राजाच्या मनात आलं आणि एका दिवसात देशाचं नाव बदललं.

देशाचं नांव बदलणं ही तशी फार किचकट प्रक्रिया पण आफ्रिकेतील स्वाझीलँड नावाच्या देशाच्या राजाला वाटलं की ५० वर्षे झाली एकच एक नांव वापरून. अजून किती दिवस तेच ते जुनं नांव वापरणार. मग काय आले राजाच्या मना, तेथे कोणाचे चालेना. राजाने देशाच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याचं औचित्य साधून देशाचं नांव बदलत असल्याची घोषणा केली. आतापर्यंत स्वाझीलँड नावाने ओळखला जात असलेला देश यापुढे ‘द किंग्डम ऑफ इस्वातीनी’ या नावाने ओळखला जाईल असं सांगितलं आणि क्षणार्धात देशाचं नांव बदललं गेलं. परदेशी लोकांचा स्वाझीलँड आणि स्विझर्लंड यांमध्ये गोंधळ उडतो, तो टाळण्यासाठी आपण नांव बदलत आहोत, असं त्यांनी सांगितलं.

‘मस्वाती तृतीय’ हे स्वाझीलँडचे राजे. जगभरातील धनाढ्य राजांपैकी एक. देशाचं नांव बदलल्याने सध्या ते आणि त्यांचा देश चर्चेत आहेत. भारतात या राजाची चर्चा यापूर्वीही एकदा झाली होती, जेव्हा ते दिल्लीत पार पडलेल्या भारत-आफ्रिका संमेलनात भाग घेण्यासाठी आपल्या १४ राणी, ३० मुले आणि १०० नोकरांसह आले होते. त्यावेळी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी २०० रूम बुक करण्यात आल्या होत्या. राजे स्वतः ज्या रूममध्ये राहणार होते, त्या रुमचं प्रतिदिवसाचं भाडं होतं तब्बल दीड लाख रुपये. त्यांचे वडील सोभूजा द्वितीय यांना आपल्या २७० राण्यांपासून २१० मुलं होती.

इस्वातीनीच्या या राजाला देशातील एका पारंपारिक उत्सवामुळे मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं आहे. दरवर्षीच्या ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान देशात ‘उम्हलांगा सेरेमनी’ नावाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ८ दिवस चालणारा हा उत्सव लुदजीनिनी या गावात पार पडतो. १०००० पेक्षा अधिक अविवाहित मुली या उत्सवात सहभागी होतात आणि पारंपारिक संगीतावर नृत्य करतात. याच उत्सवात जमलेल्या मुलींना ‘व्हर्जिन’ राहण्याचा सल्ला दिला जातो. तसंच लग्नापूर्वी प्रेग्नंट झालेल्या मुलींना शिक्षा सुनावण्यात येते.

राजासमोर पारंपारिक संगीतावर नृत्य करणाऱ्या मुलींमधून राजा पाहिजे त्या मुलीची आपली राणी म्हणून निवड करतो. राणी म्हणून निवडण्यात येणारी मुलगी ‘व्हर्जिन’ असणं आवश्यक असतं. निवड करण्यात आलेल्या मुलीला राजा स्वतःची ‘प्रेमिका’ म्हणून आपल्या राजवाड्यात ठेऊन घेतो. त्यानंतर ज्यावेळी राजाची इच्छा होईल त्यावेळी तो तिच्याशी लग्न करू शकतो. बऱ्याच वेळा तर प्रेग्नन्सीनंतर देखील लग्नसोहळा पार पाडला जातो. विशेष म्हणजे लग्नाविषयी मुलगी अथवा तिच्या कुटुंबियांना कुठलीच माहिती दिली जात नाही.

२००२ साली राजाने अशाच प्रकारे जेना महलेंगू नावाच्या १८ वर्षीय मुलीची आपली १० वी राणी म्हणून निवड केली होती. त्यानंतर बराच वाद झाला. मुलीला राजाच्या शाही कैदेतून सोडून तीचा ताबा आपल्याला द्यावा यासाठी तीची आई कोर्टात गेली होती. पण ती हे लग्न थांबवू शकली नाही. याच वर्षीच्या उत्सवात राजाने जेना महलेंगू हिची मैत्रीण असणाऱ्या नोलिक्वा अयांदा टेनटेसा या मुलीची सुद्धा स्वतःची राणी म्हणून निवड केली होती. जेनाशी लग्न झाल्यानंतर अवघ्या २ महिन्यातच राजाने नोलिक्वा बरोबर देखील लग्न केलं आणि तीला ११ व्या राणीचा दर्जा देण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.