त्या निवडणुकीत सोमय्या यांच्या कारकिर्दीला ब्रेक लागला आणि ते कट्टर शिवसेना विरोधक बनले
२०१७ ची मुंबई महानगरपालिका निवडणूक. १९८९ पासून शिवसेनबरोबर युतीत राहून कायम लहान भावाची भूमिका स्वीकरणाऱ्या भाजपचा आता राज्यात मुख्यमंत्री बसला होता. युतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचं आता भाजपाला देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत देखील दाखवून द्यायचं होतं. मात्र १९८५ पासून मुंबईत आपला महापौर बसणारी सेना कोणत्याही परिस्तिथीत महापौर सोडणं शक्य नव्हतं. त्यामुळे दिल्लीपासून सत्तेत असलेल्या भाजपने मुंबईत सेनेशी असलेली युती तोडत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.
मात्र या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सेनेच्या विरोधात केलेला प्रचार एका नेत्याच्या चांगलाच अंगलट येणार होता आणि ते नाव म्हणजे किरीट सोमय्या.
२०१७ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तुटलेली शिवसेना भाजप युतीत कायम राहिली मात्र त्यानंतर झालेल्या एक महत्वाच्या निवडणुकीत किरीट सोमय्या यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा सेटबॅक बसला.
किरीट सोमय्या सध्या नेहमीप्रमाणे चर्चेत आले आहेत ते त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे. यावेळी त्यांच्या टार्गेटवर आहेत ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर. किशोरी पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याचा आरोप आता किरीट सोमय्या यांनी केला आहे.
याआधी अनिल परब, रवींद्र वायकर, संजय राऊत या आता ठाकरे गटात असलेल्या नेत्यांवरही किरीट सोमय्या यांनी असे आरोप केले होते. त्याचबरोबर आता शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपबरोबर गेलेले प्रताप सरनाईक, भावना गवळी, यामिनी जाधव, यशवंत जाधव यांच्यावरही हे नेतेमंडळी फुटीच्या आधीच्या शिवसेनेत असताना आरोप केले होते.
एवढाच नाही तर किरीट सोमय्या यांनी अलिबागच्या येथील बंगल्यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं.
किरीट सोमयांचा शिवसेनेवर एवढा राग असल्याचं कारण शिवसेनेचा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लावण्यात असलॆला सहभाग सांगितलं जात आहे. यासाठी आपल्याला पुन्हा २०१७च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे जावं लागेल. २०१७च्या त्या निवडणुकीत भाजपाला जरी मुंबईची सत्ता मिळवता आली नसली तरी २०१२ मध्ये असणारा ३० नगरसेवकांचा आकडा भाजपने या २०१७च्या निवडणुकीत ८२ वर नेऊन ठेवला होता.
८४ नगरसेवक निवडून आणणाऱ्या सेनेपेक्षा भाजपाला दोनच जागा जास्त मिळाल्या होत्या. मेन म्हणेज भाजप तेव्हा इतर पक्षातील नगरसेवकांच्या साह्याने आपला महापौर देखील बसवू शकली असती. मात्र सेनेने राज्यात असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी दिल्यामुळे भाजपने मुंबईवर सेनेचा महापौर होऊ दिला. त्यामुळे या जुन्या पक्षांत पुन्हा दिलजमाई झाल्याचं चित्र निर्माण झालं.
मात्र या निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या आरोप -प्रत्यारोप किरीट सोमैयांच्या चांगलेच अंगलट आले.
सेनेने मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा मुद्दा भाजपने लावून धरला होता. यामध्ये सगळ्यात आघाडीवर होते किरीट सोमय्या. शिवसेनेवर आरोप करताना किरीट सोमय्या यांनी थेट मातोश्रीवर हल्ला चढवला होता. मुंबई महापालिकेत टक्केवारी घेतल्याशिवाय कोणतेही काम दिलं जात नाही आणि वांद्र्यांच्या साहेबांना टक्केवारी जाते असा थेट आरोप त्यावेळी उद्धव ठाकरेंवर केला होता. पहिल्यांदाच थेट ठाकरेंवर आरोप झाल्याने त्यावेळी शिवसैनिक चांगलेच संतापले होते.
तसेच त्यांनी वांद्र्याच्या माफिया असा घणाघाती आरोप थेट उद्धव ठाकरेंवरच असल्याचा बोललं गेलं आणि त्यामुळेही शिवसेना विरुद्ध सोमय्या या वाद आणखीनच चिघळला.
आणि सेनेने युतीत राहंण्याचा निर्णय घेतल्यानंतरही सोमयांनी केलेले आरोप मात्र सेना विसरली नव्हती आणि याचा वचपा काढायची संधी मिळाली ती २०१९च्या लोकसभा निवडणुकीत. २०१९ ची निवडणूक सोमय्यांसाठी अतिशय महत्वाची होती. केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर किरीट सोमय्यांना २०१४च्या मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची अपेक्षा होती. मात्र संपूर्ण पाच वर्षात अनेकदा त्यांचं नाव चर्चेत येऊनही मंत्रिपद त्यांचा वाट्याला आलं नाही.
त्यातच किरीट सोमय्यांची राजकीय कारकीर्द पहिली तर त्यांची मंत्रिपदाची दावेदारी अजूनच मजबूत होत होती.
1975 च्या जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. पुढे 1991 साली ते मुलुंड मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने विधानसभेवर निवडून गेले. पुढे 1999 साली पक्षाने त्यांना ईशान्य मुंबई मतदारसंघातून लोकसभेतं तिकीट दिलं आणि इथंही काँग्रेसचे दिग्गज नेते गुरुदास कामत यांचा पराभव करत सोमय्या खासदार झाले. त्याचबरोबर व्यवसायाने सीए असणाऱ्या किरीट सोमय्या यांनी त्यांच्या सभागृहातील कामगिरीच्या जीवावर एक अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी प्रतिमाही निर्माण केली होती.
२००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला.
तरीही सुरवातीपासूनच ते अनेक छोटे मोठे घोटाळे बाहेर काढत सोमय्या चर्चेत राहिलेच. यूपीए सरकारच्या काळात भाजपने भ्रष्टाचारविरोधात स्कॅम एक्सपोज कमिटी स्थापन केली होती. किरीट सोमय्या त्या समितीचे राष्ट्रीय संयोजक होते. त्यावेळी त्यांनी देशातल्या जवळपास 16 राज्यातल्या 100 जिल्ह्यांमध्ये फिरून काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या भ्रष्टाचाराविरोधात जोरदार प्रचार केला होता.
पुढे २०१४च्या निवडणुकीत मोदी लाटेत सोमय्या यांनी पुन्हा कमबॅक केला आणि लोकसभेत दुसऱ्यांदा खासदार म्हणून पोहचेल होते मात्र मंत्रिपद काय मिळालं नाही. त्यांच्याऐवजी पियुष गोयल यांनी बाजी मारल्याचं बोललं गेलं. आता पुन्हा आपली दावेदारी सादर करून मंत्रिपद मिळवण्यासाठी किरीट सोमय्यांना २०१९ची निवडणूक महत्वाची होती. मोदींची जादू कायम असल्याने आणि मतदारसंघात सेना भाजप युतीच्याच आमदारांचं वर्चस्व असल्याने सोमय्या यांचा ईशान्य मुंबईतील मतदारसंघ आता अगदी सोपा झाला होता.
मात्र यावेळी सेनेनं आपला बदला घेण्याचा निर्णय घेतला.
ईशान्य मुंबईतून सोमय्या यांना तिकीट देण्यास शिवसैनिकांनी जोरदार विरोध केला. शिवसैनिकांचा जोरदार विरोध असल्याने किरीट सोमय्या यांनी मातोश्रीवरून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना भेट नाकारली.सोमय्या यांच्या फोन, मेसेज अशा कोणत्याही गोष्टींना मातोश्रीकडून प्रतिसाद दिला गेला नाही.
त्यातच जर किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिली तर अपक्ष म्हणून लढण्याची धमकी सेनेचे आमदार सुनील राऊत यांनी दिली होती. सुनील राऊत हे शिवसेना आमदार संजय राऊत यांचे भाऊ.
त्यातच ईशान्य मतदारसंघात येणाऱ्या भांडुप आणि विक्रोळी हे दोन्ही मतदारसंघांबरोबरच संपूर्ण मतदारसंघातच सेनेची ताकद होती. अशावेळी सेनेचा विरोध डावलून किरीट सोमय्यांना तिकीट देणं भाजपासाठी अतिशय रिस्की होतं. त्यामुळे ऐन टायमाला किरीट सोमय्या यांचा पत्ता काटत भाजपने मुलुंडचे नगरसेवक मनोज कोटक यांना उमेदवारी दिली.
मनोज कोटक २ लाखांच्यापेक्षा जास्त मतांनी विजयी झाले यावरून किती सुरक्षित मतदारसंघ कारकिर्दीच्या अगदी मोक्याच्या क्षणी किरीट सोमय्यांना सोडावा लागल्याची आयडिया येते. त्यानंतर भाजपकडूनही किरीट सोमय्यांचं राज्यसभेत किंवा विधानपरिषदेतही पुनर्वसन झालं नाही. तेव्हा जो सोमय्यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला तो अजूनही कायम आहे.
हे ही वाच भिडू :
- या गोष्टींमुळे संजय राऊत बाळासाहेब ते उद्धव ठाकरेंचे खास होऊ शकले..
- बाळासाहेबांनी एका नजरेत ओळखलं होतं, राज ठाकरेंचा राजीनामा संजय राऊतांनी लिहिलाय…