किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर असलेले महाविकास आघाडीचे ११ नेते…

भाजपचे नेते किरीट सोमय्या. भ्रष्टाचार खणून काढणारे आणि विरोधकांवर तुटून पडणारे नेते अशी त्यांची ओळख. याच ओळखीप्रमाणे ते मागच्या काही काळापासून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर सातत्याने वेगवेगळे आरोप करत त्यांना घाईला आणत आहेत. आता आज तर यापुढे जात त्यांनी महाविकास आघाडीमधील ११ नेत्यांची नावच जाहीर केली आहेत.

यानुसार त्यांनी सरकारमधील ११ नेत्यांना टार्गेट ठेवलं आहे.

याला त्यांनी ‘ठाकरे सरकार कि महान इलेव्हन’ असं नाव दिले आहे

मात्र या ११ नेत्यांवर नेमके आरोप काय आहेत?

१. आमदार प्रताप सरनाईक : 

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कथित टॉप सिक्युरीटी घोटाळ्याप्रकरणी सध्या आरोप आहेत. यामध्येच त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मागे सध्या ईडी चौकशीचा ससेमिरा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने त्यांच्या घरावर धाड टाकली होती.  यासगळ्या आरोपांमागे किरीट सोमय्याच होते. ते सातत्यानं पत्रकार परिषद घेऊन सरनाईक यांच्यावर हल्ला चढवत होते.

त्यानंतर एका मुलाखतीमध्ये बोलताना आमदार सरनाईक म्हणाले होते, किरीट सोमय्या यांच्याबद्दल माझे खुप चांगले मत होते, आदर होता, पण माझ्यावर त्यांनी आरोप केले, त्यानंतर माझ्या २ अँन्जोप्लास्टी झाल्या. अनेक प्रॉब्लेम आले. माझ्या घरच्यांवर अनेक संकटं आली. अशावेळी त्यांनी आरोप करणे थांबवले पाहिजे होते, पण ते मी प्रॉब्लेममध्ये बघून अजून आरोप करत राहिले, त्यांनी थोडी तरी माणुसकी दाखवायला हवी होती.

२. माजी गृहमंत्री अनिल देशमुख : 

सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. १०० कोटी वसुलीच्या आरोपांप्रकरणात ईडीने त्यांना ५ समन्स बजावलं आहे. मात्र ते उपस्थित राहिले नाहीत. कारवाई टाळण्यासाठी त्यांनी आधी उच्च आणि आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मात्र जर सर्वोच्च न्यायालयाने देशमुख यांना दिलासा मिळाला नाही, तर ईडी त्यांना कोणत्याही क्षणी अटक करू शकते. याआधी त्यांच्या दोन्ही खाजगी सचिवांना अटक होऊन त्यांच्यावर चार्जशीट दाखल झालेली आहे. या आरोपांमागे आणि त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी देखील सोमय्याच होते.

३. परिवहन मंत्री अनिल परब :

परिवहन मंत्री अनिल परब यांना नुकतीच ईडीची नोटीस आली आहे. मंगळवारी त्यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सचिन वाझे याने पत्रात अनिल परब यांनी SBUT ट्रस्ट आणि मुंबई महापालिकेतील काही कॉट्रॅक्टर्स यांच्याकडून खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा दावा केला आहे. सोबतच अवैध रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्यावर आरोप झालेत.

अशातच अनिल परब यांनी राणे यांना अटक करण्यासाठी आदेश दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळेच स्वतः राणे यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये परब यांच्याविरोधात स्वतः तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितले आहे.

४. खासदार भावना गवळी : 

जपा नेते किरीट सोमय्या यांनी वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.

गवळी यांनी खासदारकीच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल १०० कोटींचा घोटाळा आहे. त्याबद्दलचे आपल्याकडे सबळ पुरावे असून ईडी, सीबीआय, सहकार मंत्री, आयकर विभाग यांसह अन्य ठिकाणी तक्रारी करण्यात आली आहे असं देखील सोमय्या यांनी सांगितले होते. त्यानंतर आता आज भावना गवळी यांच्या ५ कंपन्यांवर ईडीने छापे टाकले आहेत.

५. महापौर किशोरी पेडणेकर : 

किरीट सोमय्या यांच्या आरोपांनुसार, किशोरी पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील लाभार्थी नसतानाही एसआरए प्रकल्पाच्या इमारतीतील अनेक सदनिका बेकायदेशीररीत्या बाळगल्या. इतकेच नव्हे, तर अशा निवासी सदनिकांमध्ये व्यावसायिक कामे करण्यास परवानगी नसतानाही त्या सदनिकांच्या पत्त्यांवरच आठ कंपन्या स्थापन केल्या. पदाचा दुरुपयोग करून या कंपन्यांना मुंबई महापालिकेची कंत्राटेही मिळवून दिली, असाही आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल केली आहे.

६. आमदार रवींद्र वायकर : 

अलिबाग मधील कोलई गावात अन्वय नाईक यांच्याकडून ३० जमिनीचे करार करण्यात आले. जमिनीचे करार, ग्रामपंचायतमध्ये केलेले अर्ज, रजिस्ट्रेशन, त्यांच्यावरील १९ बंगले याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ही सर्व माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवण्यात आली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

१९ बंगल्यांची प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी रविंद्र वायकर यांच्या पत्नीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाची कागदपत्र सादर करण्यात आली आहेत. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये काहीही उल्लेख केलेला नाही. या प्रॉपर्टी बाबत रवींद्र वायकर आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.

७. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड :

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील किरीट सोमय्या यांनी आरोप केले आहेत. मागच्या महिन्यात सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले होते. आव्हाडांनी माहिती अधिकार कार्यकर्ता प्रवीण कलमे याच्या मदतीने वसुलीचा धंदा मांडला होता. कलमे हा आव्हाडांचा सचिन वाझे आहे असे आरोप सोमय्या यांनी केले आहेत. त्यामुळे सोमय्या यांचे पुढचे टार्गेट जितेंद्र आव्हाड असणार हे नक्की. 

८. छगन भुजबळ : 

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाच्या कथित गैरव्यवहारप्रकरणात छगन भुजबळ तुरुंगात गेले. सुमारे दोन वर्षं ते तुरुंगात होते. मात्र पुढे ते जामिनावर बाहेर आणि निवडणूक जिंकत राज्याचे मंत्री देखील झाले. मात्र मनी लाँडरिंग प्रकणात ईडीने त्यांची चौकशी केली आहे. ईडीला महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील पैसे या इमारतीच्या खरेदीसाठी वापरला असल्याचा संशय होता.

अशातच आता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या दाव्यानुसार आयकर विभागाने मरीनड्राइव्हच्या अल-जबेरिया कोर्ट ही इमारत बेहिशोबी मालमत्ता म्हणून सील केली आहे. या इमारतीची बाजार भावानुसार किंमत १०० कोटी आहे. त्यामुळे आता त्यांच्यावरील कारवाईला देखील गती येण्याची शक्यता आहे.

९ & १० . आमदार यामिनी जाधव आणि यशवंत जाधव :

भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांची आमदारकी सध्या धोक्यात आहे. यामिनी जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील काही माहितीवर आयकर विभागाने संशय व्यक्त केला आहे. कर्ज प्रकरणातील अनियमिततेवर बोट ठेवत आयकरने मनी लाँडरिंगचा मुद्दाही उपस्थित केला आहे. सोबतच यामिनी जाधव यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आयकर विभागाने केली आहे.

याच प्रकरणी किरीट सोमय्या यांनी आमदार यामिनी जाधव आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी केली आहे. संपत्तीत अपारदर्शक आवक, हवाला व्यवहार, मध्यपूर्व देशातील काही कंपन्यांच्या सोबतचे आर्थिक व्यवहार आढळून येत आहेत. हे संपूर्ण व्यवहार संशयास्पद असल्याने त्याची चौकशी होणे आवश्यक आहे, असं सोमय्यांनी म्हटले होते.

११. मिलिंद नार्वेकर : 

मिलिंद नार्वेकर यांच्याशी संबंधित अनधिकृत बंगला प्रकरण गेले काही दिवस गाजत होतं.  रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात मुरुड मध्ये हा बंगला होता. किरीट सोमय्या यांनी याबाबत प्रशासन तसंच केंद्राकडेही वारंवार तक्रार केली होती. त्यानंतर सोमय्या यांनी गेल्या या परिसरात येऊन प्रशसनाला इशारा दिला होता. आठवडाभरात हे अनधिकृत बांधकाम तोडलं नाही तर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. 

त्यानंतर मागच्याच आठड्यामध्ये हा बंगला पाडण्यात आला आहे. मात्र अजूनही त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सोडला नाही. बंगला अनधिकृत होता तर नार्वेकर यांच्यावर गुन्हा का दाखल नाही? असा सवाल त्यांनी विचारला होता.

सध्या किरीट सोमय्या यांच्या यादीतील ४ जणांच्या पाठीमागे चौकश्यांचा ससेमिरा चालू झाला आहे. मात्र आता इतर ७ जणांच्या आरोपांचा पाठपुरावा सोमय्या करणार का? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.