किंग्डम ऑफ दीक्षित! हे राष्ट्र दीक्षित महाराजांचे!

‘धक धक’ वाली माधुरी माहिती आहे, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीलाजी माहिती आहेत, डायटवाले डॉ.जगन्नाथ तर माहिती आहेतच, पण अगदी परवा परवाच चर्चेत आलेली शर्वरी दीक्षितही माहिती झाली. पण दीक्षित आडनाव लावणारे राजे सुयश दीक्षित हे नावही माहिती नाही? कमाल आहे बाॅ!

महाराज सुयश दीक्षित २०६० चौरस किलोमीटर एवढ्या आकाराच्या देशाचे फक्त सार्वभौम राजेच नाहीत, तर तहहयात पंतप्रधान आणि सेनाप्रमुखही आहेत! महाराजांनी त्यांच्या पिताश्रींची या राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी नेमणूक जाहीर केली आहे! काल्पनिक कथा वाटतेय ना? अजिबात नाही!

या देशाचे नाव आहे ‘किंगडम ऑफ दीक्षित’ आणि हे आहे इजिप्त देशाच्या दक्षिणेला. 

इजिप्त आणि सुदान या देशांच्या मध्ये, दोन्ही देशांच्या सरहद्दीला लागून! दीक्षित असे आडनाव असणाऱ्या एका भारतीय माणसाचे हे राष्ट्र आपल्यालाच माहिती नसावे , हे आपले दुर्दैव! मुळच्या इंदुरच्या पण सध्या अमेरिकेत वास्तव्य असलेल्या सुयश दीक्षित यांनी हा देश कसा काबिज केला, याची कहाणी फार सुरस आहे.

७ नोव्हेंबर २०१७ या मंगलदिनी महाराज सुयश यांनी ‘किंगडम ऑफ दीक्षित’ या भावी देशाच्या पवित्र भुमीवर पहिल्यांदाच पाऊल ठेवले आणि ते तत्काळ तिथले राजे बनले! 

इथे आपल्याला हजार- बाराशे चौरस फुटांच्या फ्लॅटचे हप्ते भरता भरता नाके नऊ येतात, आणि महाराजांनी एका झटक्यात १ कोटी ०७ लाख ६३ हजार ९१० गुणीले २०६० इतके चौरस फूट ( म्हणजे नक्की किती चौरस फूट झाले?) एवढ्या प्रचंड आकाराचे राज्य मिळवले तरी कसे! महाराजांनी ते मिळवले कुठलेही युद्ध न करता, दहशतवाद न करता! अगदी शांततेत! परीकथा वाटावी, अशी ही कथा आहे.

नकाशात बघितले तर इजिप्त देशाची दक्षिण हद्द ही पुर्व पश्चिम सरळ मारलेली रेघ आहे. हा कारनामा ब्रिटिशांचा. 

१८९९ साली इजिप्त आणि सुदान या दोन्ही देशांवर ब्रिटिशांचे राज्य होते. या दोन देशांची फाळणी करताना नकाशावर त्यांनी सरळ एक आडवी रेष मारली. वरचा भाग इजिप्तचा, तर खालचा भाग सुदानचा!

या रेषेलगतच – इजिप्तच्या दक्षिणेस आणि सुदान देशाच्या वरती – ‘बिर ताविल’ नावाचा एक परीसर आहे. वाळवंटी प्रदेश आहे. वर्षातून नऊ महिने रखरखीत उन्हाळा असतो. नदी नाही, की समुद्र नाही. साहजिकच लोकवस्ती नाही. खेडी नाहीत की शहरे नाहीत. कुठल्याही दोन सभ्य शेजाऱ्यांमध्ये असतात, तशा इजिप्त आणि सुदान दोन्ही देशांच्या सरहद्दीवरून कुरबुरी आहेतच. दोन्ही देशांमधून वाहणाऱ्या नाईल नदीच्या पाण्यावरून खानदानी तंटा आहेच. पण, ‘बिर तावील’ प्रदेशावरून इथे थोडे वेगळेपण आहे! 

इजिप्त म्हणतो, रेषेच्या खालचा हा रखरखीत प्रदेश आमचा नाही. सुदान म्हणतो, हा निर्मनुष्य परीसर आमचा नाही! दोन्हीही देश या २०६० चौरस किलोमीटर परीसरावर हक्क सांगत नाहीत! 

201387350 10220354815315684 2621082807204242950 n

मानव राहू शकेल असा, पण कोणत्याही देशाने हक्क न सांगितलेला जगातील हा एकमेव भुभाग! 

या परीसरात जायला इजिप्शियन लष्कराची परवानगी लागत असली तरी, इजिप्तने हा भाग आपल्या नकाशात कधीच दाखवलेला नाही. अत्यंत धाडस करून, इजिप्शियन लष्कराच्या ३ अटी मान्य करून (आणि नंतर त्या न पाळून) महाराज सुयशराव ७ नोव्हेंबरला २०१७ ला या जागी पोहोचले! 

आफ्रिकन पद्धतीनुसार एखाद्या राजाला जमीनीवर हक्क सांगायचा असेल, तर त्याने तिथे झाड लावले पाहिजे. सुयश दीक्षित या तरूणाने तिथल्या मातीत एक बी पेरले, त्यावर बरोबर नेलेल्या बाटलीतून पाणी घातले आणि ‘बिर तावील’ आपले झाले, असे जाहीर केले! 

सुयश दीक्षित राजे बनले! त्यांनी या पुरातन जागेचे नाव बदलून ‘किंगडम ऑफ दिक्षित’ असे ठेवले आणि आपला खास तयार करून घेतलेला झेंडाही तिथे रोवला! 

201103797 10220354824995926 7619253905966675471 n

‘अबू सिम्बेल’ या इजिप्तच्या दक्षिणेकडील टोकाच्या स्थानापासून दिडशे किलोमीटर दूरवर केलेला धाडसी प्रवास कामाला आला! इथे यायला इजिप्तचे लष्कर सहजासहजी परवानगी देत नाही. (मी अबू सिंबेल येथे गेलो असताना मी सुद्धा प्रयत्न केला होता). सुयश यांनी बऱ्याच लटपटी करून ती मिळवली आणि आपला देश स्थापन केला. मला तर हे सारे फार गमतीचे वाटते! 

सुयश दीक्षित यांच्या अगोदरही दोन जणांनी तिथे झेंडा लाऊन या प्रदेशावर आपला हक्क सांगितला होता. एखादा नवा देश स्थापन करणे, ही एक फार किचकट प्रक्रिया असते. आपण लाख स्थापन करू, पण इतरांनी तसे मानले पाहिजे ना! आंतरराष्ट्रीय नियमांनुसार हा प्रकार अधिकृत नाही. या नव्या देशाला कोणी मान्यता दिलेली नाही आणि कधी देणारही नाही! खुद्द सुयश महाराजांनाच ‘आपल्या’ देशात परत जाता येणे शक्य नाही! मोठी गंमतच आहे. पण हा काहीतरी भन्नाट प्रकार आहे! 

खुद्द सुयश दीक्षित म्हणतात, ‘जन्माला आलो तर काहीतरी अचाट करावे. जन्माला येऊन नंतर फक्त स्मशानात जायचे, एवढ्यावर जिंदगी संपवू नये’ 

मी सध्या आजूबाजूला कुठे ओसाड जमिन सापडते का, ते शोधतोय! तुम्हीही लागा कामाला!

  • रवि वाळेकर 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.