बाणखेले असे आमदार, खासदार होते जे कधी टपरीवर भेटायचे तर कधी स्टॅण्डवर
आजचे राजकारणी म्हणजे नुसता धूर, हवा. साधा नगरसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य देखील एसयूव्ही गाड्या उडवताना दिसतात. त्यांची मुलं तर त्याहून वरचढ. वडील राजकारणात आहेत याच जोरावर ऐट मिरवत असतात. धिंगाणा करायचं जणू लायसन्स मिळालंय आपल्याला असं त्यांना वाटतं. थोडे डोक्याचे घोडे दौडवा, तुम्ही पण असे प्रसंग बघितलेच असतील.
अशात जर किसनराव बाणखेले अण्णांबद्दल तुम्हाला सांगितलं तर दंतकथा वाटू शकते. पण असाही एक लोकनेता महाराष्ट्राने बघितलाय याला इतिहास साक्षीदार आहे.
डोक्यावर कडक टोपी, पांढरा शर्ट, धोतर, गळ्यात माळ आणि पायांत स्लिपर असा त्यांचा वेष. पहिल्यांदा कुणीही त्यांना बघितलं तर ‘कुठल्या गावचे पाटील वाट चुकून विधान भवनात शिरले’ असंच सगळ्यांना वाटायचं. त्यांच्यावर प्रेम करणारे लोक नेहमी अण्णांना सांगायचे की चप्पल किंवा बूट वापरा. त्याला आण्णा उत्तर द्यायचे…
‘‘हे स्लिपर चांगलं. कुठं हरवत नाही आणि कुठेही मिळतं.”
विधानसभा आणि लोकसभेत ते स्लिपरच वापरायचे यातूनच त्यांचं साधेपण कळतं. पण एखाद्या गहन विषयावर चर्चा करण्यासाठी अण्णा उभे राहिले की त्यांची धडाडणारी तोफ पाहून अनेक आमदारांना धक्का बसायचा.
त्यांच्या साधेपणाची अजून एक गोष्ट म्हणजे, मतदारसंघात फिरताना ते नेहमी सायकलवर फिरायचे. कुणी कार्यकर्ते भेटीला आले की आहे जागीच सायकल लावायचे आणि पुढचा प्रवास पायी करायचे.
किसनराव अण्णा पुणे जिल्ह्यातल्या शिरूर आंबेगाव तालुक्यातले.
शिक्षण जरी फक्त मॅट्रिकपर्यंत झालं असलं तरी गावाच्या मातीत झेललेल्या टप्या टोणप्यांनी व्यवहार ज्ञान अफाट होतं. त्यांची पहिली मुलगी जन्माला आली तेव्हा ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले होते. त्या वर्षीच त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि साठच्या दशकात मंचरचा तरुण सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरवात केली.
जशी त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली तसं त्यांचं घराकडं लक्ष कमी झालं. कधीतरी घरी यायचे. पण माणसांनी येऊन हाक मारली की लागलीच त्यांच्यासोबत जायचे, असं अण्णांच्या पत्नी मथुराबाई सांगतात.
सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि खासदार या पदांवर काम केलेले ते लोकनेते होते.
१९७२ साली जेव्हा अख्ख्या भारतभरात इंदिरा गांधींची लाट होती तेव्हा काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली. घरची भाकरी खाऊन कार्यकर्ते प्रचाराला फिरत होते. पैशाचं कोणतंही पाठबळ नसताना किसनराव अण्णांनी काँग्रेसच्या तगड्या उमेदवाराला पराभूत केलं.
आणीबाणीनंतर पराभव स्वीकारावा लागला मात्र त्यांनी हार मानली नाही. परत जिल्हापरिषदेमध्ये जाऊन जनसेवेचं काम चालू ठेवलं. पुढे जनता पक्षाच्या स्थापनेनंतर किसनराव अण्णा त्या पक्षात गेले. परत दोन वेळा आमदारकी जिंकली.
ही आमदारकी म्हणजे काही चमत्कार नव्हता तर किसनराव बाणखेले या नावामागचा साधेपणावर आणि सच्चेपणावर असलेला लोकविश्वास होता.
याचा पुरावा म्हणून त्यावेळची एक घटना अगदी बरोबर बसते…
१९७२ मध्ये सगळीकडे दुष्काळ पडला होता. लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. आमदारांचा तालुकाही दुष्काळी झळा सोसत होता. लोकांना काम मिळावं म्हणून दुष्काळी कामं सुरू केली होती.
या कामावर गरजू लोकांसोबत आमदार बाणखेले यांचं कुटुंब सुद्धा होतं. खुद्द आमदारांच्या पत्नी मथुराबाई कामावर होत्या. मात्र आमदार किसनराव आणि तिथल्या लोकांना यात काही विशेष वाटत नव्हतं.
किसनराव यांनी त्यांच्या पदाचा रुबाब कधीच लोकांना दाखवला नव्हता. म्हणून जसे किसनराव वेगळे वाटत नव्हते, तशा त्यांच्या पत्नी कामावर आहेत यात लोकांना आश्चर्य वाटलं नाही. किसनराव कामाच्या ठिकाणी भेट देऊन गेले तरी बायकोकडे विशेष लक्ष देत नव्हते. यायचे, मस्टर कारकूनजवळ चौकशी करायचे आणि निघून जायचे, असं लोक सांगतात.
साध्या लोकांमध्ये अगदी साधा व्यक्ती म्हणून ते वावरायचे. त्यांच्या गावातील प्रत्येक व्यक्ती आजही त्यांचे किस्से सांगतो…
आमदार असताना ते यादवराव पडवळ यांच्या सायकल दुरुस्तीच्या दुकानात गप्पा मारत बसत. यादवरावांना एखादी वस्तू लागली तर ते अगदी सहजपणे आमदारांना ती वस्तू पास करायला लावायचे. आमदार ती वस्तू द्यायचे. काम सांगताना यादवराव यांना काही वाटत नव्हतं आणि आमदारांनासुद्धा ते आपल्याला काम सांगत आहेत असं वाटत नव्हतं.
ते सतत लोकांमध्ये राहून त्यांचे प्रश्न, सुख-दुःख समजून घेत. अफाट जनसंपर्क ही त्यांची शिदोरी होती. कधी पायपीट करत तर कधी एसटीने फिरून मतदारसंघ पिंजून काढणारा असा नेता कधी कोणी पाहिला नव्हता. एसटीवरून त्यांचे दोन किस्से सांगितले जातात…
सुलतान नावाचे व्यक्ती. त्यांना कोणीही नव्हतं. अनाथ होते. जुन्नरच्या अनाथाश्रमात बारावीपर्यंत शिकले. नंतर त्यांना एसटी खात्यात नोकरीचा कॉल आला. मात्र नोकरी मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांच्या शिफारशीची गरज होती. एका व्यक्तीने सुलतान यांना किसनराव बाणखेले यांचं नाव सांगितलं. सुलतान जुन्नरवरून अण्णांना भेटायला मंचरला गेले.
अण्णा ज्या दवाखान्याजवळ भेटतील त्या ठिकाणी सुलतान गेले. तिथं एक माणूस उभा होता. सुलतान यांनी त्या व्यक्तीला विचारलं,
‘‘मला आमदारांना भेटायचं आहे.’’
व्यक्ती म्हणाला ‘‘काय काम आहे?’’
सुलतान म्हणाले “त्यांचाच सांगेल”
तसं तो व्यक्ती म्हणाला ‘‘मीच आमदार आहे.’’
अगदी साध्या वेशात असल्याने सुलतान त्यांना ओळखू शकले नाही. शिवाय सुलतान यांनी अण्णांना कधीच पाहिलेलंही नव्हतं. मात्र अण्णांची ओळख पटताच सुलतान यांनी सगळी हकीकत त्यांना सांगितली. ‘मला दहा मिनिट दे’ असं म्हणत अण्णा आतमध्ये गेले. बाहेर आले तेव्हा त्यांच्या अंगावर जरा चांगले कपडे होते.
मग दोघे एसटी स्टँडवर गेले आणि पुण्याची बस पकडली. अण्णा सुलतान यांना म्हणाले की, “मला तिकीट नसतं. तुझं तिकीट तू काढ.” पण सुलतान यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. अण्णांनी हे ओळखताच ते वाहकाला म्हणाले…” याला एसटीत नोकरी लावायला निघालोय. एक तिकीट दे त्याला.” मग वाहकाने सुलतान यांना तिकीट दिलं.
अण्णा आणि सुलतान दापोडीत उतरले. बसच्या थांब्यापासून एसटीचं ऑफिस तीन किलोमीटरवर होतं. रखरखीत उन्हात दोघेही चालत तिथे पोहोचले. तिथं साहेबांच्या केबिनमध्ये गेल्यावर आमदारांनी डायरेक्ट साहेबांचे पाय धरले. ‘‘अहो, आमदारसाहेब असं का करता? आम्हीच तुमचे पाय धरायला पाहिजेत.’’ असं पुढचा व्यक्ती म्हणाला.
आमदार त्या साहेबांना म्हणाले, ‘‘साहेब काहीही करा. या पोराला नोकरीवर घ्या. त्याला आपल्याशिवाय त्याला कोण नाही.’’ या घटनेच्या काही दिवसांतच सुलतान नोकरीला रुजू झाले. सुलतान यांना आमदारांचं शिफारसपत्र हवं होतं. मात्र स्वतः आमदार त्यांच्यासोबत गेले आणि नोकरी लावून दिली.
दुसरा किस्सा अण्णा खासदार असतानाचा…
१९८९ साली काँग्रेसचे जेष्ठ नेते रामकृष्ण मोरे यांना हरवून ते खासदार झाले.
एकदा खूप पाऊस पडत होता. खासदार बाणखेले पाबळ परिसरात होते. पावसात भिजत रस्त्याने निघालेले. पाठीमागून एसटी आली तेव्हा त्यांनी बसला हात केला, पण चालक नवीन असल्याने त्यानं त्यांना ओळखलं नाही म्हणून बस थांबवली नाही. मात्र एका प्रवाशाने खासदारांना पाहताच बेल ओढली. बेल वाजल्याचं लक्षात आल्यावर वाहकाने मागं बघून विचारलं, ‘‘कोणी बेल ओढली?’’
तो प्रवासी म्हणाला ‘‘अहो अण्णा गाडीला हात करत हुते.’’ वाहक म्हणाला ‘‘कोण अण्णा?’’ त्यावर प्रवासी म्हणाला ‘‘आपलं खासदार किसनराव बाणखेले.’’
हा संवाद चालू होता तोवर दार उघडून अण्णा आत आले. अगदी हसत हसत म्हणाले ‘‘आरं पोरानु, मला पावसात भिजत ठेवता का?’’ गाडी न थांबवल्याचा त्यांना किंचितही राग नव्हता.
असे अण्णा लोकांच्या भेटीवर असायचे. सायकल-एसटी नंतर पुढे त्यांनी स्कूटर घेतली. पुढे लोकांनी त्यांना वर्गणी करून जीप दिली. ते स्वतः गाडी चालवायचे. जाताना लोकांना बसवून घेऊन जायचे. अगदी बसतील तेवढे प्रवासी ते घेऊन जायचे. दौऱ्यादरम्यान खिशात एक छोटी वही ठेवायचे. त्यात ते लोकांच्या अडचणी लिहून घ्यायचे आणि ते प्रश्न सोडवायचे.
नेहमी फिरस्तीवर असल्याने ते कधीच घरी नसायचे. अशात कुठेही जेवायचे आणि मुक्काम करायचे.
कार्यकर्त्यांच्या घरीच मुक्काम करायचे, चटणी-भाकर बघून खुश व्हायचे. मुंबईवरून उशिरा पुण्याला आलेले आमदार बाणखेले हे पुणे शिवाजीनगरच्या एसटी स्टँडवर धोतर पांघरून निवांत झोपलेले अनेक वाहकांनी पाहिले आहेत. सकाळी वाहक-चालक त्यांना उठवायचे. चूळ भरायला पाणी द्यायचे. तिथंच चहा पिऊन अण्णा पुढच्या प्रवासाला जायचे.
यामुळे मंचरचं बस स्टँड तर त्यांचं ऑफिस असल्यासारखं होतं, असं लोक सांगतात. उशिरा आल्यावर तिथंच त्यांचा मुक्काम असायचा. पिशवी उशाला घेऊन अण्णा झोपलेले असायचे. तिथं असलेल्या धर्मादाय दवाखान्यातही ते असायचे.
त्यांच्या या वागणुकीचा घरच्यांना त्रास व्हायचा का? असं विचारल्यावर मथुराबाई सांगतात..
“सुरुवातीला त्रास झाला. मला राग यायचा- पण पुन्हा माझ्या लक्षात आलं की या माणसावर रागावलं तरी यांच्यात बदल होणार नाही. म्हणून घरखर्च चालवायला मी गोधड्या शिवू लागले. त्यातून मिळालेल्या पैशातून घराला हातभार लागला. अण्णा आमदार होते तेव्हाही जो पगार मिळत होता त्यातील ते आम्हांला काही देत नव्हते. सगळे पैसे लोकांसाठी खर्चायचे”
आजही अण्णांचा मुलगा रामदास शेतात राबतोय. सकाळी उठून शेतात जावं, काम करावं, गुरंढोर सांभाळावी, आईची सेवा करावी हे त्याला आवडतं. खासदारांचा मुलगा म्हणून कसलाही रुबाब त्याला नाहीये मात्र अभिमान त्याला आहे. खासदारांनी वापरलेली स्कूटर त्याने जपून ठेवली आहे. ती गाडी तो पुसतो आणि सणावाराला पूजन करतो.
राजकारणात घराणेशाही चालते असं म्हणतात मात्र रामदास याला अपवाद ठरतो, असे अण्णांचे संस्कार होते. तर अण्णांना घर संसाराबद्दल विचारलं तर ते वर बोट दाखवायचे आणि म्हणायचे “त्याला सगळ्यांची काळजी आहे. तो सर्व बघतो”
त्यांच्या मुंबईतील आमदार निवासाच्या खोलीत अनोळखी लोक झोपलेले असायचे. त्यांना बेडवर जागा देऊन बाणखेले जमिनीवर झोपायचे. ‘‘आपल्या खोलीत आलेत म्हणजे आपलेच असणार कोणीतरी.’’ असं ते म्हणायचे.
खासदार असताना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानीसुद्धा लोकसेवा आयोगाचा अभ्यास करणारी महाराष्ट्रातील ३५ मुलं राहत होती. तिथंही त्यांची गैरसोय व्हायची, पण ते काहीही बोलत नव्हते, असं त्यांचे जावई बबनराव साकोरे सांगतात.
‘‘आपण लोकांच्यामुळं इथं आलोय, हे लोकांचं आहे,’’ असं बाणखेले म्हणायचे.
लोकसेवेसाठी वाहून घेतलेल्या किसनराव अण्णांना आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ उभारलेली लाला अर्बन बँक वगळता कधी मोठमोठ्या संस्था उभारता आल्या नाहीत की बंगला, गाडी घेता आली नाही. रक्तात समाजकारण भिनल होतं. आपल्या दुष्काळी भागात घोडनदीच पाणी अडवून शेतकऱ्याच्या रानात पाणी पोहचवायच त्यांचं स्वप्न होतं. त्यासाठी आयुष्यभर लढा दिला.
पैशाच्या राजकारणाचा धुर्तपणा कधी त्यांना शिवलाच नाही. ते मतदासंघातील लग्नांना जरी उपस्थित नसले तरी रक्षाविसर्जन आणि दशक्रिया विधीला आवर्जून उपस्थित राहायचे. त्यांना निरोप पोहोचला की ते वेळेत जायचे.
‘‘सुखात सगळे जातात. पण माणसाला दुःखात आधाराची गरज असते,’’
असं ते म्हणायचे.
त्यांच्या साधेपणाचा अनेकांनी फायदाच घेतला. राजकारणामध्ये जनता दल, शिवसेना, भाजप अशा वेगवेगळ्या पक्षात त्यांची फरफटच झाली. मात्र त्यांचं मन राजकारणापेक्षा जास्त समाजकारणात रमलेलं होतं. सत्तेतून बाहेर पडल्यावरही मंचरच्या बाजारात बसून लोकांची गाऱ्हाणी ऐकणारा हा लोकनेता आजही तिथल्या सर्वसामान्य व्यक्तीच्या आठवणीत आहे.
किसनराव गेले त्या दिवशीची त्यांचं अंत्यदर्शन घ्यायला माणसाचा महासागर आलेला. प्रत्येक माणूस रडत होता. अण्णांना डोळे भरून पाहत होता. त्यांचा कुटुंबप्रमुख गेल्याने प्रत्येकाला अनाथ झाल्यासारखं वाटत होतं, असं लोक सांगतात.
त्यांच्या मृत्यूला जवळपास सात झालीत मात्र आजही शिरूर-जुन्नर-आंबेगाव भागात गेलं तर किसनराव बाणखेले यांच्याबद्दल त्यांचे विरोधकही वावगा शब्द बोलताना दिसत नाहीत. आजही त्यांच्या कथा-दंतकथा जनमानसात घट्ट रुतलेल्या आहेत हे नक्की.
हे ही वाच भिडू :
- बाप गेला, पक्ष गेला, चिन्हही गेलं पण तरीही हा नेता लढला…
- गोपीनाथ मुंडे यांचे ऋण सातारकर कधीही विसरू शकत नाहीत
- एकेकाळी विलासराव देशमुख आणि विक्रम गोखले पुण्यात एका बाईकवरून फिरायचे..