आमदाराच्या घरचे रोजगार हमीवर कामाला जातात ही त्याकाळची वस्तुस्थिती होती

आजच राजकारण म्हणजे एक दलदल बनलं आहे. तिथल्या चिखलात एकदा पडलं की बाहेर येऊ शकत नाही. अगदी ग्रामपंचायत सदस्य देखील एसयूव्ही गाड्या उडवताना दिसतात.

अशा वेळी जर किसनराव बाणखेले अण्णांबद्दल सांगितलं तर दंतकथा वाटू शकते.

डोक्यावर कायमची चिकटलेली गांधी टोपी, राखलेली दाढी, पांढरशुभ्र धोतर, अंगात खादीचा डगला आणि पायात रबरी चप्पल अशा वेशातले किसनरावअण्णा विधान भवनात शिरले की कुठल्या गावचे पाटील वाट चुकून इकडे आलेत असच वाटायचं.

पण एखाद्या गहन विषयावर चर्चा करण्यासाठी अण्णा उभे राहिले की त्यांची धडाडणारी तोफ पाहून अनेक आमदारांना धक्का बसायचा.

किसनराव अण्णा पुणे जिल्ह्यातल्या शिरूर आंबेगाव तालुक्यातले. लौकिक अर्थाने शिक्षण फक्त मॅट्रिक पण गावच्या मातीत झेललेल्या टप्या टोणप्यानी व्यवहारज्ञानाचं अफाट ज्ञान दिल होतं.

साठच्या दशकात मंचरचा तरुण सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरवात केली.

ते सतत लोकांमध्ये राहून त्यांचे प्रश्न, सुख-दुःख समजून घेत. अफाट जनसंपर्क ही त्यांची शिदोरी होती. कधी पायपीट करत तर कधी एसटीने फिरून मतदारसंघ पिंजून काढणारा असा नेता कधी कोणी पाहिला नव्हता.

१९७२ साली जेव्हा अख्ख्या भारतभरात इंदिरा गांधींची लाट होती तेव्हा काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली.

घरची भाकरी खाऊन कार्यकर्ते प्रचाराला फिरत होते.

लोकांनी नेत्याला वर्गणी देऊन निवडणूक लढवण्याचा तो काळ होता. पैशाचं काहीही पाठबळ नसताना किसनराव अण्णांनी काँग्रेसच्या तगड्या उमेदवाराला पराभूत केलं.

ही आमदारकी म्हणजे काही चमत्कार नव्हता तर किसनराव बाणखेले या नावा मागच्या साधेपणावर व सच्चेपणावर असलेला लोकविश्वास होता.

आणीबाणी नंतर पराभव स्वीकारावा लागला मात्र हार मानली नाही.

परत जिल्हापरिषदेमध्ये जाऊन जनसेवेच काम चालू ठेवल. पुढे जनता पक्षाच्या स्थापनेनंतर किसनराव अण्णा त्या पक्षात गेले. परत दोन वेळा आमदारकी जिंकली.

१९८९ साली काँग्रेसचे जेष्ठ नेते रामकृष्ण मोरे यांना हरवून खासदार ही झाले.

लोकसेवेसाठी वाहून घेतलेल्या किसनराव अण्णांना आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ उभारलेली लाला अर्बन बँक वगळता कधी मोठमोठ्या संस्था उभारता आल्या नाहीत की बंगला गाडी घेता आली नाही. उलट त्यांना मतदारसंघात फिरता यावं म्हणून शेतकऱ्यांनी लोकवर्गणी काढून एक जीप घेऊन दिली होती.

घरची परिस्थिती म्हणजे त्याहूनही बिकट.

आज अनेकांना सांगून पटणार नाही पण मोठमोठी पदे भूषवलेल्या या नेत्याच्या घरचे रोजगार हमीच्या कामावर जात होते.

रक्तात समाजकारण भिनल होतं. आपल्या दुष्काळी भागात घोडनदीच पाणी अडवून शेतकऱ्याच्या रानात पाणी पोहचवायच त्यांचं स्वप्न होतं. त्यासाठी आयुष्यभर लढा दिला.

पैशाच्या राजकारणाचा धुर्तपणा कधी त्यांना शिवलाच नाही.

त्यांच्या साधेपणाचा अनेकांनी फायदाच घेतला. राजकारणामध्ये वेगवेगळ्या पक्षात त्यांची फरफटच झाली. सत्तेतून बाहेर पडल्यावरही मंचरच्या बाजारात बसून लोकांची गाऱ्हाणी ऐकणारा हा लोकनेता आजही तिथल्या सर्वसामान्य व्यक्तीच्या आठवणीत आहे.

त्यांच्या मृत्यूला आता सहा वर्षे होतील मात्र आजही शिरूर जुन्नर आंबेगाव भागात गेलं तर किसनराव बाणखेले यांच्या बद्दल त्यांचे विरोधकही वावगा शब्द बोलताना दिसत नाहीत. आजही त्यांच्या कथा दंतकथा जनमानसात घट्ट रुतलेल्या आहेत हे नक्की.

संदर्भ-लौकिक लेखक महावीर जोंधळे

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Gaurishankar Halkanche says

    मी त्याना भेटलो आहे पुण्या मध्ये टिळक आयुर्वेद महाविद्यालयात शिकत असताना सुनिल चिखले यांच्या रूमवर आले होते फार्म भरण्यासाठी सायकलवर

Leave A Reply

Your email address will not be published.