हे कसले शेतकरी !!!

 

शेतकरी कसा असावा. बुडाखाली बुलेट, हाती सोन्याचा कंडा.शेतकरी म्हणजे डोक्यावर कडक फेटा, पाच एकर उसाचा बागायतदार, शेतकरी म्हणजे सिनेमात दाखवतात ना तसाच लुबाडणूक करणारा, शेतकरी म्हणजे टाइमपास करायला नव्या कोऱ्या टॅक्टरवरून गावभर फिरणारा. अहो, शे दोनशे किलोमीटर पायी चालणारे शेतकरी कुठ असतात का ? आम्ही बघत आलोय की शेतकरी म्हणजे काय ते, या शेतकऱ्यांकडे यातलं काहीच नाही. आणि म्हणे शेतकरी.

मस्तपैकी एसीची हवा खात शेतकरी मुंबईत यायला हवा होता. एकदिवसाचा मोर्चा सहा वाजता आवरून तो मस्तपैकी एखाद्या बारमध्ये दारू ढोसत बसायला पाहीजे होता. मग कुठ आम्हाला मान्य झालं असतं हे शेतकरी खरे शेतकरी. मुळात इतके दिवस का वेळ लावला ते हि न समजण्यासारखच आहे. संयम नावाची गोष्ट असते का नाही. निवडणूकांना अवधी असताना हा रस्त्यावर उतरतोच कसा. हा देखील विचार करण्यासारखां मुद्दा आहे. मुळात ना यांच्याकडे गाड्या ना घोडे. अहो साधी चप्पल नाही म्हणून रक्तानं माखलेले पाय दिसतायत आणि म्हणे शेतकरी !!!

Facebook – Alka Dhopkar
खरतर हाच खरा भारताचा शेतकरी !! आजवर काय केलं निवडक फोटो टाकले एसीत बसलेल्या शेतकऱ्याचे. मर्सिडिज घेतलेल्या जमीनदाराचे. बुलेटवरून येणाऱ्या मस्तवाल पोराकडं पाहून भलेभले स्टेटस रचले मस्तवाल शेतकऱ्याचा पोरं म्हणून..
आज वेळ आलीए खरा शेतकरी समजून घ्यायची. हाच तो शेतकरी. किमान आजच्या दिवशी तरी खिडकीतून पहा, चुकून नजरेला पडलाच एखादा रक्तानं माखलेला पाय तर थोडीशी फुंकर घालायचा प्रयत्न करा. एखादा शेतकरी चक्कर येवून पडलाच तर वेळ काढून त्याला खांदा देण्याचं काम करा. शेवटी खांदा देणं हे आपल्या संस्कृतीत बसतच की !!!