१९४८ च्या किन्जे रिपोर्टमुळेच पोरांच्या मनातले हस्तमैथुना बद्दलचे गैरसमज दूर झाले.

शाळेत असताना काही चावट पोरांनी मजा म्हणून माझ्या बॅगेत एक पुस्तक टाकलं होतं. ते पुस्तक एका सेक्सोलॉजिस्ट डॉक्टरने लिहिलं होतं, त्यात त्याने एक गोष्ट लिहिली होती. आधी गोष्ट सांगतो. डॉक्टर लिहितात,

एक 20 ते 21 वयाचा मुलगा त्यांच्याकडे आला. बिचारा खूप घाबरला होता. त्याने डॉक्टरांना आपली अडचण सांगितली. तो म्हणाला की आजकाल मी खूप हस्तमैथुन करतो. मला माहित आहे हे खूप चुकीचं आहे, असं करू नये. मला तुम्ही औषध द्या मी इथून पुढे हे वाईट काम करणार नाही.

डॉक्टर बिचारे चांगले असतात. ते त्याला समजून सांगतात की, हस्तमैथुन करणं काही वाईट नाही, तू म्हणतोयस तर मी तुला औषध देतो, पण तू असं काळजी करणं सोडून दे. त्यानंतर तो मुलगा जातो. थोड्या दिवसांनी त्या मुलाचे वडील डॉक्टरांना रस्त्यात भेटतात. डॉक्टर त्या मुलाच्या वडिलांना हात दाखवून विचारतात की, काय हो कसाय आता तुमचा मुलगा ? त्या मुलाचे वडील डोळयांत पाणी आणून म्हणतात,

त्याने आत्महत्या केली!

कारण काय होत ? तर हस्तमैथुनाची भीती. ही एवढी इंटेन्स गोष्ट वाचून मी हि तेव्हा घाबरलो. म्हंटल हस्तमैथुन इतकं का वाईट असतं ? काळाच्या ओघात विसरून गेलो पण नंतर एक पिक्चर पाहिला आणि समजलं हस्तमैथुन खरंच वाईट नसतं! फक्त त्याला धार्मिक रंग देऊन वाईट रंगात रंगवण्यात आलंय इतकंच. पण यावर सर्वात पहिला उजेड कोणी टाकला महिताय का ?

तर आल्फ्रेड किन्‍जे नावाच्या एका सद्गृहस्थाने! त्याचाच 2004 साली आलेला किन्‍जे नावाचा पिक्चर.

पण किन्‍जेनं काही लिहिण्याच्या आधी ची परिस्थिती काहीशी वेगळी होती. माणसाला बुद्धी असल्यामुळे जगातल्या प्रत्येक घटनेविषयी कुतूहल वाटायला लागलं. निसर्ग बोलत नसल्यामुळे माणसाने स्वतःचा तर्काने अंदाज बांधायला आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला सुरुवात केली. पण उत्तर बरोबर असेल असं नाही. त्याला पुराव्याची जोड असेल तर ते उत्तर बरोबर ठरतात.

आज वर हस्तमैथुन याविषयी जे काही लिहिलं गेलं ते कुतूहलापोटी आणि अंदाजाने मांडलेलं होतं. पुरुषाच्या शरीरातून निर्माण झालेला वीर्य नावाचा स्त्राव स्त्रीच्या योनीत पडला तर माणसासारखा नवीन माणूस जन्माला येतो हे जेव्हा माणसाला समजलं तेव्हा त्याला वीर्य म्हणजे अमोल स्त्राव असं वाटलं. आणि या घटनेपासून त्याला विर्याचा महत्त्व वाटायला लागलं.

त्यातूनच मग हस्तमैथुन करून वीर्य वाया घालवू नये ही त्याला कल्पना सुचली.

लैंगिकता हा विषय अश्लील आणि गोपनीय म्हंटला गेला. त्यावेळी विज्ञाननिष्ठ पुरावा मिळवणं शक्यच नव्हतं. पण 1948 मध्ये पहिल्यांदा हस्तमैथुन बाबतीत संशोधनात्मक पुरावा किन्‍जे रिपोर्ट द्वारा प्रकाशित करण्यात आला आणि त्यामुळेच खरं काय आणि खोटं काय ते कळू शकलं. किन्‍जेने जेव्हा स्वतः याचा अनुभव घेतला तेव्हा त्याला वाटलं की सेक्सच्या समाजात असणाऱ्या गैरसमजबाबत लिहिलं गेलंच पाहिजे.

किन्‍जेचा जन्म १८९४ साली अमेरिकेत एका अत्यंत पुराणमतवादी कुटुंबात झाला होता. सरंजामशाही वडिलांच्या छायेखाली आणि विनयशील आईच्या सावलीत, हा मुलगा वाढत होता. आल्फ्रेड किन्‍जे एक सेक्सोलॉजिस्ट होते. ती एकोणिसाव्या शतकाची सुरुवात होती. तेव्हाचा समाज अतिशय परंपरावादी होता. लोक चर्च आणि देवावर विश्वास ठेवत होते. विशेष म्हणजे चर्च आणि देव सेक्सवर विश्वास ठेवत नव्हते.

हा एक असा विषय होता, ज्याबद्दल अविवाहितच काय तर विवाहित लोक ही बोलायला घाबरत असतं. शास्त्रज्ञांसाठी अगदी डॉक्टरांसाठी, सेक्स हा अभ्यास नसून नैतिकतेचा विषय होता. गायनाकोलॉजिस्ट फक्त मूल जन्माला येण्याशी संबंधित अभ्यास करायचे सेक्स विषयी नाही. का ? तर म्हणे,

बायबलमध्ये लिहिल्या प्रमाणे, आनंदासाठी केलेला सेक्स पाप आहे. सेक्सचा उद्देश फक्त मूल जन्माला घालणं हाच असला पाहिजे.

पण इंडियाना यूनिवर्सिटी मध्ये काम करणाऱ्या किन्‍जे यांना हे काय पटलं नाही. त्यांनी या विषयात संशोधन करायचं ठरवलं. त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये चार हजार तरुणांच्या मुलाखती घेतल्या. हस्तमैथुन करणाऱ्यांची वयानुसार टक्केवारीच दिली.

त्या रिपोर्टनुसार अमेरिकेतील वयाच्या तेरा वर्षांपर्यंत बहुसंख्य मुलांना हस्तमैथुनाचे इच्छा नव्हती. या वयानंतर हस्तमैथुन करणाऱ्या मुलांचा प्रमाण वाढत गेले. चोविसाव्या वर्षी जास्तीत जास्त तरुण हस्तमैथुन करतात. त्यानंतर हे प्रमाण सावकाश कमी होत गेलं. तरीही वयाच्या चाळीसाव्या वर्षी 88.02 पुरुष हस्तमैथुन करताना आढळले. यावरून त्यांनी असा निष्कर्ष काढला की, जवळ जवळ सर्वच पुरुष कधी ना कधी हस्तमैथुन करतात.

1940 सालापर्यंत अमेरिकेच्या नौदल खात्यात उमेदवारांच्या निवडीबाबत एक नियम होता की, उमेदवार हस्तमैथुन करत असल्याच्या खुणा आढळल्यास त्याची निवड करू नये.

याचमुळे की काय, त्याकाळात किन्‍जे यांना लैंगिक शिक्षणाचा एक नवीन अभ्यासक्रम सुरू करायचा होता, ज्यात सेक्स आणि हस्तमैथुन संबंधित प्रश्न आणि कुतूहल यावर खुलेपणाने चर्चा करता येईल. पण तसं काही होऊ शकलं नाही म्हणून त्यांनी दोन पुस्तक लिहिली,

सेक्‍शुअल बिहेवियर इन ह्यूमन मेल आणि सेक्‍सुअल बिहेवियर इन ह्यूमन फीमेल

या पुस्तकांना तेव्हा विरोध झाला मात्र या पुस्तकांमुळे किन्‍जे रातोरात स्टार झाले. या पुस्तकांनी त्याकाळात अमेरिकेत विक्रमी खपाचे विक्रम आपल्या नावावर केले. अमेरिका अक्षरशः दिवाणी झाली होती या पुस्तकाच्या मागे. आणि यातूनच मग ठरवलं गेलं की हस्तमैथुन वाईट नाहीये, ते वाईट नव्हतंच कधी!

Leave A Reply

Your email address will not be published.