UPA काळात सोमय्यांनी देशातील १६ राज्यांमध्ये फिरून घोटाळ्यांचे आरोप केले होते
भाजप नेते किरीट सोमय्या हे मागच्या काही दिवसांपासून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप करत आहेत. याआधी सोमय्या यांनी माजी मंत्री अनिल देशमुख, सध्याचे मंत्री अजित पवार, अनिल परब, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, खासदार भावना गवळी या महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
त्यामुळे सोमय्या यांची राज्यभर भ्रष्टाचार बाहेर काढणारे नेते अशी ओळखलं बनली आहे. मात्र सोमय्या यांची हि ओळख नवीन नाही. युपीए सरकारच्या काळात तर त्यांची देशभर भ्रष्टाचार खणून काढणारे नेते अशी ओळख निर्माण झाली होती. कारण त्यावेळी त्यांनी देशातील तब्बल १६ राज्यातील १०० जिल्यांमध्ये जाऊन काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांविरोधात भ्रष्टाचारांच्या आरोपांनी राळ उठवली होती.
कारण त्यावेळी सोमय्या हे भाजपच्या स्कॅम एक्सपोसिंग कमिटीचे राष्ट्रीय संयोजक होते.
त्याच झालेलं असं कि, युपीए सरकारच्या काळात भाजप काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांविरोधात अधिक आक्रमक झाली होती. त्यातून भाजपने सरकारचे भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी स्कॅम एक्सपोज कमिटी स्थापन केली होती. किरीट सोमय्या यांना त्या समितीचे राष्ट्रीय संयोजक बनवले होते. त्यावेळी त्यांनी देशातल्या जवळपास १६ राज्यातल्या १०० जिल्ह्यांमध्ये फिरून काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या भ्रष्टाचाराविरोधात राळ उठवली होती.
यात किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्र सदन घोटाळा, अजित पवार आणि सुनिल तटकरे यांना अडचणीत आणणारा सिंचन घोटाळा, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) मधील घोटाळा, अशोक चव्हाण यांचं मुख्यमंत्री पद घालवणारा आदर्श घोटाळा असे काही महाराष्ट्रातील घोटाळ्यांबद्दल सोमय्या यांनी आरोप केले होते.
यापुढे जाऊन त्यांनी सिंचन घोटाळ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका पण दाखल केली होती.
तर गोव्यासारख्या राज्यात देखील सोमय्या यांच्या आरोपांनी राजकारण ढवळून निघालं होतं. २०११ मध्ये किरीट सोमय्या यांनी तत्कालीन गोव्यामध्ये देशातील सगळ्यात मोठा खाण घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता. तब्बल २५ हजार कोटींचा घोटाळा अवघ्या २ वर्षात केला असल्याचा आरोप भाजप आणि सोमय्या यांनी केला होता.
२००७ मध्ये महाराष्ट्र सरकारचा गहू घोटाळा बाहेर काढला होता.
२००७ मध्ये किरीट सोमय्या यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारचा गहू घोटाळा बाहेर काढला होता. रेशनींगवर मिळणारा लाल गहू अत्यंत खालच्या दर्जाचा असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. पुढे ते केवळ आरोप करून थांबले नव्हते तर जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांनी त्या गव्हाचे नमुने गोळा केले आणि त्याबाबत मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर आयोगाने या गव्हाची प्रयोगशाळेत चाचणी करून संबंधित गहू माणसाला खाण्यास योग्य नसल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे संपूर्ण राज्यातून हा लाल गहू मागे घेण्याची नामुष्की तत्कालीन सरकारवर ओढावली होती.
एकूणच काय तर सोमय्या यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणं ते प्रकरण लावून धरणे याबाबतचा अनुभव बराच जुना आहे. त्यामुळे आता सोमय्या हसन मुश्रीफ यांच्याबाबतच्या नव्या प्रकरणात पुढे नेमके काय करतात हे बघणे महत्वाचे आहे. सोबतच सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील आव्हान दिले आहे.
हे हि वाच भिडू