दोन पर्याय होते. गुंडगिरी करायची की क्रिकेट ? तो क्रिकेटचा गुंडा बनला..

भारतात जेव्हापासून आयपीएल सुरु झालं तेव्हापासून परदेशातल्या खेळाडूंना त्यांच्या देशात जितकं प्रेम मिळत नसेल त्याच्या दुप्पट प्रेम आपल्या भारतीय लोकांनी केलं आहे. त्यातही वेस्ट इंडिजचे प्लेअर्स म्हणजे सगळी एन्जॉय मित्रमंडळ कॅटेगिरीमधली. ड्वेन ब्राव्हो, ख्रिस गेल, कायरन पोलार्ड [ आपल्या भारतीयांच्या भाषेत किरण पोलार्ड ] , आंद्रे रसेल, सुनील नारायण या सगळ्या मंडळीनीं आयपीलमध्ये खरी रंगत चढवली.

या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय असलेला खेळाडू म्हणजे कायरन पोलार्ड. हा भिडू मैदानावर जितक्या लांब लांब सिक्सर मारतो त्याने बॉलरची वाट लागते. बॉण्ड्रीवर जेव्हा पोलार्ड फिल्डिंग करत असतो बॅट्समनची टाप नसते कि त्याच्या डोक्यावरून सिक्सर मारायची. अगदी सिक्सरला जाणारा बॉल हा गडी खतरनाक कॅच पकडून सामना पालटवतो.

पोलार्डबद्दलचा आजचा किस्सा. वाईट संगतीला लागला असता तर आज तो गुन्हेगारी जगतातला बादशहा असता पण क्रिकेटचं वेड त्याला जगभरात घेऊन गेलं आणि लोकप्रिय केलं.

१२ मी १९८७ साली त्रिनिदाद मधल्या टकरिगुआ मध्ये पोलार्डचा जन्म झाला. पोलार्ड अगदीच लहान असताना वडील घर सोडून गेले. घरात दोन बहिणी आणि पोलार्डची जबाबदारी त्याच्या आईवर पडली. घरात अठराविश्वे दारिद्र्य , परिस्थिती बेताची होती . अशा परिस्थितीत पोलार्डच्या आईने सगळ्यांना सोबत घेऊन टुनापूना पीआरको या शहरात स्थलांतरित झाले.

टुनापूना पीआरको हे शहर गुन्हेगारी जगातलं सगळ्यात प्रसिद्ध ठिकाण होतं. या शहरात दिवसाढवळ्या ड्रग्सचा सर्रास व्यापार केला जायचा. गॅंगवॉर, बंदुकीच्या धाकाने बळजबरीने दोन नंबरची कामं या शहरात करवून घेतली जायची. अतिशय भयानक असलेलं हे शहर आणि या शहरात पोलार्डचा परिवार राहायला आला होता.

या शहराची मात्र एक खासियत होती कि खेळांबद्दल इथले लोकं जागृत होते. अतिशय प्रोफेशनल पद्धतीने इथे खेळ खेळले जायचे. या शहरात सहा महिने क्रिकेट आणि सहा महिने फुटबॉल आणि ऍथलेटिक्स खेळले जायचे. ऑलंपिकच्या काळात सगळेच जण ऍथलेटिक्सची तयारी करायचे, फ़ुटबॉल वर्ल्डकपच्या वेळी फुटबॉल. क्रिकेटच्या मोसमात त्या शहरातले सगळेच लारा, अँब्रोस बनायचे.

पोलार्डकडे त्यावेळी दोन पर्याय होते, गुन्हेगारी जगात जाऊन सोप्या रीतीने पैसे कमवायचे आणि दुसरं म्हणजे स्वतःवर चांगली मेहनत घेऊन खेळात करियर करायचं. क्रिकेट हा खेळ पोलार्डची घरची आर्थिक स्थिती पाहता महाग होता.

लहानपणापासूनच त्याच्याकडे चांगली शरीरयष्टी होती. उंची जास्त असल्याने आणि भरपूर ताकद असल्याने तो दणादण षटकार चौकार मारायचा. जोपर्यंत पोलार्डला टी-ट्वेन्टी या फॉरमॅट बद्दल माहिती नव्हती तेव्हा तो फक्त टेस्ट आणि वनडे या दोनच प्रकारच्या क्रिकेटचा विचार करायचा. सुरवातीला त्याला त्रिनिदाद अँड टोबॅगो या संघाकडून खेळून मग वेस्टइंडीज संघात खेळायचं होतं.

२००६ साली वेस्ट इंडिज संघाच्या अंडर १९ संघात त्याची निवड झाली. यातील त्याच्या चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर लिस्ट ए क्रिकेट आणि फर्स्ट क्लास क्रिकेटच्या आधी त्याला प्रोफेशनल क्रिकेट मध्ये संधी मिळाली. त्रिनिदाद अँड टोबॅगो संघाकडून त्याला पहिली संधी मिळाली.

या टुर्नामेंटमध्ये त्याच्यावर वेस्टइंडीज निवडीस समितीच्या त्याच्यावर नजर पडली आणि वयाच्या २० व्या वर्षी २००७ साली वेस्ट इंडिज संघात पोलार्डची निवड झाली. नंतर आपल्या कामगिरीच्या जोरावर त्याने वेस्टइंडीजला अनेक सामने जिंकून दिले. चॅम्पियन्स लीगमध्ये मात्र तो जगभरातल्या क्रिकेटप्रेमींच्या नजरेत पडला. त्याच सुमारास आयपीएलची घोषणा झालेली.

मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलच्या लिलावात पोलार्डला ५.५ कोटीची बोली लावून आपल्या संघात घेतले. आयपीएलमध्येही त्याने संघाला नाराज न करता उत्तम कामगिरी केली. आयपीएलच्या संग्रामात त्याची फिनिशर म्हणून ओळख झाली. मैदानाबाहेर जाणारे त्याचे सिक्सर आणि अप्रतिम फिल्डिंग यामुळे तो सगळ्यात जास्त लोकप्रिय खेळाडू ठरला.

पोलार्ड हा जगातला एकमेव खेळाडू आहे कि ज्याने ५०० हुन अधिक ती-ट्वेन्टी सामने खेळले आहेत. जगभरातल्या सगळ्या लिग्जमध्ये तो खेळतो. या त्याच्या अशा प्रकारच्या वागण्याने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाबरोबर बरेचदा त्याचे वादही झाले आहेत. पण स्वतःच्या अटीवर तो खेळत राहिला. इतकं क्रिकेट खेळूनही त्याची अजूनही वेस्ट इंडिजच्या टेस्ट संघात निवड झाली नाही. वनडे आणि टि-ट्वेन्टी संघाचा तो कर्णधार आहे.

वेस्ट इंडिज बोर्डाने त्याला सुनावले होते कि,

लिजेंड म्हणून मायदेशाकडून न खेळता भाडेकरू क्रिकेटर म्हणून  खेळणे तुला जास्त प्रिय आहे.

यावर पोलार्डने त्यांना सांगितले कि,

मला सिद्ध करायची गरज नाही, जगभरातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटचा मला आनंद घ्यायचा आहे. बाकी कुणाच्याही सल्ल्याची मला गरज भासत नाही.

५०० टी-ट्वेन्टी सामन्यात पोलार्डने १०००० धावा आणि २७९ विकेट मिळवल्या आहेत. १५ वर्षाहून अधिक काळ तो क्रिकेटचे खेळतोय. बरेच वाद त्याचे झाले पण त्याला जे हवं होत ते त्यानं मिळवलं. आपल्या आईला सुखाची रिटायरमेंट त्याने दिली आणि तो म्हणतो कि,

मी जितक्या अडचणीत दिवस काढले तसे दिवस माझ्या मुलांच्या वाट्याला न येवो.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.