किरीट सोमय्या यांचे १० आरोप जे पुढे कुठेच टिकले नाहीत…

किरीट सोमय्या. मुंबईमधील भाजपचे माजी खासदार. पक्षाचा सतत चर्चेत राहणारा चेहरा. ते चर्चेत असतात त्याच कारण म्हणजे जे भल्या भल्या राजकारण्यांना जमत नाही अशी गोष्ट ते सहज शक्य करून दाखवतात. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांवर थेट आणि एखाद्या नेत्याचं नाव घेऊन आरोप करायचं असेल तर ती कामगिरी किरीट सोमय्या यांच्यावर सोपवली जाते.

मात्र सोमय्यांच्या बाबतीत एक गोष्ट राजकीय विश्लेषक अगदी बिनदिक्कत पणे सांगतात. ती गोष्ट म्हणजे सोमय्यांना यातले आरोप सिद्ध करता येत नाहीत. मागच्या काही वर्षातील त्यांचे आरोप बघितल्यास असचं काहीस दिसून येतं.

पाहुयात किरीट सोमय्यांनी केलेले १० मोठे आरोप आणि त्यांचं पुढे काय झालं ?

टँकर घोटाळा :

२०१६ मध्ये मुंबईत ५०० कोटींचा टँकर घोटाळा झाला आहे असं म्हणतं सोमय्यांनी आरोपांची राळ उठवली होती. मुंबईत दररोज १ कोटी लिटर पाणी पुरवठा होतो, पण त्यातलं जवळपास ९० लाख लिटर पाण्याचा घोटाळा होतो असं त्यांनी म्हंटलं होतं.

विशेष म्हणजे त्यावेळी महानगरपालिकेमध्ये शिवसेना – भाजप या दोघांची सत्ता होती. पुढे या आरोपात काहीच झालं नसल्याचं दिसून आलं होतं.

मुलुंड डम्पिंग ग्राउंड :

२०१७ मध्ये मुलुंड डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी महानगरपालिकेनं हालचाल सुरु केली. मात्र हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आकृती बिल्डरसोबत किती कोटींमध्ये सेटिंग केली असा आरोप सोमय्यांनी केला होता.

मात्र प्रत्यक्षात शहरातील डम्पिंग ग्राउंड टप्प्या टप्प्यानं बंद करण्याबाबत महापालिका आयुक्तांनी न्यायालयात निवेदन दिलं होतं.

वाधवान बंधू – शरद पवार संबंध :

एप्रिल २०२० मध्ये देशभरात अत्यंत कडक लॉकडाऊन सुरु असताना गृहविभाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या (डीएचएफएल) वाधवान बंधूंना खंडाळ्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत केली होती. वाधवान बंधूंचा उल्लेख ‘माझे फॅमिली फ्रेंड’ असा करत अमिताभ गुप्ता यांनी वाधवान यांच्या पाच गाड्यांसाठी खंडाळा ते महाबळेश्वर अशा प्रवासाचा विशेष पास जारी केला होता.

हाच मुद्दा पकडत शरद पवार आणि वाधवान कुटुंबियांचे संबंध जगजाहीर आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या पाठिंब्याशिवाय त्यांना पत्र मिलन अशक्य असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.

मात्र हे पत्र देताना आपल्यास कोणीही गळ घातली नव्हती किंवा दबाव टाकला नव्हता अशी माहिती खुद्द अमिताभ गुप्ता यांनी चौकशी दरम्यान दिली होती.

वांद्रे येथील गर्दी पूर्वनियोजित होती :

मागच्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान १४ एप्रिलला वांद्रे स्थानकावर अचानक हजारोंच्या संख्येने परराज्यातील कामगारांनी एकत्र येत आपल्या घरी जाऊन देण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चा झाली होती.

पण ही घटना पूर्वनियोजित असल्याचा सोमय्या यांनी केला होता. तसचं काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने या लोकांना एकत्र आणलं होतं का? असा सवाल देखील त्यांनी विचारला होता.

मात्र प्रकरणातील या खटल्यातील ११ साक्षीदारांची निवेदने, तक्रारदार आणि वांद्रे स्थानकाबाहेर जमलेल्या लोकांची चौकशी आणि तपास केल्यानंतर, साक्षीदारांनी विशेष रेल्वेगाडय़ा सुटणार, असे ऐकले होते त्यामुळे आम्ही गर्दी केली असा कबुली जबाब दिला होता. यात कुठेही या तीन पक्षांचा सहभाग असल्याचं सिद्ध झालं नव्हतं.

जमीन घोटाळा :

नोव्हेंबर २०२०मध्ये किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे आणि अन्वय नाईक कुटुंबासोबत जमिनीचे व्यवहार झाल्याचा आरोप केला होता.

यावर खुद्द अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी उत्तर देत या आरोपातील हवा काढून टाकली होती. त्या म्हणाल्या होत्या, त्यामध्ये गुपीत असं काहीच नाही. त्यांनी आमच्याकडून जागा विकत घेतली आणि आम्ही ती त्यांना दिली.

सोमय्या जे सातबारे दाखवत आहे, ती खुली कागदपत्रं असतात. महाभूमीच्या वेबसाईटवर ते कोणालाही पाहता येईल. हा संपूर्ण योग्य मार्गाने व्यवहार झाला आहे असं नाईक यांनी स्पष्ट केलं होतं.

शपथविधीनंतर ३४५ कोटी गिफ्ट दिले :

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ३४५ कोटी बिल्डरला गिफ्ट दिले असा आरोप सोमय्या यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये पत्रकार परिषदेत केला होता. ठाकरे सरकार म्हणजे रिअल इस्टेटमध्ये भूखंडाचं श्रीखंड करण्यात गुंतलेलं सरकार दिसत असल्याचं ते म्हणाले होते.

जी जमीन २ कोटी ५५ लाखांत अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली ती ९०० कोटीत विकत घेण्यासाठी मुंबई महापालिका निघाली आहे. यामधील ३५४ कोटी आधीच देऊ केले आहेत असा आरोप त्यांनी केला होता. मात्र या आरोपांबद्दल आता ते बोलताना देखील दिसत नाहीत.

ठाण्यात ५ हजार कोटींचा घोटाळा :

ठाणे शहरातील १ हजार ६२० खाटा रिकाम्या असल्या तरी आणखी ३ हजार १४४ बेडची रुग्णालये उभारली जात असल्याचा आरोप सोमय्यांनी डिसेंबर २०२० मध्ये केला होता. हे केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी नव्या रुग्णालयांचा घाट घातला जात असल्याचे ते म्हणाले होते. त्यामुळे  हा महाविकास आघाडी सरकाच्या काळातील ५ हजार कोटींचा घोटाळा असल्याच त्यांचं म्हणणं होतं.

मात्र या आरोपाबद्दल त्यांनी पुढे कुठेही पाठपुरावा केला नसल्याच दिसून आलं. ज्या वेगानं हे आरोप झाले त्याच वेगानं ते शांत देखील झाले.

धनंजय मुंडे प्रकरण :

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर त्यात किरीट सोमय्या यांनी देखील उडी घेतली.

त्यांनी महिलेच्या तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि धनंजय मुंडेंवर थेट बलात्काराचा आरोप केला. तसचं जो पर्यंत या आरोपांची चौकशी होतं नाही तोपर्यंत त्यांनी पदापासून लांब राहावं अशी देखील मागणी माध्यमांमधून केली होती.

मात्र अवघ्या ४ दिवसांमध्ये संबंधित महिलेनं हे सगळे आरोप मागे घेतले होते.

जमीन निवडणूक आयोगाकडे तक्रार :

जी मालमत्ता नाईक कुटुंबियांकडून ठाकरेंनी खरेदी केली होती, ती मालमत्ता त्यांनी विधानपरिषद शपथपत्रात दाखवली नसल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्यावर त्यांनी २८ जानेवारी २०२१ रोजी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिल्लीत भेट घेत तक्रार दाखल केली होती.

मात्र निवडणूक आयोगाकडून याबाबत अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नसल्याचं दिसून येत आहे.

कोरोना काळात १२ हजार कोटींचा घोटाळा :

किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कोरोना काळात १२ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ऑक्टोबरमध्ये केला होता. ते म्हणाले होते की, कोविड काळात ५ हजार बेड्सचं रुग्णालय उभं करण्याच्या नावाखाली स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर हा घोटाळा झाला आहे.

त्यांच्या सांगण्यावरूनच महानगरपालिका आयुक्तांनी ७२ तासांच्या आत एका खाजगी बिल्डराची ५०० – ७०० कोटींची जागा ३००० कोटींमध्ये विकत घेण्याचा प्रस्ताव पास केला. तसंच रुग्णालय उभं करण्यासाठी ७ हजार कोटी, जमिनीसाठी ३ हजार कोटी तर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी २ हजार कोटी मंजूर केले गेले. पण हे सगळं करताना कसलीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही.

मात्र त्यानंतर सोमय्या म्हणाले होते की, त्यांच्या या आक्षेपानंतरच हा प्रस्ताव थांबवला गेला. तसचं या आरोपावर त्यांनी कोणताही पाठपुरावा केला नसल्याचं दिसून आलं.

हे हि वाच भिडू. 

1 Comment
  1. Swapnil says

    Thodkya kay tar Kirit Somayya Chutiya Aahe.

Leave A Reply

Your email address will not be published.