आणि म्हणून सातारच्या ब्रिटीश कलेक्टरनी स्टेशनचं नाव बदलून ‘किर्लोस्करवाडी’ केलं.

लक्ष्मणराव किर्लोस्कर म्हणजे महाराष्ट्राच्या अभियांत्रीकीचे महर्षीच. त्यांचा बेळगाव जवळचा कारखाना ब्रिटीश सरकारच्या लाल फितीत अडकला आणि बाळासाहेब पंतप्रतिनिधींच्या इच्छेखातर औंध संस्थानमध्ये आपला नांगराचा कारखाना हलवला.  ‘कुंडल रोड नावाच्या रेल्वेस्टेशन जवळील माळावर एक अख्खं इंडस्ट्रीयल गाव उभारलं. नाव दिल किर्लोस्करवाडी.

किर्लोस्करवाडी खऱ्या अर्थानं भारताची मेक इन इंडिया होती. या बोल भिडूच्या कथेत आपण ही संपूर्ण गोष्ट वाचला असालच. पंतप्रतिनिधींनी दिलेले दहा हजार रुपये व पन्नास कर्मचारी यांच्या जीवावर हा कारखाना सुरु झाला. पहिला भारतीय लोखंडाच्या नांगराचा कारखाना तर तिथे बनलाच पण पाठोपाठ भारतातला पहिला सबमर्सिबल पंप, पहिल डिझेल इंजिन, पहिले इलेक्ट्रिक इंजिन असे अनेक प्रयोग केले जाऊ लागले.

कुंडल रोडच्या स्टेशनवरून देशभरात किर्लोस्करवाडीचे प्रोडक्टस पाठवले जाऊ लागले. 

अनेक प्रवाश्यांनी या स्टेशनचे नाव बदलून किर्लोस्करवाडी ठेवा अशी रेल्वेकडे तशी मागणी केली होती. खुद्द लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी देखील पण शासनदरबारी तसा विनंतीअर्ज पाठवला होता. पण इंग्रजांच्या रेल्वे खात्याने त्याकडे दुलर्क्ष केले होते.

साताऱ्याचे ब्रिटीश कलेक्टर मॉयसे हे लक्ष्मणराव किर्लोस्करांचे चाहते होते. त्यांनी सुरु केलेले प्रयोग मोयसे साहेबाना खूप आवडायचे. पारतन्त्र्यात असूनही एक भारतीय तरुण मर्यादित साधनसंपत्तीमधूनही एवढा मोठा उद्योगसमूह उभा करत आहे याच त्यांना कौतुकच होतं.

निवृत्ती पूर्वी एकदा ते किर्लोस्करवाडीच्या भेटीला आले. सगळे कारखाने पाहून घेतले. आपल्या शंका विचारल्या आवश्यक तो सल्ला दिला.कलेक्टरसाहेब परत सातारला जायला निघाले. निघण्यापूर्वी त्यांनी लक्ष्मणराव किर्लोस्करांना सांगितले,

“आता रिटायरमेंटनंतर मी इंग्लंडला माझ्या गावी जाणार. त्याआधी आपल्यासाठी करता येण्याजोगे काही काम असेल तर सांगा. मी आनंदाने करेन. “

लक्ष्मणरावांनी त्यांचे केवळ आभार मानले. ते म्हणाले,

 “देवदयेने सगळे व्यवस्थित चालले आहे. तुमच्या शुभेच्छा आमच्या साठी बस आहेत.”

कलेक्टरसाहेब खुश झाले. लक्ष्मणराव हे एक यशस्वी उद्योजक नसून एक प्रामाणिक व्यक्ती आहेत याची त्यांना खात्री पटली. त्यांना स्वतःला किर्लोस्करांची एक मदत हवी होती.

झालं असं होतं की बऱ्याच वर्षांपासून राजबा नावाचा एक बटलर म्हणजेच खाजगी सहायक त्यांच्याकडे कामाला होता.  मॉयसेसाहेबांना लागेल ती सगळी मदत तो करायचा. त्याच्याशिवाय त्याचं पान देखील हलायचं नाही, अशा या राजबाच काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्याची बायको आणि पाच मुलं यांचा सांभाळ कोण करणार याची काळजी कलेक्टरसाहेबाना लागली होती.

लक्ष्मणराव किर्लोस्करांनी आनंदाने त्यांची जबाबदारी घेतली. मॉयसेसाहेबांनी मूले मोठी होईपर्यंत त्यांच्या खर्चासाठी लंडनवरून चेक पाठवण्याची व्यवस्था करेन असंही सांगितलं. मात्र लक्ष्मणराव त्यासाठी तयार झाले नाहीत. ते म्हणाले,

” कोणताही चेक नको, आम्ही त्यांचा सांभाळ करू आपण चिंता करू नका. “

मॉयसे साहेब तरी त्यांना विचारत राहिले की किर्लोस्करवाडी साठी कोणती मदत करता येईल ते सांगा. अखेर लक्ष्मणरावांचा एक सहकारी त्यांना म्हणाला,

“आमच्या किर्लोस्करवाडीसाठी काही तरी करायची एवढीच तुमची इच्छा असेल तर तुम्ही एक करू शकता. इथल्या स्टेशनच नाव कुंडल रोड बदलून ते किर्लोस्करवाडी करण्याची व्यवस्था करावी. “

मॉयसे साहेब हसले, बस एवढी छोटीशी गोष्ट, काही हरकत नाही. आणि काही दिवसांनी  रेल्वे खात्याने खरोखर स्टेशनवरील जुने नाव पुसून तिच्यावर किर्लोस्करवाडी असे रंगवले गेले. महाराष्ट्रातील उद्योगाची पायाभरणी करणाऱ्या या नगरीचे नाव अधिकृतरीत्या शासन दरबारी नोद्वले गेले. किर्लोस्करवाडीला स्वतःची ओळख मिळाली.

हा किस्सा शंतनूराव किर्लोस्करांच्या सविता भावे यांनी लिहिलेल्या चरित्रात सांगितला आहे.

पुढे राजबा यांची पत्नी ताराबाई चाबुकस्वार हिला किर्लोस्करांनी एक पत्र्याची झोपडी बांधून दिली. तिला नांगर रंगवण्याचं काम देखील मिळालं. तिची मुले देखील शाळा पूर्ण झाल्यावर कारखान्यात कामाला लागली. एवढच नव्हे त्यांनी आपल्या उपजत क्रीडापटूत्वामुळे क्रिकेट व टेनिसमध्ये  किर्लोस्करवाडीच नाव  देशभर गाजवलं. संभाजी राजबा चाबुकस्वार यांनी क्रिकेटमध्ये महाराष्ट्राच प्रतिनिधित्व देखील केलं होतं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.