेगडाने हळूहळू विष प्यायला सुरवात केली जेणेकरून त्याच्या शरीराला विषाची सवय होवो आणि भविष्यात जर कोणी असा प्रयत्न केला तर त्यातून वाचता येईल असा त्याचा अंदाज होता.

मेहमूद बेगडाच्या हातावर डास किंवा माशी जरी बसली तरी काही क्षणातच ती तडफडून मारून जायची. कारण बेगडाच्या शरीराला विषाची सवय होऊ लागली होती. ज्या ज्या महिलांसोबत तो संबंध ठेवत असे त्या महिलांचा बिनबोभाट जीव जात असे. 

सुलतान मेहमूद बेगडा हा गुजरात शासकांपैकी सगळ्यात पराक्रमी राजा म्हणून गणला जातो. त्याने अल्पावधीतच जुनागढ आणि पावागढ या प्रदेशांवर कब्जा करून आपली ताकद दाखवून दिली आणि राज्याचा विस्तार केला. जे राजे त्याच्याविरुद्ध हरत असे त्या राजांना तो जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडत असे आणि जर कोणी नकार दिला तर तो त्याला मृत्यूच्या दाढेत ढकलून देत असे.

गुजरातमधील द्वारकाधीश मंदिर तोडण्याच्या कारणाला सुलतान मेहमूद बेगडाला कारणीभूत ठरवण्यात येते. १४७२ मध्ये त्याने द्वारकाधीश मंदिर तोडण्याचा आदेश दिला जेणेकरून हिंदू लोकांची भक्ती कमी होईल. पुढे पंधराव्या शतकात या मंदिराचं पुर्ननिर्माण करण्यात आलं. 

पण मेहमूद बेगडा आपल्या या विचित्र सवयीमुळे इतिहासात अमर झाला. ३५ किलो जेवण आणि रोज विष पिऊनसुद्धा तो एकदम तंदुरुस्त असायचा हे कोडं मात्र आजही तसंच आहे….

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.